पृष्ठे

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

ती गेली...


दोन वर्षांपासूनची तिची माझी साथ आज अचानक संपुष्टात आली. ध्यानीमनीही नसताना. आज सकाळी उठलो तेव्हा वाटलंसुद्धा नव्हतं कि आजच दिवस इतका निष्ठुर असेल. अगदी संध्याकाळपर्यंत सगळं नॉर्मल होतं. कदाचित मलाच ते नॉर्मल वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आय आय टी मध्ये आलो तेव्हापासून आम्ही सोबत होतो. ती पण नवीनच होती इथे. आमची पहिली भेट मला अजून आठवते. १ जानेवारी २०१२.  संध्याकाळी सहा सातच्या सुमारास मी पहिल्यांदा तिला पाहिलं आणि तेव्हापासून एकही दिवस असा नाही जेव्हा आम्ही भेटलो नाही. रोजच भेटगाठ व्हायची. तिच्या असण्याची अगदी सवय झाली होती. इतकी की तिच्या नसण्याची कल्पनाच करू शकत नव्हतो. पण आता ती नाही हेच सत्य आहे. तिच्या जाण्याच्या धक्क्यातून अजून पुरता सावरलोही नाही मी. ती कायमचीच गेली. पुन्हा मला कधीही भेटणार नाही. आत्ताच तिच्या जाण्याची तक्रार इथल्या सिक्युरिटी ऑफिसमध्ये नोंदवून आलो. कारण ती माझी सायकल होती मित्रांनो आणि ती चोरीला गेली. 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

आपल्याला जग जसं दिसतं, आपण जी सुखदुःखं अनुभवतो, ते सगळं अगदी जशाला तसं नसलं तरी निदान काही अंशी कुणाला तरी सांगावं , कुठं तरी व्यक्त व्हावं म्हणून शब्दांचा आधार. अनुभूतीला किती अंगं, किती कंगोरे! बदलत जाणाऱ्या, हिंदोळणाऱ्या मनाबरोबर बदलणारे दृष्टीकोण, बदलणारे संदर्भ, बदलणारे अर्थ, बदलणाऱ्या जाणीवा, आणि एकूणच बदलणारं जगच. स्थिर असं काय आहे? शाश्वत असं काय आहे? चिरंतन असं काय आहे? आलेला प्रत्येक क्षण भूतकाळाच्या अथांग सागराचं अंग होऊन जातो, आपल्याही नकळत. आपण "जुने जाऊद्या मरणालागुनी " म्हणत नव्याच्या स्वागतासाठी सज्ज होतो. पण खरंच जुनं ते मरणपंथाला जातं? आपल्यालाही जुनं ते सारंच सरणावर जावं असं कुठे वाटतं ? मला तरी तसं नाही वाटत. उलट जुनं ते सगळंच मस्त वाटतं. ते सुखदायक असो कि क्लेशदायक. असंच कधी कधी चित्रपट पाहिल्यासारखं आठवायचं.  हवं तर फास्ट फॉरवर्ड करायचं, हवा तो भाग रिपीट मोडमध्ये प्ले करायचा. आहे कि नाही मस्त? 

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

मंगळयान

आजकाल कुणीही कशावरही भाष्य करू लागलाय. पत्रकारांना तर जगाच्या पाठीवरच्या सगळ्याच गोष्टींवर आपापले विचार मांडायचा परवानाच मिळालेला असतो. आणि ते त्यांचा हा  हक्क अगदी इमाने इतबारे बजावत असतात. आपल्याला एखाद्या विषयातली माहिती असो अथवा नसो त्याबद्दल आपले मत असले पाहिजे आणि ते ठामपणे मांडले पाहिजे असे त्यांना वाटत असते. आता लोकसत्तामधला हा आजचा अग्रलेखच पहा. अतिशय उथळपणे, पुरेसा विचार न करता लिहिलेला अग्रलेख म्हणता येईल. यांच्या म्हणण्यानुसार 'आपण पाठवलेली संशोधन उपकरणे केवळ २५ किलो वजनाची आहेत आणि त्यामुळे आपण मंगळावर काही फार संशोधन करणार नाही आहोत आणि ही मोहीम म्हणजे आपण आपल्या हिमतीवर मंगळ मोहीम आखू शकतो हे जगाला दाखवणे हा आहे.  आणि मंगळयान हे मंगळापासून सुमारे ३६० किमी अंतरावर असेल म्हणजे मुंबईत बसून रत्नागिरीचा अभ्यास केल्यासारखं आहे'.  तर माननीय महोदय उपकरणांच्या वजनावरून त्यांच्या क्षमतेचा अंदाज करायला आपण कुठे शिकलात? आणि आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो अंतराळ मोहिमेत  ३६० किमी  हे अंतर म्हणजे फार जास्त  नसतं, आपले उपग्रह हजारो किमी अंतरावर असतात आणि तिथूनसुद्धा ते हाय क्वालिटी फोटोज घेऊ शकतात. 

ब्रह्मपुत्रा होस्टेल IIT Madras...कॅमेऱ्यातून


गेली जवळपास दोन वर्षे मी जिथे राहतोय त्या आमच्या ब्रम्हपुत्रा होस्टेलचे हे काही फोटोज. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून घेतल्याने फोटो क्वालिटी तितकीशी चांगली नाही. तरीही a picture is worth more than thousand words...! म्हणून हा प्रपंच. तसं आमचं होस्टेल म्हणजे अगदी हिरवाईने नटलेलं आहे हे पहालच तुम्ही. 

एका सायंकाळी होस्टेलच्या गच्चीवरून घेतलेला हा फोटो

माझ्या रूममधून दिसणारा होस्टेलचा परिसर




वृक्षवल्ली आम्हां सोयरे…


आणि ही वनचरे सुद्धा… 


हे badminton court … 

… आणि ही माझी रूम. 


एक झाड वठलेलं… 


माझ्या रूमच्या galleryमधून दिसणारं दृश्य 

galleryतून आत येणारं सकाळचं उन… 

हा सुद्धा galleryमधून घेतलेला एक फोटो… 

रात्र उतरल्यावर 


होस्टेलवर हळुवार उतरणारं चांदणं… 



आणि हा इथे मी … 


बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

पैलतीर

मागच्या मे महिन्यात घरी गेलो होतो, दर वेळी जातो तसाच. एके दिवशी सकाळी लवकर उठलो (जे आता फार क्वचित घडतं) आणि मग जाणवलं की इथे सगळं काही तसंच पूर्वीसारखं आहे. आई, अण्णा, बहिणाबाई सगळेच सकाळी सहाच्या आधी उठतात. सात वाजेपर्यंत सगळ्यांचं अंघोळ करून झालेलं असतं. सगळ्या खोल्या झाडून स्वछ झालेल्या असतात. आई अजून रोज अंगणात सडा टाकते, रांगोळी काढते, तुळशीची पूजा करते. हे तुळशीवृंदावनसुद्धा अगदी तेच आहे. अण्णा सकाळी सकाळी काळ्या कमानीकडे जाऊन भाजीपाला आणतात. पेपरवाला भल्या सकाळी येउन पेपर टाकून जातो. दहीवल्या मावशी अजून रोज सकाळी न चुकता दही घ्यायचं का म्हणून विचारतात. सगळ्याच अंगणांत साडे शिंपण चाललेलं असतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची तशीच धावपळ चाललेली असते जशी माझी असायची. मीही असाच होतो काही वर्षांपूर्वी, शाळेत असताना. हे सगळं किती मस्त आहे. मला माझे शाळेचे दिवस आठवले. किती उत्साह होता जगण्यात तेव्हा. सकाळी सात वाजता शाळा भरायची आणि आम्ही साडेसहालाच घरातून निघायचो. (सकाळचे सहा वाजल्याचं घड्याळात पाहून आता युगं उलटली असं वाटतंय. ) मग दहावीचं वर्ष. दिवसभर शाळा, एक्स्ट्रा क्लासेस यात किती बिझी असायचो तरीही तरतरीत. हा वसमत रोड रोज सकाळी सकाळी किती प्रफुल्लीत वाटतो अजूनही. पण आता मला या सगळ्यापासून खूप दूर आल्यासारखं वाटतंय. स्वतःच्याच प्रश्नांमध्ये इतका गुरफटत गेलो कि या गोष्टींकडे लक्षच राहिलं नाही. आपल्या प्रश्नांच्या पलीकडेसुद्धा जग आहे आणि ते खूप सुंदर आहे हे भानच राहिलं नाही. पण हे लवकर लक्षात आलं हेही नसे थोडके. 

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

खरं सांगायचं तर

(पांडुरंग सांगवीकरच्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे अगदी सहज वगैरे  लिहिलं. माणसानं कसं स्वतःशी प्रामाणिक वगैरे असावं म्हणून.  नाकर्तेपणा जिंदाबाद ...! )

माझे बी. टेक.चे दिवस म्हणजे काही लय भारी वगैरे नव्हते. म्हणजे ते कॉलेज डेज वगैरे असं काही मी मुळीच मिस करत नाही. नाही म्हणायला काही आठवणी आहेत,  पण 'जाने काहां गए वो दिन' असलं फिल्मी मुळीच नाही हं. खरं तर फायनल इयरला असताना जाम कंटाळा आला होता कॉलेजचा. कधी एकदा इथून बाहेर पडतो असं झालं होतं. उगाच खोटं कशाला सांगा? काही लोक उगाच मसाला लाऊन लाऊन आपल्या कॉलेजच्या दिवसांचं वर्णन करत असतात जणू काही ते त्या कॉलेजचे हिरोच होते. खरं सांगायचं म्हणजे कॉलेजच्या दिवसांत मी एकदम सुस्त प्राणी होतो. चार वर्षांत काही म्हणजे काहीच केलं नाही. फक्त पास होण्यापुरता अभ्यास तेही पर्याय नव्हता म्हणून करावा लागला. आणि निव्वळच पर्याय नव्हता असंही काही नाही. कधी कधी अभ्यासात मजासुद्धा यायची. कधी कधी आपण हे म्हणजे लय भारी शिकतो आहोत असं वाटून एकदम उत्साहाची भारती यायची. पण ती लगेच ओसरुनही जायची.  आणि इंजिनिअरिंगची इतर मुले करतात तसं मी मुळीच क्लेम करत नाही कि परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून मी पास झालो. गरजेपुरता अभ्यास करायचो. उगाच स्वतःला हुशार म्हणून प्रोजेक्ट कशाला करा? 

तर सांगायचं म्हणजे नाईलाज म्हणून केलेला अभ्यास सोडला तर आमचे बीटेकचे दिवस म्हणजे एकदम कोरेच. कुठल्या कल्चरल प्रोग्राममध्ये, कुठल्या स्पोर्टमध्ये कशातच भाग घेतला नाही. बरं अभ्यासात लय भारी होतो असंही नव्हतं. दिवसभर क्लासेस झाले कि रूमवर येउन गप्पा मारत बसायचं किंवा मग युनिवर्सिटीकडे फेरफटका मारायचा नाहीतर काळेश्वरला जायचं हा एकच उद्योग होता आमचा. हो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये माझ्यासारखीच काहीही न करणारी बरीच मित्रमंडळी होती. म्हणजे एकंदरच काय तर कॉलेजात आम्ही एकदम मिडल क्लास विद्यार्थी होतो. पण हे सगळं ठरवून वगैरे नव्हतं, सर्वांना वाटतं तसंच 'आपण काहीतरी वेगळं करावं' असं वाटायचं पण नेमकं काय करावं हेच कळायचं नाही. सीव्हीमध्ये लिहायला म्हणून थर्ड इयरला असताना एक इव्हेंट तेवढा ऑर्गनाईझ केला होता. तेच काय ते वेगळं. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे थर्ड इयरला असतानाच एका मुलीला प्रोपोज केलं होतं पण तिकडून नकार आला आणि तो प्रयत्न सपशेल फसला. 

आणि उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून सांगतो कि मी आमचं काहीही न करणं ग्लोरिफाय वगैरे करत नाही बरं का. पण त्याची काही खंतसुद्धा नाही. उलट त्या दिवसांकडे मी आता त्रयस्थपणे पाहतो. पण त्रयस्थपणे म्हणजे रुक्षपणे नव्हे. काही मजेदार, काही गमतीशीर, काही हळव्या(?) आठवणीही आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी...

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

संहिता (The Script)


या चित्रपटात "माणूस स्वतःची संहिता स्वतः कधी लिहू शकेल?" असा एक डायलॉग आहे. मी तो ट्रेलरमध्ये पहिला आणि मग थोड्या वेळाने क्लिक झालं कि 'अरे हो, यावर आपण कधी विचारच केला नाही'. आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. काही जणांना ते शक्य होतं आणि काही जणांना त्यासाठी झगडावं लागतं आणि काही जण आपण जसे जगतो आहोत तसंच आपल्याला जगायचं होतं असं म्हणून स्वतःची समजूत काढतात. पण आपल्या आयुष्याची संहिता आपण लिहिणं हे सोपं नसतंच. त्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. कारण आपल्या संहितेत ज्यांवर आपला कंट्रोल नाही अशा गोष्टी पण येतातच आणि त्या आपापल्या परीने संहितेवर परिणाम करत असतात. 

संहिता




सुमित्रा भावे आणि सुनील सुकठनकर (नाव बरोबर आहे ना ? कारण इंग्रजी Sukthankarवरून इथे ट्रान्सलेट केलंय) या दिग्दर्शक द्वयीने आतापर्यंत दहा (?) चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या कलाकृतींना आतापर्यंत बरेच अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यांमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे त्यांचा संहिता हा चित्रपट काल ४ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला. मी अजून पहिला नाही पण एकंदर त्यांच्या चित्रपटांचे विषय पाहता संहिताबद्दल एक उत्सुकता लागलेली आहे. या द्वायीचे देवराई, नितळ, दहावी फ हे चित्रपट मी पहिले आहेत. त्यांचे चित्रपट हे अगदी वास्तवदर्शी आणि वेगवेगळ्या गंभीर विषयांवर असतात. निव्वळ मनोरंजनासाठी म्हणाल तर निराशा होईल पण वेगळ्या विषयावरचा चित्रपट पहायचा असेल तर या द्वायीचे चित्रपट पाहणं एक चांगला अनुभव असू शकतो. संहिता चित्रपटाची झलक   इथे क्लिक करून पाहू शकता. 


गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

दुनियादारी: कादंबरी आणि चित्रपट

काल दुनियादारी चित्रपट पहिला. आणि साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी जेव्हा दुनियादारी रिलीज झाला होता तेव्हाच दुनियादारी ही कादंबरी वाचली. चित्रपट आणि कादंबरी दोन्हीही अप्रतिम आहेत. चित्रपटासाठी मूळ कथेत काही मुलभूत बदल केले आहेत पण ते कुठेच अनाठायी वाटत नाहीत. उलट चित्रपट हिट होण्याचं बरचसं श्रेय त्या बदलांनाच द्यावं लागेल. 

कादंबरी सुरु होते ती श्रेयस पुण्यात आल्यावर आणि मग श्रेयसभोवती फिरते. चित्रपट सुरु होतो म्हातारे शिरीन आणि प्रितम श्रेयसला भेटायला म्हणून पुण्याला जायला निघतात तेव्हा. खरं तर कादंबरीमध्ये श्रेयस किंवा कुणीच म्हातारं होत नाही म्हणजे त्याआधीच कादंबरी संपते. कादंबरीमध्ये गुजराती असलेली शिरीन आणि प्रितम पटेल ही भावंडं चित्रपटात चक्क शिरीन आणि प्रितम घाटगे अशी मराठी होतात आणि त्यांची पार्श्वभूमी सुद्धा राजकीय दाखवली आहे. त्यांचे वडील राजकारणात असल्याचं दाखवलंय. कादंबरीत एक साधा मवाली असलेल्या साईलासुद्धा चित्रपटात राजकीय पार्श्वभूमी मिळते आणि त्याच्यातला विलन अजून पॉवरफुल होतो. या दोन्ही बदलांना पुढे मोठ्या खुबीने एकमेकांत गुंफलंय.  जेव्हा साई आणि शिरीन यांचं लग्न ठरल्याचं कळतं तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शिरीन आणि प्रितम ही भावंडं कट्टा gangचे फ्रेंड्स आणि त्या शिरीनचं लग्न कट्टा gangचा जानी दुश्मन असलेल्या साईशी? पण हा बदल जमून गेलाय. कादंबरीत श्रेयस मिनुच्या प्रेमात आपण होऊन पडतो. पण चित्रपटात तो नाटक करत असल्याचं चित्रण आहे हे जरा खटकतं. असो. नंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे चित्रपटात चक्क श्रेयस आणि शिरीनचं लग्न होतं. कादंबरीत असलं काहीही होत नाही,सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. चित्रपटात एम. के.ला जास्त महत्त्व नाही दिलं आणि ते एका दृष्टीने बरंच झालं कारण कादंबरीतही जेव्हा एम.के. आणि श्रेयस यांचा संवाद येतो तेव्हा कादंबरीचा पेस मंदावल्यासारखा वाटतो.  पण कादंबरीत दारू ढोसून मारणाऱ्या एम के ने चित्रपटात आत्महत्या का केली हे कळत नाही. आणि चित्रपटाचा शेवट तर अगदी यू टर्नच आहे- शेवटी श्रेयस मरतो. पण हा एंड सुद्धा जमून गेलाय. कारण चित्रपट संपल्यावर काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. 

सर्वांचाच अभिनय अगदी अप्रतिम आहे. दिघ्याच्या रोलमध्ये अंकुश चौधरी अगदी परफेक्ट बसतो, स्वप्नीलने साकारलेला श्रेयस, शिरीन झालेली सई, उर्मिला कानेटकरने साकारलेली निरागस मिनू, जितू जोशीचा साई सगळे आपापल्या भूमिकांमध्ये योग्य वाटतात. 

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

तो जायचा दिवस...

घरी असलं कि दिवस इतके लवकर निघून जातात कि घरी राहिल्यासारखं वाटतच नाही. अचानक तो जायचा दिवस समोर येउन उभा राहतो. त्याच्या आदल्या दिवशी तर एकेक क्षण हातातून निसटत असल्यासारखं वाटतं, काय करू अन काय नको असं होतं. मी ते क्षण धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो पण ते शेवटी निसटून जातातच आणि मग उदास रात्र पसरते साऱ्या जगावर आणि माझ्या मनातही. आणि इच्छा नसतानाही सामानाची बांधाबांध करावी लागते कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं असतं. पुन्हा कमीत कमी सहा महिने तरी हे घरी राहण्याचं सुख मिळणार नसतं. झोपही काही केल्या डोळ्यात उतरायला तयार नसते. मग मी या दिवसांत काय काय केलं, कुणाकुणाला भेटलो, कुठेकुठे गेलो याचं पुनरावलोकन होतं. काही गोष्टी केल्याचं समाधान असतं तर काही राहून गेल्याची खंत. आणि मग या विचारांच्या तंद्रीत केव्हा तरी अलगद झोपेच्या स्वाधीन होतो…आणि सकाळ होते. मग मोठ्या मुश्किलीने उठावंच लागतं. आई साखरझोपेत असलेल्या बहिणाबाईला मी जाणार म्हणून उठवते. आपल्यामुळे एवढ्या सगळ्यांना झोपेतून उठावं लागतंय याचं वाईट वाटतं, पण पर्याय नसतो. आई तर पहाटेपासूनच  उठलेली असते. सगळी आवराआवर करून शेवटी देव्हाऱ्यातल्या देवाला, आई-अण्णाला नमस्कार करून स्वारी निघते रेल्वे स्टेशनकडे. इतक्या दिवसांत पहिल्यांदाच इतक्या सकाळी उठल्यामुळे परभणीचं सकाळचं दुर्मिळ रूप नजरेस पडतं आणि परभणी अशीही असते हे पाहून आनंद वाटतो. बाहेर थंडगार हवा सुटलेली असते, वसमत रोड अजून काहीसा पेंगतच असतो, वाहनांची गर्दी व्हायला अजून अवकाश असतो आणि  नाही म्हणायला जॉगिंगवाल्यांची वर्दळ असते, खानापूर फाट्याजवळच्या कृष्ण मंदिरातल्या कृष्णाला मी दुरूनच नमस्कार करतो, काळ्या कमानीला अन गुलमोहर हॉटेललासुद्धा अजून जाग आलेली नसते, त्यापुढे पेट्रोल पंप अन शिवाजी कॉलेजसमोरचे कॉम्प्लेक्स निपचित असतात आणि त्यासमोर अजून झोपेतच असलेलं गार्डन दिसतं, मग अजून पुढे शिवाजी पुतळा आणि बी. रघुनाथ सभागृह शांतपणे उभे असलेले दिसतात आणि रेल्वे स्टेशन आल्याची चाहूल लागते. हे सगळं मी डोळ्यांत साठवून ठेवत असतो आणि पुढच्या खेपेला रोज सकाळी लवकर उठून हे सगळं अनुभवायचा निश्चय करून टाकतो. 

असंच आयुष्याचंसुद्धा असावं. आयुष्याच्या संध्याकाळी किती विचार येत असतील मनात, नाही का? तिथे तर काहीच बरोबर येणार नसतं, आठवणीसुद्धा नाही आणि परत यायचीसुद्धा सोय नसते. ते जाणं कायमचंच असतं.  इतके दिवस ज्यांच्या सहवासात घालवले ती माणसे; जिथे राहिलो, जगलो ते घर, तो परिसर; हे जग; अगदी सगळंच काही सोडून जावं लागणं ही कल्पनाच किती भयंकर आहे. 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

भयंकर डिप्रेशन

आज आपल्याला भयंकर डिप्रेशन आलंय. त्यामुळे काहीतरी भारी असं आपल्या हातून लिहिलं जाण्याची लई दाट शक्यता आहे. त्यासाठी डोक्यातली झाडून सगळी अक्कल पणाला लावली आहे. पण अजून लई भारी असं काही उगवलं नाही. पण हे चांगलं आहे. जेवढं उशिरा उगवेल तेवढं ते भारी असेल असं आम्हांला वाटतंय. रूममधली ट्यूब वगैरे बंद करून अंधार केला आहे, एकदम जुनी जुनी मराठी गाणी मंद आवाजात लावली आहेत. म्हणजे एकूणच सुपीक वातावरण तैय्यार है. फक्त एखादी भन्नाट आयडिया उगवायला उशीर कि टिपलीच म्हणून समजा. 

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१३

गुरुदेव

आमच्या परम पूज्य गुरूदेवांचा महिमा वर्णावा तो किती. सहा शास्त्रे, आठरा पुराणे, वेद, स्मृती, श्रुती यांनासुद्धा अगम्य असं त्यांचं व्यक्तिमत्व. आमच्या सुदैवाने ते सगुण ,साकार आहेत. पण बरेचदा त्यांचं दर्शन दुर्लभ असतं. आमच्याशी फक्त आंतरजालावरून संपर्क ठेवतात. तेव्हा ते निर्गुणच असतात. ते माणूस या क्षुद्र संकल्पनेच्या कितीतरी परे आहेत. आणि समोरचासुद्धा, म्हणजे त्यांचा शिष्य, हा त्यांच्याच मार्गावर असेल असे त्यांना वाटत असते. आणि ते असं काही गूढ, अगम्य बोलतात कि आम्ही दंग होऊन जातो कारण त्यांच्या एक दीड तासाच्या प्रवचनानंतरसुद्धा आम्हांला त्यातलं अवाक्षरही कळलेलं नसतं. त्यातलं त्यांना कितपत कळतं हा अजून संशोधनाचा विषय (ओपन प्रॉब्लेम )आहे.

त्यांच्या कक्षात जाणं हा एक दिव्य अनुभव असतो. तिथे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सर्व क्षुद्र इच्छांवर (म्हणजे भूक वगैरे) विजय मिळवला असला पाहिजे. कारण तिथे गेल्यावर तास दीड तास तरी तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. फक्त तुम्ही, गुरुदेव आणि तुमच्या बुद्धीचा गोंधळ याचंच आत अस्तित्व असतं.  तुम्ही आत शिरता आणि ते तुम्हांला थोडा वेळ वाट पाहायला लावतात. ही तुमची परीक्षा असते. तो थोडा वेळ दहा मिनिटांपासून ते एक तासापर्यंत असू शकतो. मग ते तुमच्याकडे मोर्चा वळवतात. आणि तुमचं काहीही ऐकून न घेत आपलं प्रवचन सुरु करतात. त्यांचं प्रवचन ऐकत असतानाच तुमचं म्हणणं त्यांच्या गळी उतरवणं हे खरं संवाद कौशल्य. पण ते तुमच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. ते कधी झोपतात (किंवा कधी झोपत नाहीत) हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. कारण संगणकामध्ये ते जेव्हा काही शोधतात तेव्हा हमखास रस्ता चुकतात आणि त्याचं कारण म्हणजे ते रात्री झोपलेले नसतात. तसे ते २४ तास निद्राधीन असतात असा आमचा अंदाज आहे. पण यावर अजून प्रकाश टाकावा लागेल. 

त्यांचा आम्हां शिष्यांवर खूप विश्वास आहे. एवढा कि कोणत्याच कार्यात आम्हांला मदत करणं त्यांना आवडत नाही. आम्ही ते करायला समर्थ आहोत अशी त्यांना खात्री असते. पण अधूनमधून (म्हणजे तीन महिन्यातून एकदा) ते आमच्या कार्याचा आढावा घेत असतात आणि आपल्या अमोघ वाणीने आम्हांला असंख्य अशा सूचना करत असतात. त्याही आमच्या अल्पमतीच्या परिघात येत नाहीत. यात त्यांना दोष कसा द्यायचा. गरजेनुसार शिकण्यावर (नीड बेस्ड लर्निंग) त्यांचा नेहमी भर असतो. आवश्यकतेपेक्षा जास्त विषय शिकायचे कशाला असं त्यांचं ठाम मत आहे. 

अजून किती म्हणून लिहू त्यांचा महिमा. शब्दच ज्यांच्या वाणीने गोंधळून जातात तिथे आम्ही अल्पमती काय लिहिणार. त्यांनी आम्हांला अनुग्रह दिला यातच आम्ही धन्य झालो. आता फक्त इहलोकीची इतर कर्तव्ये करण्यासाठी आमची इथून मुक्तता करावी एवढीच इच्छा, कारण आम्ही इथे कायमस्वरुपीच आलो आहोत असा त्यांचा (गैर) समाज झालेला दिसतोय. 

शनिवार, १३ जुलै, २०१३

समाजविदारक

आज समाजसुधाराक असल्याचा आव आणून समाजातल्या अनिष्ट गोष्टींवर बोलण्या/लिहिण्याऐवजी कुठल्या तरी धर्माला टार्गेट करून त्यावरच टीकेचा भडीमार करणाऱ्या समाजविदारकांची संख्या खूप वाढली आहे. म्हणजे वरवर पाहता हे खूप मोठे तत्त्वज्ञ किंवा विचारवंत असे भासतात पण समाजाला सुधारणे हा त्यांचा हेतू नसतो तर फक्त धर्माला नवे ठेवणे, त्यात दोष शोधणे, एखाद्या विभूतीचं वस्त्रहरण करणे असलाच हेतू असतो अन तेच उद्योग हे करत असतात. अनिष्ट रूढी, परंपरा यांना विरोध जरूर असावा. जे जे अनिष्ट आहे ते धर्माने त्यागावं आणि काळानुरूप बदलावं तरच तो धर्म टिकेल.  पण केवळ अनिष्ट रुढींचा अंतर्भाव आहे म्हणून तो धर्मच वाईट ठरवणं हे कुठलं शहाणपण? पायात काटा घुसल्यावर काटा काढायचा कि पायच कापून टाकायचा? हे असले समाजविदारक म्हणजे पाय कापून टाकण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरसारखे आहेत. 

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

पाऊस: तेव्हा


मी सहावी सातवीत असेल. शाळा घरापासून जवळपास एक-दीड किमीवर होती.    शाळेवर टीनची पत्रे होती. तेव्हाचा पाऊस पण माझ्या एवढा होता. कधी कधी दुपारीच मध्यंतरनंतर आभाळ भरून यायचं. काळंकुट्ट व्हायचं. शाळेच्या अवती भवति सगळी शेतंच शेतं होती. आणि माझी जागा नेमकी विंडो सीट असायची. मग काय बाहेर एकदम मस्त चित्र दिसायचं. शेतांमध्ये कुठे भुईमुग, कुठे ज्वारी, कुठे ऊस, कुठे कापूस अशी पिकं डुलत असायची. आणि ढगाळ वातावरणात पिकांचा हिरवा रंग अजूनच खुलायचा. थंड वारा सुटायचा. खिडक्यांची आदळ आपट व्हायची. शिकणं शिकवणं बाजूलाच राहायचं. सगळेच मग पावसाचा आनंद घ्यायला सज्ज व्हायचे. थोड्याच वेळात मग एक थंड झुळूक यायची आणि त्यामागोमाग हलक्या सारी उतरायच्या. पत्रांचा आवाज व्हायचा. ते एक संगीतच असायचं. मग त्या आवाजामध्ये आम्हा मुलांचा आवाज मिसळून जायचा. बोलायला तेवढीच संधी मिळायची. आता इथून पुढचे तास होणार नाहीत याचा अजून आनंद असायचा. मग कुठे कुठे पत्रे गळायला लागायची. बेंचेस मागे पुढे सरकवले जायचे. मग मध्येच विजेचा कडकडाट. पण त्याला कोण जुमानतो? शाळेचं ग्राउंड ओलं चिंब होऊन जाई. त्यावरचे खोखोचे पोल्स स्थितप्रज्ञपणे भिजत उभे असायचे. नवीनच लावलेली नारळाची आणि इतर झाडं पावसात नाहून निघायची. शाळेच्या भिंतींतून पाणी झिरपू लागायचं. बाहेर एखादं कुत्रं अंग चोरून झाडाशी उभं असलेलं दिसे आणि त्या बिचाऱ्याची दया येई. रस्त्यावरून एखादीच भिजत जाणारी सायकल दिसे. हवेसोबत उडणारे पावसाचे फवारे बघायला अजूनच मजा येई. मग पाऊस कमी झाला कि शाळा सुटायची. आणि सगळे एकदम गोंधळ करत वर्गाबाहेर पडायचे. पावसाशी पाठशिवणीचा खेळ सुरु व्हायचा. त्यानं गाठायच्या आत घरी पोचायचं असे. पण तो कसला आम्हांला कोरडा सोडतोय? बरोबर अर्ध्या वाटेत आलं कि गाठायचा. आणि तो येताना दिसायचा. कधी कधी आम्हांला समांतर शेतांतून चालायचा. पण मग आमच्याकडे मोर्चा वळायचाच त्याचा. मग काय छत्री असेल तर तिचा आडोसा नाहीतर भिजत जायचं. भिजल्याच्या भीतीपेक्षा भिजल्यावर घरी रागावतील याचीच भीती असायची. पण तरीही सगळ्यांसोबत भिजायला मस्त वाटायचं. रस्त्यांवरून ओहाळ वाहायला लागायचे. त्यातून चालायला मजा यायची. एखादं वाहन आलं कि सगळे रस्त्याच्या खाली उतरायचो. पण तरीही पाणी उडून अंगावर यायचंच. मग सगळे एका आवाजात  त्याला ओरडायचे. एखाद्या झाडाखालून जाताना आमच्यावर पाणी उडवून ते झाड सुद्धा आम्हांला भिजवून टाकीत असे. तेव्हा जे शिकलो, जे घडलो ते या पावसाच्याच साक्षीनं, याच्याच सान्निध्यात. आताही तो आला कि या आणि इतरही सगळ्याच पावसाळी आठवणी घेऊन येतो. मनाला ओलं चिंब, हिरवं करून टाकतो. 

आठवणींना धुमारे 
मनाला शहारे 
गर्द हिरवे नजारे 
म्हणजे पाऊस 

मनाचं चिंब होणं 
आठवणींत धुंद होणं 
मृद्गंधाचं मंद दरवळणं  
म्हणजे पाऊस 



गुरुवार, ४ जुलै, २०१३

अश्वत्थामा

(डोक्यावर भळभळणारी जखम आणि अमरत्वाचा शाप घेऊन मरणाची वाट बघणाऱ्या अश्वत्थाम्याची व्यथा. )

जगणं सरलं आयुष्य उरलं 
मरणाची आता वाट बघतोय 

दिवस सरला अंधार उरला 
पसरत जाणारी रात बघतोय 

तेल सरलं दिवा विझला 
उरलेली मागे वात बघतोय 

कर्तृत्व सरलं नशीब उरलं 
आशेनं मोठ्या तळहात बघतोय 

चुकलेल्या वाटांचं प्रतिबिंब पुन्हा 
भळभळणाऱ्या घावात बघतोय 

शनिवार, २२ जून, २०१३

शितू! ए शितू ग!

आज 'शितू' वाचून कम्प्लीट झाली. वाचताना 'काकस्पर्श'मधली दृष्यं डोळ्यासमोर यायची. दोन्ही कथा खूप भिन्न असल्या तरी पार्श्वभूमी सेम आहे. म्हणजे कोकण, बाल विधवा वगैरे. वाचत असताना एवढा  involve झालो होतो कि कित्येक वेळा डोळ्यात अश्रू तरळायचे आणि मग थोडा वेळ वाचणं थांबवावं लागायचं. राव आता आपला मूड भयंकर सेंटी झालाय. त्यामुळे आपल्या प्लेलिस्ट मध्ये आज फक्त रडगाणेच वाजताहेत. मनातसुद्धा काही ओल्याचिंब, सेंटी सेंटी आठवणी प्ले होतायत(हे म्हणजे लय भारी, नाही का?) 

शितू, काहीच दोष नसता जगाचे टोमणे खात राहिली, केवळ विसुसाठी अन अप्पांसाठी. शेवटी सुख म्हणून तिच्या नशिबी असं नव्हतंच. विसूला, तिच्या त्या देवाला, पापकर्मापासून रोकण्यासाठी म्हणून ती दर्यात उतरली ती कायमचीच. सुटली बिचारी जगण्याच्या कचाट्यातून. 


'शितू' तर ओहोटीच्या दर्याने आपल्या पोटी घेतली पण 'विसू' बिचारा धड जगातही नाही अन धड मरतही नाही. त्याचं शरीर आणि मन यांच्यात मरणासाठी द्वंद्व चाललेलं. कधी शरीर मरायला तयार होतं तर मन काच खातं. कधी मन निग्रह करून मरणसिद्ध होतं तर शरीराला जगावंसं वाटतं.  शितूचा निःश्वास त्या दर्याकिनारी हवेत कुठेतरी घुटमळत असेल या वेड्या आशेवर तो जगतोय. 'शितू! ए शितू ग!' असं ओरडत हिंडतोय.  

शुक्रवार, २१ जून, २०१३

शितू



आज गो. नी. दांडेकरांची 'शितू' वाचायला घेतली. अगदी नवी कोरी, नाजूक. आणि उघडल्या उघडल्या वाचली ती 'पाठवणी' नावाची तिची प्रस्तावना. शितूला गोनीदा त्यांची मानस कन्या मानतात. त्यातलं शेवटचं वाक्य मनाला स्पर्शून जातं. ते असं आहे 

रसिकवृंद! एकच प्रार्थना!
'चित्ता अति हळुवारपणा आणौनिया' शितू वाचावी! ती माझी अत्यंत लाडकी, पण जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे !

आहे कि नाही अगदी हृदयस्पर्शी? गोनीदांच्या कादंबऱ्या म्हणजे भावनांचं अजब रसायन असतं, भावकल्लोळ असतो. 'मृण्मयी'सुद्धा तशीच.  वाचताना अंतरंग ढवळून निघतात. आणि कोकणची पार्श्वभूमी, निसर्गाने मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण यांचं वर्णन हे अजून एक वैशिष्ट्य. आठवीत असताना मराठीमध्ये 'शितू' नावाचा एक धडा होता तो याच कादंबरीतला. तेव्हा साहित्यातला ओ कि ठो कळत नव्हता. आत्ताही फार कळतं अशातला भाग नाही, पण आता साहित्य वाचण्याएवढी संवेदनशीलता आली आहे एवढंच. अजून काय लिहिणार? 'पाठवणी' वाचून शितूबद्दलच्या अपेक्षा फार उंचावल्या आहेत. आणि मी आत्ताच ती वाचायला लागणार आहे. 

सोमवार, १७ जून, २०१३

कन्सर्न

परभणीसारख्या छोट्या रेल्वे स्टेशनवर  सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची, विशेषतः अप-डाऊनवाल्यांची, प्रचंड गर्दी असते. आणि त्यातले ९० टक्के लोक रूळ ओलांडण्यासाठी दादऱ्याचा वापर करण्याची तसदी घेत नाहीत. प्लाटफॉर्म वरून उडी मारून रूळ ओलांडायचा जन्मसिद्ध हक्कच. आणि यातले बरेच लोक ऐन गाडी सुटायच्या वेळी प्रकट होतात. मग चालत्या रेल्वेत चढायची धावपळ सुरु होते.कुणी वेगात असलेल्या रेल्वेत शिरतात, कुणी शिरू पाहतात,  कुणी प्लाटफॉर्म एकवर उभ्या असलेल्या गाडीतून पलीकडे प्लाटफॉर्म दोनवरच्या गाडीत जाऊ पाहतात आणि दोन्ही गाड्या चालू होतात. ही असली स्टंटबाजी पाहून इकडे प्लाटफॉर्मवर मी श्वास रोखून त्यांच्या सुरक्षेची चिंता वाहत असतो आणि माझ्याच हृदयाचा ठेका चुकतो. पण मनोमन या असल्या स्टंटबाजांचा खूप रागही येतो. उगाच जीव टांगणीला लावतात माणसाचा. त्यापेक्षा जरा लवकर आलं तर काय बिघडतं? खरं तर मला चिंता करायची मुळीच गरज नाही पण तरीही कन्सर्न हा मानवाचा स्वभाव विशेष आहे, नाही का? 

शुक्रवार, १४ जून, २०१३

...पण टाईम नाही ना राव.

आजकाल ना वेळच पुरत नाही राव. संध्याकाळी पाच सहा वाजता labमधून आलं कि एक-दीड तास बॅडमिंटन, मग मेसवर जाऊन जेवण, मग सायकलवर जी. सी. पर्यंत फेरफटका आणि नाऊ वाजतात. मग जरा वेळ काही वाचलं किंवा फोनवर घरी बोललं  किंवा एखाद दुसरं गाणं ऐकलं कि दहा. आणि मनाचा काउंटडाऊन सुरु होतो. आता झोपायला हवं असं म्हणत म्हणत टाईम पास होतच असतो. आणि शिवाय दहा वाजता जरी आडवा झालो तरी एक दोन वाजेपर्यंत उगाच पडून राहावं लागतं. झोपच येत नाही ना. मग मनाची मुक्त भटकंती चालते.  कधी स्वप्नं, कधी plans, कधी कल्पनाविलास. मग दोन तीनच्या सुमारास नकळत स्वारी निद्राधीन होऊन जाते.  आणि नेहमीप्रमाणेच सकाळी उठायला साडेआठ नाऊ वाजतात. मग ब्रेकफास्ट मिस होतो. अंघोळ वगैरे करून झालं कि डिपार्टमेंट, मग कँटीनमध्ये चहा बिस्कीट खाऊन lab. मग एखादा रिसर्च पेपर काढून वाचत बसणं त्यातही दहा वेळा gmail  आणि facebook चेक करणं, मग एखादा कन्सेप्ट नाही समजला कि त्याचे बेसिक्स वाचणं असं करत करत साडेबारा वाजतात मग जेवायला जायचं असतं. एक दीड वाजता जेऊन आल्यावर परत तोच पेपर. आता त्यातली अक्षरे धुसर दिसायला लागतात. दोन दोन आकृत्या दिसायला लागतात. निद्रा आणि जागृती असं तळ्यात मळ्यात स्विचिंग चालू होतं. हा स्विचिंग फेज एक दीड तासांचा असतो किंवा कधी कधी दोन तासांचासुद्धा. यामधून बाहेर पडण्यार्थ अजून एक कँटीन दौरा निघतो.  दांडी यात्रेसारखे बरेच जन तिथे येउन मिळतात. मग जगाच्या पाठीवरचे गंभिरेश्ट विषय घेऊन त्यावर खल होतो. आपलं मत मांडण्यार्थ एकेक जण पुढे सरसावतात. आता रिसर्च स्कॉलर म्हटल्यावर सर्वांचाच सर्वच विषयांचा सखोल अभ्यास असणार हे वेगळं सांगायला हवं का?(:p).   एव्हाना साडेतीन चार वाजलेले असतात. मग स्वारी परत labमध्ये.  जरासं वाचणं होतं. सकाळी डोक्यात उगवलेल्या  आयडियाज आता असंबद्ध वाटायला लागतात. मग थोडंसं मंथन केलं कि काही नवीन आयडीयाज उगवतात. पण दिवसभर कसली कसली गणिती भुतं पाहून प्रोसेसर आता जाम गरम झालेला असतो. अधून मधून हँग व्हायला लागतो. मग बाकी सगळं उद्यावर सोडून स्वारी labच्या बाहेर पडते… आणि एक सर्किट कम्प्लीट होतं. हे सर्किट ब्रेक करायचं स्वारीच्या मनी आहे. पण टाईम नाही ना राव.

गुरुवार, १३ जून, २०१३

शब्दांचा ढीग


कधीकधी आपण गणपती करायला जातो पण त्याचा मारुती होतो. याचं उदाहरण म्हणजे खालचा परिच्छेद. उगाच जुळवून आणलेल्या शब्दांचा ढीग. टारझनसारखं एक पारंबी सोडून दुसरीला लटकायचं असं केलंय. आणि शेवटी जिथून निघालो तिथे परत. केकुलेच्या स्वप्नातल्या सापासारखं. 

आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो. सुखाच्या सावलीत दुःखाच्या झळा जाणवत नाहीत. भलेही ते कितीही तीव्र असो. भूतकाळच तो. त्या दुःखाचे व्रण तेवढे मनावर राहतात. काळाबरोबर ते धुसर होत जातात. तरीही त्यांना आपण किती जपतो! मुळात सुखी राहण्याची माणसाची प्रवृत्तीच नाही का? बरं एवढ्यावर कुठे आपलं समाधान होतं? आपली दर्दभरी कहाणी कुठेतरी कथन करावी असा अट्टाहास. आपण जे भोगलंय, जे सोसलंय, ज्या धैर्यानं कठीण प्रसंगाला तोंड दिलंय त्याची स्टोरी ऐकणारं कुणीतरी हवं असतं. मग अर्थातच त्या कथेचं उदात्तीकरण आलं. इथे ऐकणाऱ्या व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती अपेक्षित असते. इथेच नात्यांची गरज निर्माण होते. नातं मग ते कसलंही असो त्यात ओलावा हवा. ओलावा नसलेली नाती रुक्ष असतात. वठलेल्या झाडासारखी. ती सावलीही देत नाहीत आणि फळेही. ती असली तरी नसल्यासारखीच. त्यांचा आधार वाटण्यापेक्षा ओझंच वाटत राहतं. असली ओझी डोक्यावरून उतरवताही येत नाहीत. ती तशीच आयुष्यभर वाहावी लागतात. आयुष्यात असल्या नात्यांसारखीच कितीतरी ओझी आपण वाहत असतो. आणि आयुष्य बोजड करून  टाकतो. त्यामुळे समोर आलेलं सुखही आपल्याला नीट दिसत नाही. त्याला डावलून आपण पुढे जातो. अज्ञात सुखाच्याच मागे धावत. आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो… 

रविवार, ९ जून, २०१३

लहानपण

आयुष्याच्या एका टप्प्यावर लहानपण हरवलं आणि आता किती किती दूर आलो त्यापासून. इथून ते नीट दिसतसुद्धा नाही. धुसरलेल्या काही आठवणी तेवढ्याच तरळत राहतात. दुःख ते लहानपण हरवल्याचं नाही कारण एका मुक्कामावर ते हरवणारच होतं. दुःख आहे ते त्याबरोबर बरंच काही गमावल्याचं. ती निरागसता, तो जगण्यातला मनमुरादपणा आणि बरंच काही हरवत गेलं. अजून किती आठवणी म्हणून आहेत श्वासांत, गंधांत,स्पर्शात,  हृदयात, डोळ्यांत साठून राहिलेल्या.  पण फक्त आठवणीच तेवढ्या.  त्यांच्यापर्यंत आता पोहचता येत नाही. त्या शब्दांच्या आवाक्यातसुद्धा येत नाहीत. 




गुरुवार, ६ जून, २०१३

आनंद

जीवनात आपण नेहमी कशाच्या तरी शोधत असतो, पण ते नेमकं काय असतं हे आपल्यालाही ठाऊक नसतं. खरं तर अगदी सगळीकडे,  म्हणजे चित्रपट, गाणी, कविता, साहित्य, नाती-गोती, सखे-सोबती वगैरे सगळ्यांमध्येच आपण आनंद शोधत असतो. यांपैकी काही ठिकाणी तो मिळतोसुद्धा.  मुळात आनंद आपल्यातच असतो. पण बऱ्याच वेळा बाहेर शोधूनही कुठे न सापडल्याने आपण निराश होतो. आपल्याला एकदम मोठं काहीतरी मिळवायचं असतं, मोठ्या आनंदासाठी. आणि त्या मोठ्या आनंदाच्या शोधत कुठेतरी आपण छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो. आणि मृगजळाप्रमाणे तो मोठा मासा काही आपल्या गळाला लागत नाही. 

मंगळवार, ५ मार्च, २०१३

रामेश्वरम

पाम्बन ब्रिज 
दि. २ आणि ३ मार्च रोजी रामेश्वरम आणि मदुराई अशी दुहेरी ट्रीप झाली. देवदर्शन आणि (निसर्ग)सौंदर्य दर्शन असे दोन्ही उद्देश साध्य झाले. भारताच्या अगदी पायथ्याशी म्हणता येईल असं रामेश्वरमचं लोकेशन . खरं तर रामेश्वरम हे मुख्य भूमीपासून तुटक असं एक बेट. पाम्बन ब्रिज हा मुख्य भूमी आणि रामेश्वरम यांना जोडणारा एकमेव दुवा. मंडपम हे मुख्य भूमीवरचं शेवटचं स्टेशन. एकदा ते ओलांडलं कि  पाम्बन ब्रिजचे वेध लागतात. सोबतीला असतात पश्चिमेकडे शांत आणि संथ असा हिंदी महासागर, त्याच्या किनाऱ्यावर डौलात उभी असलेली नारळी झाडं, सगळीकडे पसरलेली पंढरी रेताड जमीन अन माशांचा उग्र वास. मग थोड्याच वेळात मुख्य भूमी संपून गाडी पाम्बन ब्रिजवर प्रवेशते.  त्यावरून दिसतो तो अफाट समुद्र, फिशिंग हार्बर मध्ये नांगरून पडलेल्या नौका, हिंदी महासागरचं निळंशार आणि बंगालच्या उपसागराचं हिरवट पाणी यांचा संगम. निसर्गाच्या भव्यतेची जाणीव सुरु होते ती इथून. रामेश्वरम शहर (कि गाव?)  हे बेटाच्या अगदी त्या टोकाला वसलेलं अगदी छोटंसंच. हिंदू, मुस्लिम, क्रिश्चन असे तिन्ही धर्मीय इथे गुण्या गोविंदाने नांदतात. 
रामेश्वरम बेट  (गुगल mapवरून ) आणि आग्नेयेला रामसेतू  


पाम्बन ब्रिजच्या जवळ 



आपण रामेश्वरममध्ये येतो आणि त्या ज्योतिर्मय शिवशंकराच्या दर्शनाची ओढ लगते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल हे वैभवशाली ज्योतिर्लिङ्ग. बाराव्या शतकात पांड्या राजांनी बांधलेल्या या मंदिराचा गाभारा भारतातल्या सगळ्या मंदिरांत लांब आहे.  मंदिराला दोन प्रवेश द्वारे आहेत- एक पूर्व द्वार आणि दुसरं पश्चिम द्वर. आत प्रवेश पश्चिम द्वारातून आहे. पण प्रवेशापूर्वी काही जण मंदिरात असलेल्या बावीस तीर्थांमध्ये स्नान करून घेतात. मग शिवाच्या भेटीसाठी दर्शनाच्या रांगेत तिष्ठत उभे रहतात.  शिवशंभुला प्रत्यक्ष आणि मनोमन कित्येक नमस्कार करून त्याच्याशी संवाद चालू होतो. मन पवित्रतम होते. राग, लोभ वगैरे षडविकारांचा  लवलेशही राहत नाही. आणि मग बराच वेळ तिष्ठत काढल्यावर एकदा तो शिव दर्शनाचा अमृतयोग येतो. भव्य अशी ती शिवपिंड पाहून कृतार्थ झाल्याची भावना होते.  
इथे अवघ्या भारतातून येणाऱ्या  भक्तांची गर्दी बाराही महिने असते.  आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्त जणांची संख्या सुद्धा लक्षणीय असते. त्यामुळे इथे मराठी, मारवाडी, गुजराती, उत्तर भारतीय अशी (फक्त) हॉटेल्स (जेवण नाही) आढळून येतात. 

देवदर्शन झाल्यावर त्याची निर्मिती असलेल्या भव्य निसर्गाचं दर्शन करण्यासाठी आम्ही धनुषकोडीला जायला निघालो. धनुषकोडी रामेश्वरम बेटाच्या आग्नेय टोकावर एकेकाळी असलेलं गाव.  १९६४ च्या चक्री वादळात तिथल्या बऱ्याच रहिवाशांसह नष्टप्राय झालेलं. तेव्हापासून तमिळनाडू सरकारने मानवी वस्ती साठी अयोग्य म्हणून घोषित केलेलं.  तरीही इथे तुरळक वस्ती आहे. शिक्षण तर सोडाच वीज सुद्धा माहिती नसलेली ही वस्ती. पर्यटन हाच इथल्या उपजीविकेचा मुख्य  पर्याय . थोड्या फार प्रमाणात  मासेमारी  करून, सागरी शंख शिंपले विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. रामेश्वरम हून जाणारी बस जुन्या धनुषकोडीपर्यंत जात नाही. मध्येच जिथपर्यंत पक्का  रस्ता आहे तिथ पर्यंत सोडते. तिथून पुढे रामसेतू कडे जाण्यासाठी रस्ता वगैरे नाही. आणि ट्रान्स्पोर्टचं एकमेव साधन म्हणजे खासगी वाहने. जणं आणि येणं शंभर रुपये पर हेड. आणि तिथे अर्धा तासच थांबायला भेटतं. सगळा प्रवास रेतीमधून. जायला अर्धा तास लागतो. 

तरंगता दगड 

जीपमध्ये बसून निघाल्यापासून पंधरा मिनिटांत आम्ही मधल्या एका मुक्कामावर पोचलो. इथे जुन्या रेल्वे स्टेशनचे, चर्चचे  अवशेष पाहायला मिळतात. इथेच एका झोपडीसदृश मंदिरात एक तरंगता दगड सुद्धा बघण्यात आला. तो प्रवाळाचा असावा.  आमचा जीप ड्रायवर गाईडचीसुद्धा भूमिका बजावत होता. इथेच पाण्यासाठी खोदलेले विहीर वजा खड्डे पाहायला मिळाले. अवशेषांचं दर्शन करून करून आम्ही पुढे निघालो. आता उजव्या बाजूला शांत हिंदी महासागर आणि डाव्या बाजूला बंगालचा उपसागर असं दृश्य दिसू लागलं. दोहोंच्या मध्ये असलेल्या शे-सव्वाशे फुट रुंदीच्या पट्ट्यावरून आमची जीप जात होती.  हा रामसेतू. 



रामसेतूवर 
रामसेतू: भारत भूमीचं टोक. इथून जवळपास दहा किलोमीटरवर श्रीलंका  (फोटो सौजन्य: गुगल)


आणि एकदाचे आम्ही त्या टोकावर पोहचलो. इथला निसर्ग काय वर्णावा ? अथांग पसरलेला तरीही शांत असा हिंदी महासागर, उधणणारा बंगालचा उपसागर, त्यांच्या मधला जमिनीचा अरुंद पट्टा, त्यावर मोजकेच पर्यटक, दूर समुद्रात दिसणारी जहाजे, डोक्यावर तळपणारा सूर्य, सुसाट वाहणारा वारा, नितळ निळं पाणी असं ते नितांत सुंदर दृश्य शब्दांच्या आवाक्यात येतच नाही. मी, प्रशांत, नगेन्द्रन आणि विशाल असा आम्हा चौघांचा ग्रुप. पैकी माझी बहुतेक वेळा फोटोग्राफारची भूमिका असायची. बाकी तिघे समुद्रात उतरून मनसोक्त भिजत होते. मी मात्र किनाऱ्यावरच उभा राहून सृष्टी सौंदर्य डोळ्यांत, श्वासांत, हृदयात आणि कॅमेऱ्यात भरून घेत होतो. 



विशाल, प्रशांत आणि नगेन्द्रन 

त्या निळ्याशार, फेसाळणाऱ्या सागराला पाहून सगळ्या चिंता, सगळी टेन्शन्स कुठल्या कुठे पळून गेली. राहिलो फक्त मी आणि आनंद. इथे निसर्ग भव्य आणि सुंदरही आहे. आपलं अस्तित्व विसरायला लावणारं त्याचं ते रूप. रामाच्या चरणांनी पवित्र झालेल्या त्या भूमीशी येउन सागरही प्रसन्न झालेला. आणि आपल्या अक्षय आनंदाची अभिव्यक्तीच तो त्याच्या लाटांमधून करत असेल. 

सुमारे तासभर तिथे घालवल्यानंतर आमचा धनुष्कोडीकडे परतीचा प्रवास सुरु झाला.  किंबहुना ड्रायवरला दुसऱ्या ट्रीपची घाई असल्याने आम्हांला परतावं लागलं. परतीच्या वेळी जीप मधून टिपलेली ही काही क्षणचित्रे 





धनुष्कोडीला आम्ही सुमारे साडेचार पाच वाजता पोहचलो. तिथेही मी वगळता बाकीच्या त्रिकुटाला समुद्रात उतरायची लहर आली.  इथे लाटा बऱ्यापैकी उंच होत्या. सूर्य आता पश्चिमेकडे झुकला होता. पण तो मावळतीचा क्षण टिपायला कॅमेऱ्यात त्राण उरले नव्हते. म्हणून तो क्षण डोळ्यांतच साठवून आम्ही रामेश्वरमकडे परत निघालो. 









मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

एक धागा सुखाचा


'उद्या'च्या गर्भातून डोकावणाऱ्या आशेच्या सोनेरी किरणांच्या बळावर आपला 'आज' सुसह्य होत असतो. उद्याच्या उंबरठ्यावर गेल्यावरही तिथे अंधार पाहून थोडीशी निराशा होते. पण त्यालाही सोनेरी आशा उरी बाळगणारा 'उद्या' असतो. हे अविरत चालूच राहतं. कधीकधी तो सोनेरी क्षण हाती लागतोसुद्धा. पण ज्यासाठी हा आटापिटा केला होता त्याचं आयुष्य फक्त एका क्षणापुरतंच ही जाणीव मात्र उद्विग्न करते. मग त्या सोनेरी क्षणाचा आनंद अन विरह असा संमिश्र भावकल्लोळ. आणि तो किंवा तसा क्षण पुनः प्रकटावा यासाठी परत 'आज' 'उद्या'चा खेळ आणि मध्येच दही दिशांनी चालून येणारे काही काळेकुट्ट क्षण, त्या सोनेरी क्षणांपेक्षा कैक पटीने महाकाय. कधीकधी प्रश्न पडतो हेच का आयुष्य? त्या सुखाच्या, आनंदाच्या एका धाग्यासाठी दुःखाचे, विरहाचे,उद्वेगाचे शेकडो धागे गुंफून बनवलेलं जरतारी आयुष्याचं वस्त्र ल्यायचं? नियती देईल ते मुकाट पदरी पडून घेऊन आनंदी असल्याचं स्वतःलाच सांगायचं? का नाही बंड करायचं याविरुद्ध? आम्हांला सुखाचे शेकडो धागे असलेलं जीवनवस्त्र हवंय. किंमत बोला...!!!

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

गर्दी

गर्दीचा मला भयंकर तिटकारा वाटतो. गर्दीत मिसळणारा प्रत्येकच जण आपला चेहरा, आपली ओळख, आपल्या भावना सर्व काही हरवून गर्दीत शिरतो आणि त्या यंत्रवत समूहाचा भाग होऊन जातो. भीतीचं एक वलय नेहमी आपल्या भोवती घेऊनच त्या गर्दीत वावरतो. गर्दीला दिशा नसते. भरकटलेल्या थव्यासारखी ती फक्त गतिमान असते. त्यातल्या प्रत्येक पाखराची दिशा वेगळी, दशा वेगळी ...प्रत्येक जण आपल्यापुरताच. माणुसकीचा ओलावा आटून  गेलेला. 

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३


आपले पोलिस आणि सरकार यांना तहान लागल्याशिवाय विहीर खोदायची गरज वाटत नाही. जेव्हा कुठेतरी स्फोट होतो तेव्हाही हे एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याशिवाय दुसरं काहीही करत नाहीत. सरकार पोलिसांवर, पोलिस गुप्तचर यंत्रणेवर खापर फोडून जबाबदारी झटकू पाहतात. मग 'तपास चालू आहे', 'हे सहन केलं जाणार नाही',  असल्या पोकळ गप्पा मारल्या जातात. त्यांच्यात काहीही तथ्य नसतं. इतके स्फोट झाले आजपर्यंत, तरीही यांचं दरवेळी बेसिकपासूनच सुरु होतं. आतापर्यंत एक predictive model नाही बनवता आलं यांना? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे शेंबड्या पोरालाही कळतं, मग का नाही पाकिस्तानचं नाक दाबत? या स्फोटाचा कट इस्लामाबादमध्ये शिजला हे उघड आहे. मग का पाकिस्तानशी असलेले संबंध नाही तोडत? पण नाही... इथे आपल्या मंत्रिमंडळात बरेच पाकधार्जिणे लोक बसलेत. आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही आणि हे पाकिस्तानातून कांदा आयात करतात आणि इथे आणून तो सडवतात. 

इथे स्फोटात लोक जीवानिशी जातात पण यांना काय त्याचं? ए.सी.मध्ये बसलेल्या त्यांच्यापर्यंत स्फोटाची झळ आणि आवाज दोन्हीही कसं पोचणार? नुसता स्फोट झाल्या ठिकाणी दौरा केल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी वेळीच प्रतिबंधक उपाय करावे लागतात आणि हितसंबंधांच्याही पलीकडे जाऊन निर्णय घ्यावे लागतात. उगाच ए.सी.मध्ये खुर्चीवर बसून  दहशतवादाला रंग देत बसलं कि आपल्या XXखाली बॉम्ब ठेवला तरी पत्ता लागत नाही आणि हे असले स्फोट होतात.

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

मानवाधिकाराचे मक्तेदार

पुन्हा एका फाशीच्या निमित्ताने मानवाधिकाराचा डंका वाजवणाऱ्यांना निमित्त मिळालंय. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने तर अफझल गुरूला दिलेली फाशी कशी चुकीची आणि अन्यायकारक आहे यावरून लेखांचा भडीमार केला आहे. मागे कासाबच्या फाशीच्या वेळीही काही मानवाधिकाराच्या मक्तेदारांना भरून आलं होतं.  आणि आता अफझल गुरूसाठी ह्यांची एकच रडारड कि त्याला प्रतीवादाची पुरेशी संधी नाही देण्यात आली, त्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी वापरलेले पुरावे पुरेसे नव्हते, इत्यादी.  यांच्या लेखी दहशतवादी तेवढेच मानव. त्यांच्यामुळे नाहक बळी गेलेल्यांच्या मानवाधिकाराचं काय? जेव्हा कसाबच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या शेकडो निरपराध्यांचे प्राण घेऊन जात होत्या तेव्हा त्यांचा काय दोष होता? त्यांच्यावरचे कुठले आरोप सिद्ध झाले होते?  भारताच्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा तिथे ज्या सुरक्षारक्षक आणि जवान यांना हौतात्म्य आलं त्यांच्या जगण्याच्या मुलभुत अधिकाराचं काय? त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंग ओढवला त्याचं काय? जेव्हा इथे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात तेव्हा मानवाधिकाराच्या नवे ओरडणाऱ्या तथाकथित बुद्धीजीवींची दातखीळ बसते कि काय? काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मानवाधिकारांची चिंता करणाऱ्यांना भारतीय सेनादलातील जवानांचे बलिदान दिसत नाही का? 

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

कुणी एक उठून दहशतवादाला भगवा रंग देतो आणि हिरव्याचा कैवारी असल्याचा 

आव आणतो. कुणी दुसरा उठून आपल्या इतिहासात शिरतो आणि वाटेल तसा 

गोंधळ घालतो. मग कुणी तिसरा उठून आमच्या श्रद्धा, आमची आराध्ये यांना 

संकुचित ठरवू पाहतो. निकटच्याच काळात कदाचित या श्राद्धांनाही अंधश्रद्धा ठरवून 

त्यांचंही निर्मुलन करण्याचा घाट एखाद्या तथाकथित 'पुरोगामी, उदारमतवादी, 

धर्मनिरपेक्ष' व्यक्ती किंवा संघटनेने घातला तर नवल वाटायला नको. धर्मनिरपेक्षता 

आणि धर्मविरोध यांच्यातला फरक न कळणारं किंवा तो कळूनही धर्माला 

निवडणुकीतला एक्का बनवू इच्छिणारं नेतृत्व लाभल्यावर कसली अपेक्षा करणार?