पृष्ठे

शनिवार, १३ जुलै, २०१३

समाजविदारक

आज समाजसुधाराक असल्याचा आव आणून समाजातल्या अनिष्ट गोष्टींवर बोलण्या/लिहिण्याऐवजी कुठल्या तरी धर्माला टार्गेट करून त्यावरच टीकेचा भडीमार करणाऱ्या समाजविदारकांची संख्या खूप वाढली आहे. म्हणजे वरवर पाहता हे खूप मोठे तत्त्वज्ञ किंवा विचारवंत असे भासतात पण समाजाला सुधारणे हा त्यांचा हेतू नसतो तर फक्त धर्माला नवे ठेवणे, त्यात दोष शोधणे, एखाद्या विभूतीचं वस्त्रहरण करणे असलाच हेतू असतो अन तेच उद्योग हे करत असतात. अनिष्ट रूढी, परंपरा यांना विरोध जरूर असावा. जे जे अनिष्ट आहे ते धर्माने त्यागावं आणि काळानुरूप बदलावं तरच तो धर्म टिकेल.  पण केवळ अनिष्ट रुढींचा अंतर्भाव आहे म्हणून तो धर्मच वाईट ठरवणं हे कुठलं शहाणपण? पायात काटा घुसल्यावर काटा काढायचा कि पायच कापून टाकायचा? हे असले समाजविदारक म्हणजे पाय कापून टाकण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरसारखे आहेत. 

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

पाऊस: तेव्हा


मी सहावी सातवीत असेल. शाळा घरापासून जवळपास एक-दीड किमीवर होती.    शाळेवर टीनची पत्रे होती. तेव्हाचा पाऊस पण माझ्या एवढा होता. कधी कधी दुपारीच मध्यंतरनंतर आभाळ भरून यायचं. काळंकुट्ट व्हायचं. शाळेच्या अवती भवति सगळी शेतंच शेतं होती. आणि माझी जागा नेमकी विंडो सीट असायची. मग काय बाहेर एकदम मस्त चित्र दिसायचं. शेतांमध्ये कुठे भुईमुग, कुठे ज्वारी, कुठे ऊस, कुठे कापूस अशी पिकं डुलत असायची. आणि ढगाळ वातावरणात पिकांचा हिरवा रंग अजूनच खुलायचा. थंड वारा सुटायचा. खिडक्यांची आदळ आपट व्हायची. शिकणं शिकवणं बाजूलाच राहायचं. सगळेच मग पावसाचा आनंद घ्यायला सज्ज व्हायचे. थोड्याच वेळात मग एक थंड झुळूक यायची आणि त्यामागोमाग हलक्या सारी उतरायच्या. पत्रांचा आवाज व्हायचा. ते एक संगीतच असायचं. मग त्या आवाजामध्ये आम्हा मुलांचा आवाज मिसळून जायचा. बोलायला तेवढीच संधी मिळायची. आता इथून पुढचे तास होणार नाहीत याचा अजून आनंद असायचा. मग कुठे कुठे पत्रे गळायला लागायची. बेंचेस मागे पुढे सरकवले जायचे. मग मध्येच विजेचा कडकडाट. पण त्याला कोण जुमानतो? शाळेचं ग्राउंड ओलं चिंब होऊन जाई. त्यावरचे खोखोचे पोल्स स्थितप्रज्ञपणे भिजत उभे असायचे. नवीनच लावलेली नारळाची आणि इतर झाडं पावसात नाहून निघायची. शाळेच्या भिंतींतून पाणी झिरपू लागायचं. बाहेर एखादं कुत्रं अंग चोरून झाडाशी उभं असलेलं दिसे आणि त्या बिचाऱ्याची दया येई. रस्त्यावरून एखादीच भिजत जाणारी सायकल दिसे. हवेसोबत उडणारे पावसाचे फवारे बघायला अजूनच मजा येई. मग पाऊस कमी झाला कि शाळा सुटायची. आणि सगळे एकदम गोंधळ करत वर्गाबाहेर पडायचे. पावसाशी पाठशिवणीचा खेळ सुरु व्हायचा. त्यानं गाठायच्या आत घरी पोचायचं असे. पण तो कसला आम्हांला कोरडा सोडतोय? बरोबर अर्ध्या वाटेत आलं कि गाठायचा. आणि तो येताना दिसायचा. कधी कधी आम्हांला समांतर शेतांतून चालायचा. पण मग आमच्याकडे मोर्चा वळायचाच त्याचा. मग काय छत्री असेल तर तिचा आडोसा नाहीतर भिजत जायचं. भिजल्याच्या भीतीपेक्षा भिजल्यावर घरी रागावतील याचीच भीती असायची. पण तरीही सगळ्यांसोबत भिजायला मस्त वाटायचं. रस्त्यांवरून ओहाळ वाहायला लागायचे. त्यातून चालायला मजा यायची. एखादं वाहन आलं कि सगळे रस्त्याच्या खाली उतरायचो. पण तरीही पाणी उडून अंगावर यायचंच. मग सगळे एका आवाजात  त्याला ओरडायचे. एखाद्या झाडाखालून जाताना आमच्यावर पाणी उडवून ते झाड सुद्धा आम्हांला भिजवून टाकीत असे. तेव्हा जे शिकलो, जे घडलो ते या पावसाच्याच साक्षीनं, याच्याच सान्निध्यात. आताही तो आला कि या आणि इतरही सगळ्याच पावसाळी आठवणी घेऊन येतो. मनाला ओलं चिंब, हिरवं करून टाकतो. 

आठवणींना धुमारे 
मनाला शहारे 
गर्द हिरवे नजारे 
म्हणजे पाऊस 

मनाचं चिंब होणं 
आठवणींत धुंद होणं 
मृद्गंधाचं मंद दरवळणं  
म्हणजे पाऊस 



गुरुवार, ४ जुलै, २०१३

अश्वत्थामा

(डोक्यावर भळभळणारी जखम आणि अमरत्वाचा शाप घेऊन मरणाची वाट बघणाऱ्या अश्वत्थाम्याची व्यथा. )

जगणं सरलं आयुष्य उरलं 
मरणाची आता वाट बघतोय 

दिवस सरला अंधार उरला 
पसरत जाणारी रात बघतोय 

तेल सरलं दिवा विझला 
उरलेली मागे वात बघतोय 

कर्तृत्व सरलं नशीब उरलं 
आशेनं मोठ्या तळहात बघतोय 

चुकलेल्या वाटांचं प्रतिबिंब पुन्हा 
भळभळणाऱ्या घावात बघतोय