पृष्ठे

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


रोजच्यासारखीच तरीही एक नवी पहाट, 
एक नवा दिवस, एक नवी सुरुवात, 
नव्याची झळाळी लाभलेली जुनीच स्वप्नं, 
जुन्या दुखण्याचं नव्यानं खूपणं, 
ते सहण्यासाठी नव वर्षीचा नवा सूर्य,
नव्या क्षणांचं नवनिर्मित  ऐश्वर्य.
सगळीकडेच नव्याचा दरवळ. 

या नव्या नवलाईचे भोक्ते असलेल्या आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

निर्जीव कोलाज



प्रत्येक राष्ट्राचा एक आत्मा असतो ज्याच्या बळावर ते राष्ट्र जिवंत असते. इस्राइल, अरेबिअन राष्ट्रे, युरोपिअन राष्ट्रे, चीन, जपान, अमेरिका, रशिया अशी किती तरी उदाहरणे देता येतील. या राष्ट्रांकडे बघितल्यावर एक लक्षात येतं कि काहीतरी गोष्ट त्यांच्यामध्ये आहे जी  तिथल्या लोकांना एकजूट व्हायला भाग पाडते. ती गोष्ट इतिहास असेल, भाषा असेल, कायद्याचे भय असेल किंवा इतर काही असेल. राष्ट्रवाद हा तिथल्या लोकांच्या रक्तात भिनलाय असं म्हणता येईल. आणि आपल्याकडे तो फक्त पक्षाच्या किंवा संघटनांच्या नावापुरताच शिल्लक राहिलाय. आपल्या देशाकडे एक नजर टाकली तर दिसून येईल कि आपल्यालाही वैभवशाली इतिहास आणि संस्कृती लाभली आहे. पण तरीही आपल्या राष्ट्राचा आत्मा म्हणता येईल अशी कोणतीच गोष्ट दिसून येत नाही. लोकांना फक्त आणि फक्त आपला स्वार्थ साधण्याशिवाय काहीच सुचत आणि दिसत नाही. कायद्याचं भय फक्त सामान्य माणसालाच आहे. राजकीय नेत्यांना ना कसला कायदा ना कसली नीती. भारत म्हणजे केवळ इतिहास नव्हे, केवळ आपली संस्कृती नव्हे, केवळ आसेतुहिमाचल पसरलेली भूमी नव्हे. भारत म्हणजे भारतीय मन, भारतीय समाज. तो समाज कुठे आहे या गर्दीत? इथे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आहेत; ओ. बी. सी., एस.सी./एस.टी. आहेत; मराठी, गुजराती, तमिळ, तेलगु, बंगाली आहेत; उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आहेत. सगळे आपापलाच ढोल वाजवत आहेत. आणि या सर्वांहून वेगळे असे काही समूह आहेत उच्चभ्रू म्हणवणारे ज्यांना या सगळ्याशी काही घेणंदेणं नाही. आपण चुकून भारतात जन्माला आलो असं वाटणारा समूहसुद्धा इथे आहे. राजकीय नेते आहेत जे या सगळ्याचा फायदा कसा घेत येईल याशिवाय दुसरा विचार करूच शकत नाहीत. अजून किती ऱ्हास होणार आपला? व्हिजन २०२० वगैरे सगळ्या पोकळ गप्पा आहेत. जिथे सामान्य माणूस आपल्याच शहरात, गावात सुरक्षित नाही तिथे कसल्या विकसित राष्ट्र होण्याच्या गप्पा करता? इथे समाजात जरा काही खुट्ट झालं तरीही सत्ताधारी मंडळी आपापली आसनं सांभाळायला लागतात. विरोधकही काही धुतल्या तांदळाचे नाहीत. तेही त्याच पंक्तीतले आहेत. 

आपण म्हणजे आसेतुहिमाचलावर कोणे एके काळी जिवंत असलेल्या भव्य राष्ट्राच्या कालेवारापासून तयार होऊ घातलेला एक निर्जीव कोलाज आहोत बाकी काही नाही. आपल्यातलं डोळे दिपून टाकणारं तेज केव्हाच अस्ताचलास गेलंय. 

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

प्रश्न...

जन्माला येणं ते कशासाठी, काय म्हणून? ही शिक्षा कि वरदान? जगणं तेही कोण्या करणे ? केवळ मरण येत नाही म्हणून? अन हे अज्ञान तरी का म्हणून आणि जर उत्तरेच मिळणार नसतील तर हे डोक्यात येणारे प्रश्न तरी कशासाठी? देव कोण आहे आणि तो आमच्यापासून असा लपून-छपून का राहतो? आम्ही काय गुन्हा केलाय? मुळातच तो आहे कि नाही? आहे म्हणावं तर बुद्धी त्याच्या अस्तित्वावर हजारो प्रश्नांचं कुंपण चढवते आणि नाही म्हणावं तर मन हट्टाला पेटून त्याचं अस्तित्व मान्य करायला लावतं. सत्य मात्र मन आणि बुद्धीच्या वादात न पडता दूर कुठेतरी दृष्टीक्षेपाच्या पार पलीकडे उभं असतं.  आधी अस्तित्वासाठी लढणं, मग ते टिकवण्यासाठी आणि एकदा का ते शाश्वत झालं कि मग समृद्धीसाठी धावणं हे असं अविरत चालू असतं. 

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२

संकीर्ण....


(डोक्यात जरा जास्तच थैमान चाललं होतं. म्हटलं चला शब्दांकित करू...)

संस्कार किंवा आपली जडणघडण हे एक प्रकारचं प्रोग्रामिंग असतं. लहानपणापासून आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे अनुभवतो ते सर्व आपल्या विचारांची, आपल्या मतांची दिशा ठरवीत असतात. पण केवळ बाहेरच्या गोष्टी किंवा आपल्या अवतीभवतीची परस्थिती आपल्या बुद्धीचा ताबा घेता कामा नये. जे काही म्हणून आपण ग्रहण करतो त्यावर चिंतन होणे, त्याची सत्य-असत्यात पडताळून पाहणे, ते कोणत्या काळी कोणत्या स्थळी लागू होतात हे पाहणे आवश्यक आहे. ते व्हायला हवे. नाहीतर ज्यांना आपण आपली मते म्हणतो ती आपली असत नाहीत.  ती आपल्यावर पडलेले केवळ प्रतिबिंब असतात. ती मते किंवा विचार किंवा विचारप्रवाह आपणाला कुण्या एका परिस्थितीत पटलेली असतात आणि आपण केवळ त्या मतांचे वाहक असतो. आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा बरेच लोक घेतात. आपण पाहतो आपल्या अवतीभवती किती तरी विचारप्रवाहांचे समूह आढळून येतात. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक असे बरेच कंगोरे असलेले समूह. आणि आपल्या समाजात नेमकं हेच होतंय.  या काही वर्षांत किंवा मागच्या दशकात होणाऱ्या घटनांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तर काय दिसून येतं? एक समाज म्हणून आपण कुठे जात आहोत? मला वाटतं एक समाज म्हणून आपलं अस्तित्वच नाही. रेल्वेस्टेशन वरच्या प्रवाशांसारखे आपण समाजात वावरत असतो. आपण आणि केवळ आपण एवढाच विचार आपल्या डोक्यात असतो. बाकीच्यांशी काही देणं-घेणं नाही. आपण राजकीय दृष्ट्या उदासीन आहोत, सामाजिक दृष्ट्या संवेदनहीन आहोत, सांस्कृतिक दृष्ट्या बाळबोध आहोत, धार्मिक दृष्ट्या असहिष्णू आहोत. आपल्या जे नेतृत्व लाभतं तेही आपल्याचमधून आणि तेही मग तसंच असतं - दिवाळखोर, भ्रष्ट, संवेदनहीन. जे राजकारणात आहेत त्यांना समाजाशी काही देणं नाही. ते आपल्याच पिशव्या भरण्यात मग्न आहेत. आणि बाकी बराच समाज ज्याचा राजकारणाशी तसा सरळ सरळ संबंध नाही तो राजकारण म्हटलं कि नाक मुरडतो. 

आम्हांला एकदम क्रांती हवीय, बदल हवाय. पण तो घडवून आणायला आम्ही तयार नाही. तो दुसऱ्या कुणी तरी घडवून आणावा. उत्क्रांतीची वाट पाहत थांबायची आमची तयारी नाही. साधं वेबपेज लोड व्हायला वेळ लागत असेल तर उद्विग्न होणारी आमची पिढी. संयम कशाला म्हणतात हे आम्ही मुळी विसरूनच गेलोत. प्रत्येक गोष्ट घडायला वेळ लागतो हे मान्यच नाही आम्हांला. गर्दीचा फायदा घेऊन घोषणा देणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. स्वतःची मते नाहीत, विचार नाहीत, असले तरी ते डळमळीत, त्यांच्यावर ठाम राहता येत नाही, कुणी त्याविरुद्ध विचार ठामपणे सांगितले कि तेही आम्हांला पटतात आणि मग आपला काय चूक होतं हेही आम्हांला काळात नाही. कुणीही येऊन टिकली मारून जावं तसं कुणीही येतं आणि आमच्या डोक्याचा भुगा करून जातं. याचं कारण काय? मुळात आम्हांला लहानपणापासून विचार करायलाच शिकवलं नाही. जे आहे ते स्वीकारा. प्रश्न नको. आणि मग आपल्या कारकून बनवणाऱ्या कारखान्यांतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा कळायला लागतं कि आपण एक माणूस आहोत आणि माणूस म्हणून आपली जडण घडण झालीच नाही....

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

कासाबला फाशी...

कासाबला फाशी हा एक प्रकारे उशिरा का होईना पण २६/११ च्या शहिदांना 

मिळालेला न्याय आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेत जो वेळ आणि पैसा खर्च झाला त्याचं 

समर्थन नक्कीच करता येणार नाही. हे आधीच व्हायला हवं होतं. त्यासाठी सरकार 

पूर्णतः दोषी आहे. ही फाशी दिली म्हणून सरकारचं अभिनंदन वगैरे करायची काही 

गरज नाही. हा उशीर खरं तर आपल्या व्यवस्थेचा पराभव म्हणता येईल. केवळ 

काही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या किंमतीवर सरकारचं हे पाप धुतल्या जाणार नाहीत



.आणि राजीनामे ते कसले? जनतेची दिशाभूलच होती ती. नेभळट नेतृत्व 



असल्यावर काय होतं हेच यातून सिद्ध झालंय. 




कासाबचा गुन्हा हा स्वयंसिद्ध होता. तो पुन्हा पुन्हा न्यायव्यवस्थेसमोर मांडून अजून 



काय सिद्ध करायचं होतं? आणि मुख्य म्हणजे कुणासाठी ? पाकिस्तानसाठी असेल 



तर अजूनही पाकिस्तान कसाबला त्यांचा म्हणून स्वीकारायला तयार नाही. खरं तर 



कासाब इथे अत्माघातासाठीच आला होता त्यामुळे या फाशीला अतिरेकी संघटना 



कितपत गंभीरपणे घेतील हे सांगता येत नाही. किंबहुना ही गोष्ट त्यांच्या 



खिजगणतीतही नसेल. यावरून त्यांनी एक धडा मात्र घेतला असेल कि जर 



भारतावर हल्ला करून तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला कमीत कमी दोन तीन वर्षे 



तरी सरकारचा पाहुणचार मिळतो.

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२

हे आज घडतंय कि पूर्वीही होतं माहिती नाही पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ती अशी कि स्वतःला नास्तिक म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या जरा वाढतच आहे. अन देव मानणे, मंदिरात जाणे वगैरे मागासलेपणाचं लक्षण समजलं जातंय. म्हणजे सर्वांनी आस्तिक असावं असं मी म्हणत नाही पण आस्तिकता आणि नास्तिकता या दोन विचारधारा आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. खरं तर आपण कसे आहोत आपल्या श्रद्धा काय आहेत यापेक्षा परिस्थितीनुसार स्वतःला प्रेझेंट करणं चाललंय. केवळ  नास्तिकताच पुरोगामीपणाची निदर्शक मानणाऱ्या समाजाकडे आपली वाटचाल होतेय. एक टोक आहे धर्मांध लोकांचे ज्यांना आपल्या धर्माशिवाय सगळेच निधर्मी दिसतात आणि दुसरे टोक आहे धर्म अफूची गोळी मानणाऱ्यांचे. यांना धर्म, देव नाव घेताच शिरशिरी येते. आणि यांच्यामध्ये काही जण आहेत जे 'आम्ही धर्मांध नाही' हे दाखवण्यासाठी स्वतःच्याच श्रद्धेला कडी लावतात किंवा चार-चौघात तसं दाखवतात आणि त्या दुसऱ्या टोकाकडे धावत सुटतात. आणि हे लोक स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवतात. विज्ञान काय आहे हे माहिती असो कि नसो. काही अंशी याचे श्रेय हे पश्चिमेचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या घाणेरड्या प्रवृत्तीला जाते. 

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

भुतं


बऱ्याच गावांत असतात तशी आमच्याही गावातसुद्धा काही (ग्राम देवतांसाराखी) ग्रामभुतं आहेत आणि त्यांच्या काही आवडत्या जागा आहेत. त्या जागांची नावे घेताच भीती वाटायला लागते. आमच्या शेताच्या जवळ कॅनॉलच्या दिशेला भगवती म्हणून असंच एक भुतांचं वसती स्थान आहे.  दुरून बघितल्यावर कसल्या तरी टेकड्या दिसतात तिकडे.  खरं तर तो भाग दिवसाही निर्जन असतो आणि रात्री तर फारच भयावह होतो.  तिकडे कुणाकुणाला भुताने दर्शन दिल्याचं ऐकिवात आहे. ती भुतं कॅनॉलमध्ये वाहून आलेल्या लोकांची असावीत असं म्हटलं जातं. पण त्या वाहून आलेल्या प्रेतांना आमच्याच गावी का म्हणून मुक्काम करावासा वाटतो हे एक कोडंच आहे.  अजून अशीच एक जागा म्हणजे आमच्या गावच्या जवळच एक ओढा आहे आणि त्यावर पूल आहे. या भागाला कट्टा म्हणतात. जवळ बरीचशी वडाची झाडे आहेत. त्यामुळे तिथे दिवसाही अंधार असतो. तिथेही काही जणांना भुतांनी दर्शन दिलंय असं म्हणतात. आणखी आवईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दूर कुठेतरी दिसणाऱ्या एका आंब्याच्या झाडावरसुद्धा एक भूत आहे म्हणतात. परत आमच्या मळ्यात खोकाड्या विहिरीत कुणा जीव दिलेल्या बाईचं भूत आहे म्हणतात. त्या विहिरीजवळच एक चिंचेचं झाड आहे ते भूत कधी कधी त्या झाडावरसुद्धा आढळून येतं.  तर भगवती, कट्टा, आंब्याचं झाड, खोकाडी विहीर, तिच्या जवळचं ते चिंचेचं झाड ही असली भूतांची वसती स्थानं. मला कळत नाही भुतं असल्या अवघड ठिकाणी म्हणजे झाडांवर, विहिरीत कशाला राहत असतील. 

या असल्या जागा प्रत्येक गावी असतात आणि देवादिकांच्या नाही तेवढ्या या भुतांच्या कथा सांगितल्या अन ऐकल्या जातात. कधीकधी काहीजण मंदिराच्या कट्ट्यावर किंवा चावडीवर बसून त्यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे भूतदर्शन वर्णन करून सांगत असतात.आपण भूत कधीही पाहिलं नसलं तरीही त्याच्या विषयी काही प्राथमिक माहिती आपल्याला त्यातून मिळते. आणि सुदैवाने भूत दर्शन झालेच तर कोणते प्रोटोकॉल्स पाळायचे याचीही माहिती मिळते. या कथा ऐकायला सुरस वाटतात. पण मग त्या ठिकाणांहून जायची वेळ आली कि मी मी म्हणणाऱ्यांचीसुद्धा भीतीने गाळण उडते.

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

कविता, आठवणी अन पावसाळा



का कुणास ठाऊक पण कविता, आठवणी अन पावसाळ्याचं एक अजब नातं आहे. कदाचित पानगळीनंतर येणाऱ्या पावसाळ्यात झाडांप्रमाणेच मानवी मनालाही चैतन्याची पालवी फुटत असते म्हणून असेल. 


कवितेचं विश्व अमर्याद असतं. कविता वाचताना आपण प्रेत्येकजण आपापल्या अनुभवानुसार एक विश्व उभे करीत असतो. आपण आपल्याच आठवणींशी कवितेची सांगड घालण्याचा प्रयत्न करीत असतो. अन मनाच्या खोलवर कुठेतरी धुसरलेल्या आठवणीही हळूहळू डोकाऊ लागतात. मग आपण अलगद त्या आठवणींच्या रम्य प्रांती जातो. अन त्या आठवणीही अशा कि एकीसोबत दुसरी येते मग तिसरी. असं खूप वेळ चालत जातं. मला म्हणाल तर आठवणींच्या राज्यातून बाहेरच यावंसं वाटत नाही. तिकडेच रमावंसं वाटतं. मस्त कविता वाचाव्या अन आठवणी अन स्वप्नांच्याच दुनियेत रमून जावं तासन-तास. पण इकडेही कर्तव्य असतं आपली वाट बघत अन मोठ्या मुश्किलीनं इकडे परतावं लागतं. 

इथे ना धो महानोरांच्या "पावसाळी कविता" या कवितासंग्रहातली एक कविता मला आठवते 

पाऊस येताना घेऊन येतो दर सालच्यावाणी 
हिमगर्द वर्षावात भिजून जाणारी पावसाची गाणी 
तरंगत जाणाऱ्या डोळ्यांच्या हिंदोळ्यात हळुवार सावनी 
सावल्यासावल्यांनी उतरून येणाऱ्या जुन्या आठवणी 

बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

नीलम


चेन्नई (दि.३१ ऑक्टोबर २०१२; वेळ सायं ३:५०)
आम्ही आता आमच्या रूम मध्ये बसून 'नीलम'ची वाट पाहतोय....! नीलम म्हणजे इथे चेन्नईत येऊ घातलेलं चक्रीवादळ. त्याची लक्षणे कालपासूनच दिसू लागली आहेत. आज सकाळपासून जोराचे वारे वाहत आहेत. कॅम्पसमधली काही मी मी म्हणणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. कॅम्पस मधल्या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली आहे. झाडांच्या फांद्या, पाला-पाचोळा पडून रस्ते हिरवे झाले आहेत. आणि वरून पावसाची रिमझिम सुद्धा चालू आहे पण वाऱ्यामुळे छत्री बाळगायला स्कोप नाही आणि त्यामुळे बाहेर पडल्यास भिजणे अपरिहार्य. संध्याकाळी जेवायला बाहेर कसे पडावे याची चिंता आम्हांला लागली आहे. वाऱ्याचा वेग वरचेवर वाढतच आहे. नीलम संध्याकाळी पाचच्या सुमारास इथे येऊन धडकेल. पाहू तरी ताशी १०० किमी वेगाचे वारे कसे वाहतात ते. कॅम्पसबाहेर सुटी जाहीर झाली असली तरी आत मात्र कामकाज चालू आहे.  आमचे आजचे तीनही क्लासेस सकाळी झाले. त्यामुळे आता आम्ही आमच्या रूमवर आहोत. दुपारच्या सेशनमधले क्लासेस त्यांच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होत आहेत. खाली होस्टेल ग्राउंडवर क्रिकेटचा डाव रंगात आलाय. बरीच मंडळी आमच्याप्रमाणेच आपापल्या रूम्स मध्ये दडून बसलेली आहेत. आणि आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार वायरलेस ग्रुपची काही अति हौशी मंडळी समुद्र किनारी फिरायला गेली आहेत.

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

परिप्रश्नेन

जीवनाचं सार्थक कशात आहे? जे हवं ते मिळवण्यात कि उच्च कोटीच्या वैराग्यात? कशाचीही अभिलाषा नसणं हे परमोच्च मानसिकतेचं लक्षण म्हणून गौरवायचं कि माणसाच्या आळशीपणाशी त्याचा संबंध जोडून मोकळं व्हायचं? जन्मलो तेव्हा राग, लोभ, मोह, अभिलाषा, ध्येयं, स्वप्नं, महत्त्वाकांक्षा असं काहीच चिकटलेलं नव्हतं. मन अगदी कोरं करकरीत होतं. अगदी निर्लेप. पण मग जसजसा जगाशी संपर्क आला तसतशी ही भुतं मानगुटीवर बसत गेली. या ओझ्यानंच कित्येक जण शून्यात परतते झाले. जे राहिले ते त्या ओझ्याखाली दबले जात आहेत. या सर्वांहून मुक्त असा अवधूत होणं कुणाला जमलंय का आणि जमेल का? कि सगळेच ओझीवाहू  हमाल? 

कुठून आलोय कुठे जातोय काही माहिती नाही. तरीही चालतच जातोय. कारण तेच एक करण्याची मुभा आहे. थांबणं ते आता शेवटीच एकदा. कधी राना-वनांतून, पानाफुलांतून, कधी डोंगर-दऱ्यांतून, कधी लांबच लांब पसरलेल्या वाळवंटातून. चालणं एकच आपल्या भाळी. चालत चालत होता होईल तेवढं जागून समृद्ध व्हायचं. का म्हणून विचारणार कुणाला? 'तो' आहे असं आम्ही मानतो पण तो कुठे आहे हे कोण सांगणार? आणि असा लपून-छापून का असतो तो? त्याचं नेमकं स्वरूप कसं हे आम्ही कसं जाणायचं ? असे आजवर अनुत्तरीत राहिलेले असंख्यच असंख्य प्रश्न कधी कधी उद्विग्न करतात. 

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

शब्देवीन



ज्ञानेश्वरांची कुठलीही रचना, मग ती ज्ञानेश्वरी असो कि ओव्या असोत किंवा अमृतानुभव वा चांगदेवपासष्टी असो, सात्त्विक आनंददायी असते. तो आमोद वर्णावया शब्दही थिटे आणि आम्हीही थिटे. किंबहुना त्या आनंदा वर्णावया शब्दांची गरजच उरत नाही. सारे शब्दांच्या अतीत. केवळ अनुभवच. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर इंद्रियेही नेणती असा अनुभव. 

हे शब्देवीन संवादिजे | इंद्रिय नेणता भोगिजे |
बोलाआधि झोंबिजे | प्रमेयासी ||

जैसे भ्रमर परागु नेती | परी कमळदळे नेणती |
तैसी परी आहे सेविती | ग्रंथी इये ||

या गीतेचे वर्णन करणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या त्यांच्या स्वतःच्याच प्रत्येक साहित्यकृतीला तितक्याच लागू होतात. 

त्यांच्या साहित्याब्धीमध्ये डुंबताना आपल्या आचार-विचारांचीही उंची किंचित वाढल्याचा आभास होतो. कारण आपला क्षुद्रपणा आपल्या ध्यानी यायला लागतो. 

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

अशाच एका अवघड वळणावर...

वर्ष २००८. नोव्हेंबर महिन्यातली एक थंड सकाळ. आठ-साडेआठचा सुमार. मी वारजे नाक्याच्या बस स्थानकावर बसची वाट पाहत उभा होतो. डेस्टीनेशन होतं कर्वे पुतळा. तिथे एका कंपनीत मला VLSI design engineer म्हणून जॉब मिळाला होता आणि आज दुसराच दिवस होता. पण मागच्या काही दिवसांच्या घडामोडी पाहता त्या फडतूस कंपनीत काम करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. म्हणजे अगदी एक क्षणही नाही आणि तो जॉब सोडायचाच विचार करत होतो मी. पण हा निर्णय घेणं फार अवघड जात होतं. कारण तो जॉब सोडल्यानंतर माझ्या हाती काहीच राहणार नव्हतं, मी बेकारांच्या गर्दीत सामील होणार होतो -किती दिवसांकरता ते माहिती नाही. याच जॉब साठी मी TCS च्या ऑफरवर पाणी सोडलं होतं. आणि आता हेही सोडणार म्हटल्यावर मला सगळे वेड्यातच काढणार अशी भीतीही होती. आई-अण्णा काय म्हणतील? मित्र काय म्हणतील? लोक काय म्हणतील? आणि मुख्य म्हणजे हा जॉब सोडून पुढे काय? विचारांचं वादळ माजलं होतं डोक्यात. या विचारांच्या दरम्यान किती बसेस निघून गेल्या कुणास ठाऊक? मग मला आई-अण्णांची खूप आठवण यायला लागली. सरळ जाऊन आईच्या मांडीवर डोकं ठेऊन मनसोक्त रडून घ्यावसं वाटायला लागलं. पण कधी कधी नियती आपल्याला आपल्या दुःखात डुंबायलाही पुरेसा वेळ देत नाही. सकाळचं ते कोवळं उन, तरुणाईनं गजबजलेला तो bus stop , ते पुणेरी वातावरण यांपैकी कोणतीच गोष्ट मनाला समाधान देऊ शकत नव्हती. मनात विचारच विचार अगदी उतू जात होते. मग मी घरी कॉल केला. सगळी परिस्थिती अण्णाजवळ वर्णन केली. आणि अहो आश्चर्यम! अण्णांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला हवा तो निर्णय घेण्याची परवानगी दिली. मला ही अपेक्षाच नव्हती. आता मला खूप बरं वाटलं.  आता आभाळ अगदी स्वच्छ होतं. ढग कुठल्या कुठे विरून गेले होते. सूर्य अगदी तेजाने तळपत होता. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे ही जाणीवच खूप महत्त्वाची असते. अवघड प्रसंगात नुसते सल्ले देणारे खूप असतात पण तेव्हा 'पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ' म्हणणारे हवे असतात, आपला निर्णय चूक कि बरोबर हे विश्लेषण करीत बसण्यापेक्षा आपल्या पाठीशी राहणारे हवे असतात. आणि ते जर आपले आई वडील असतील तर कसल्याही संकटाला अगदी निर्भयपणे तोंड देण्याचं सामर्थ्य अंगी येतं. 

जॉब सोडायचा निर्णय तर झाला होता. आता कंपनीत जायचं नव्हतं. मग जाणार कुठे? कसल्याच ध्येयाशिवाय मी बसमध्ये चढलो. कर्वे पुतळ्याजवळ उतरलो. कशासाठी? काही माहिती नाही. उतरून काय करावं, कुठे जावं काही काळात नव्हतं. इथेही नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ होती. सकाळची वेळ असल्याने ऑफिसला जाणारे लोक , शाळेत जाणारी मुले-मुली यांची धावपळ चाललेली. त्याच गर्दीत IT वालेही गळ्यात कंपनीचे पट्टे बांधून ऐटीत मिरवत होते. मी त्या गर्दीचा भाग होतोही आणि म्हटलं तर मुळीच नव्हतो.  आता माझ्याकडे वेळच वेळ होता. माझ्या सर्वच क्षणांवर फक्त आणि फक्त माझाच अधिकार होता. मी कर्वे पुतळ्यापासून दशभुजा गणपती मंदिराकडे निघालो. पायीच! ध्येयहीन, भरकटलेल्या नावेसारखा मी. जॉबलेस झाल्याचं दुःख होतं. पण आनंद याचा होता कि मी मला हवं ते केलं होतं. जीवन घेईल ते वळण नाकारून मला हवं त्या मार्गाने जाण्यासाठी मी बंड केलं होतं. रात्रीपासून असलेलं दडपण नाहीसं झालं होतं. 
सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. मी चालत होतो. डोक्यात विचारही चालत होते. भूतकाळातल्या बऱ्याच आठवणी अधून मधून तरळत होत्या. भविष्याची चिंता अधून मधून डोकावत होती. एकंदरीतच 'ये महफिल ये दुनिया मेरे काम कि नही ' अशी धारणा झाली होती. एखादा निर्णय घेतल्यानंतरही त्या निर्णयाच्या चूक-बरोबरपणाविषयीची शंका काही आपली पाठ सोडत नाही. तसंच माझं होत होतं. अधून मधून आपण हे चूक करतो आहोत असं वाटायचं. कारण मागेही काही चुकीचे निर्णय घेतले होते. हा निर्णय चुकणार तर नाही ना असं वाटत होतं. पण तो निर्णय अगदी योग्यच होता कारण मला आयुष्यात तडजोड मान्य नव्हती.  

विचारांच्या तंद्रीत चालत चालतच मी दशभुजा गणेश मंदिराजवळ केव्हा पोचलो याचा पायांना पत्ताही लागला नाही. मग मंदिरात गेलो. हात जोडून गणरायाला म्हणालो तू हे जे काही भोग दिलेस त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. आयुष्यात आता समोर फार बिकट काळ दिसत आहे. त्याला तोंड देण्यासाठी सामर्थ्य दे. तूच अशी बुद्धी दिलीस आता आयुष्याला भिडण्याची शक्तीही तूच दे. आणि मग ते मंदिरातलं प्रसन्न वातावरण, उदबत्त्यांचा मंद दरवळ, घंटांचा मधूनच उठणारा अनाहत नाद यांच्या "अमृततुल्य" संयोगाचा उपभोग घेत बराच वेळ मी तिथे बसून होतो.  किती वेळ   माहिती नाही...!

सोमवार, १० सप्टेंबर, २०१२

पाऊस

काही वेळापूर्वीच ढग आले, हवेतला कोरडेपणा जाऊन थोडासा दमटपणा आला, वारा वाहायचा थांबला, ढग एक एक करून आकाशात गर्दी करू लागले मग झाकोळून आलं-अगदी अंधारून-आणि सर्वांनी मिळून एकच ठराव संमत केला. त्याच्या जल्लोषात सर्वांनी कडकडाट केला आणि एकच वर्षाव सुरु झाला. आता लहान मोठे थेंब वेगाने जमिनीवर येत आहेत. बाणांच्या वर्षावासारखे. झाडांना,त्यांच्या आश्रयाला असलेल्या पक्ष्यांना, पानांना, गवताच्या पात्यांना, फुलांना, घरांना, रस्त्यांना, वाटांना, त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अगदी सर्वांनाच चिंब चिंब भिजवून ते थेंब जमिनीवर ओघळत आहेत. सृष्टीला न्हाऊ घालत आहेत. चैतन्याचाच वर्षाव हा. झाडांच्या ढाली फुटून गेल्या आहेत. त्याखाली आश्रय घेतलेली माणसे आता दुसरा आश्रय शोधत आहेत. होस्टेलच्या गच्चीवर स्वैर संचार करणारी माकडं बिचारी आपल्या पिलांसहित कुठे लपून बसली कुणास ठाऊक. galleryला असलेल्या लोखंडी गजांच्या खाली थेंबांची एक रंगच तयार झाली आहे. पलीकडचा निसर्गाचं त्यांत सूक्ष्म प्रतिबिंब दिसतंय. हवेत मस्त गारवा आलाय. होस्टेलच्या पटांगणात असलेली सगळी झाडे पाणी पिऊन तजेला आल्यासारखी दिसतायत. जिकडे पाहावं तिकडे हिरव्याच हिरव्या रंगाच्या छटा. मध्येच कुठे कुठे पिवळा रंग डोकं वर काढून जणू निसर्गाच्या प्रगल्भतेची साक्षच देतोय. एकदम प्रसन्न वाटतंय. 

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

देव


खरं तर तो कसा आहे, कुठे असतो, कसा दिसतो, काही काही आपल्याला माहिती नाही. तरीही आपण त्यावर विश्वास ठेऊन असतो. का? काही जन श्रद्धेपोटी, काही जन संस्कारांपोटी आणि बरेच जन गरजेपोटी विश्वास ठेवतात देवावर. होय गरजेपोटीच. आपल्याला देवाची गरज आहे. आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी, आपल्या दुःखात आपली साथ करण्यासाठी, वेळप्रसंगी मदतीला धावून येण्यासाठी आणि कधी कधी आपल्याच नाकर्तेपणाचं, आळशीपणाचं, चुकांचं, हतबलतेचं खापर फोडायला हक्काचं डोकंही त्याचंच हवाय आपल्याला.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

customized नवरा/बायको


matrimony वेब साईट्स वर एक फेर फटका मारला कि पुष्कळ मनोरंजन होतं. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी वधु  वरांच्या  profilesवर एक नजर टाका. काय असतात त्यांचे expectations भावी जोडीदाराकडून? आणि त्यांचे qualifications  पण भारीच असतात. अक्षरशः काहीही लिहिलेलं असतं. एक उदाहरण देतो. एका मुलीच्या profile वर तिचं शिक्षण काय असेल तर कसली तरी पदवी. इथपर्यंत ठीक आहे. पुढे टंकलेखन पदविका आणि typing speed पण mention केलेली होती. आता त्याची काय गरज. म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला बायको हवी कि typist cum सेक्रेटरी. अजून एक उदाहरण आहे. एका महाशयांनी त्यांच्या expectations  मध्ये काय लिहावं? तर मुलगी convent educated हवी. आता याला काय म्हणाव? त्याला नक्की लग्नच करायचंय कि काय अशी शंका यावी. एका लिमिट पर्यंत अपेक्षा वगैरे ठीक आहे पण हे असलं convent educatedच हवी/हवा  किंवा अमुक अमुकच पदवि अभ्यासक्रम केलेली/ला  हवी/हवा किंवा डॉक्टरच/इंजिनिअरच हवा/हवी अशा गोष्टींना काही अर्थ नाही. हे म्हणजे customized laptop किंवा आणखी दुसरा कुठला तरी इलेक्ट्रोनिक product विकत घेतल्यासारखं  आहे. म्हणजे मला या configurationची मुलगी बायको म्हणून हवी किंवा मला या particular configurationचाच मुलगा नवरा म्हणून हवा आहे असं म्हटल्यासारखं आहे. माणसं अशी customize  करून थोडीच मिळतात? मग घटस्फोट होतील नाही तर काय? 

यश

या जगात काही लोक भयंकर यशस्वी होतात. त्यांच्या यशास त्यांचे प्रयत्न, चिकाटी, कौशल्य इत्यादी सहाय्यभूत असतातच पण सोबतच काही परिस्थितीजन्य गोष्टीही कारण असतात. आणि इतर बरेच जण हे त्यांच्या यशाचे गोडवे गाण्यात आणि त्यांच्यासारखेच यश मिळावे असे इच्छिण्यातच धन्यता मानतात. यशस्वी लोकांचे यश appreciate करायला माझा विरोध नाही पण त्यांचा formula वापरून आपणही यशस्वी होऊ हा समाज करून घेणे अत्यंत चुकीचे आहे कारण यशाचा कुठलाही formula  नसतो. आणि आपण कुणाला यशस्वी म्हणतो हेही जरा तपासून पहिले पाहिजे. विचार केला तर आपल्या लेखी उद्योजक, चित्रपट कलाकार, क्रिकेट खेळाडू, किंवा तत्सम  कुणी तरी ज्यांनी अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे हेच लोक यशस्वी आहेत. यश हे आपण पैशातच मोजतो हि वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आपले आदर्श हे एक तर श्रीमंत किंवा प्रसिद्ध लोक आहेत. माझा या लोकांना किंवा त्यांच्या प्रसिद्धीला किंवा श्रीमंतीला विरोध आहे असं समजण्याचं काही कारण नाही.  विरोध आहे तो आपल्याच काही मातांना आणि ग्रहांना. सध्या फेसबुकवर एक quote शेअर होतोय - "You are successful when people start searching your name in google instead of facebook" -असाच काहीसा . म्हणजे प्रसिद्धी हे तुमच्या यशाचं मोजमाप . काय अर्थ आहे का या असल्या विचारसरणीला? यश हे प्रत्येकाला प्रसिद्धी देऊ शकत नाही आणि त्याची गरजही नसावी . त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत . कुणासाठी रोज सकाळी लवकर उठणे हे यश असू शकते , कुणासाठी चांगले नातेसंबंध हे यश असू शकते. यश हे शेवटी आपल्या आत असतं, बाहेर दिसतं ते फक्त त्याचं प्रतिबिंब. ते सर्वांना दिसतंच असं नाही. यशाला प्रसिद्धीचं वलय असावं लागत नाही. मागे आमच्या ब्रम्हपुत्रा होस्टेलच्या कल्चरल फेस्टीवलच्या  वेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी एक गोष्ट सांगितली होती . आसाम मध्ये कि तिकडेच कुठे एका निर्जन आणि उजाड बेटावर कुण्या एकट्यानेच वनराई फुलवली. त्याचं संपूर्ण आयुष्य तो हेच करत होता . हे यश आहे . निखळ यश. कसल्याही प्रसिद्धीची अभिलाषा नाही, कसलाही उन्माद नाही. 

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

विकांत


(विक एंड साठी "विकांत" हा शब्द मी कुठे वाचलाय हे आठवत नाही. श्रेय कुणाला द्यावं हे काळत नसल्याने 'इदं न मम' असंच म्हणतो.)
तर सांगायचं हे कि रविवारची संध्याकाळ मला मरणपंथाला टेकलेल्या माणसाच्या आयुष्यात राहिलेल्या चार क्षणांसारखी भासते. त्या वेळी मी युद्धात पराभूत झालेल्या सैन्याच्या सेनापातीसारखं फील करतो. कारण तेव्हा मी वेळ गमावलेला असतो. शुक्रवारी पुढच्या दोन दिवसांत काय काय करायचं याचे मनसुबे रचलेले असतात. आठवडाभर याच विकांताच्या जीवावर भरपूर बेत आखलेले असतात. काही वास्तव तर बरेच अवास्तव. पण यातल्या बऱ्याच (किंवा सर्वच) मनसुब्यांचा झोपेच्या किंवा आळसाच्या पायी बळी जातो. सध्याच्या संदर्भात पहायचं झालं तर कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा, आणि किती वेळ करायचा याचे बेत आखतो. हे सर्व करताना येणारे ४८ तास जणू मी तेच करणार आहे असं assumption असतं. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष मैदानात उतरून लढायची वेळ येते तेव्हा लक्षात येतं आपण सगळं ideal विचार करून आखलेलं आहे आणि इथे तर गोष्टी वेगळ्याच आहेत. मग शनिवार कसा गेला हे कळायच्या आत रविवारपण अर्ध्याच्या वर निघून जातो. आणि उरते ती रविवारची उदास उदास अशी संध्याकाळ. भयाण अशा सोमवारची पूर्वसंध्या. आणि मग खिन्न वाटायला लागतं. एक एक क्षण हातातून निसटत असताना तो धरून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालतो. पण तो क्षण जायचा तो जाणारच. मग आपण या चार क्षणांचा उपयोग करू पाहतो आणि मग आपल्या लक्षात येतं कि या दोन दिवसांत आपण बरंच काही करू शकलो असतो. असं मला आतापर्यंत बऱ्याच वेळा realize झालंय. आणि यावरून मी एक निष्कर्ष काढलाय तो असा कि हे असं काहीही नसतं.....आपल्याकडे राहिलेला वेळ जितका कमी तितका आपण त्याचा सदुपयोग करतो. परीक्षेच्या पूर्वसंध्येलाही असंच होतं. आपलं potential लक्षात येतं पण वेळ मात्र नसतो. तेव्हा बरेच नवीन शोधही लागतात. 

शनिवार, २८ जुलै, २०१२

एक प्रसन्न पावसाळी सकाळ

पहाटेचे पाच साडेपाच वाजलेले आणि अजूनही पेंगत असलेलं हॉस्टेल आणि झोपेतच असलेली सृष्टी. अशा एकंदरीतच झोपाळू वातावरणात झोपेतून उठणं म्हणजे एक दिव्यच. पण एकदा का ते दिव्य पार पाडलं आणि जरा फेरफटका मारायला बाहेर पडलो कि नजरेस पडते ती एक प्रसन्न पावसाळी सकाळ; हिरव्या वनराईच्या कुशीत वसलेला आणि अजूनही निपचित पडलेला IIT मद्रासचा सुंदर कॅम्पस; रात्रीच्या पावसामुळे हवेत, रस्त्यांवर, झाडा-झुडुपांवर आणि एकूण एक गोष्टींवर पसरलेला ओलावा; रस्त्याच्या आजू बाजूला अगदी निर्भयपणे फिरणारी हरणं; झाडांवर उड्या मारणारी माकडं; jogging करणारे आमच्यासारखे अल्पसंख्यांक; त्यांना मध्ये मध्येच कुठेतरी साथ करणारी कुत्री; हवेची झुळूक आल्यावर पाण्याचा शिडकावा करणारी झाडं असं एकूणच प्रसन्न वातावरण. 

बुधवार, २५ जुलै, २०१२

अश्वत्थ

आमच्या मामाच्या शेतात एक भला मोठा, पर्वताएवढा, कित्येक वर्षे जुना असा एक पिंपळवृक्ष आहे. लहान असताना बरेच दिवस "वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे" मधला वृक्ष म्हणजे तोच अशी माझी समजूत होती. कारण इतर झाडं त्याच्यासमोर झुडुपं वाटावी एवढा तो भव्य आणि महाकाय आहे. वृक्ष हे नाव सार्थ ठरवणारा. आणि गीतेत कृष्णाने "ऊर्ध्वमूलम अधःशाखं" म्हणून  उल्लेखलेला संसारवृक्ष (अश्वत्थ) सुद्धा मला तोच वाटतो. त्याच्या अनंत शाखा आणि त्यावरची त्या अनन्तापेक्षाही अनंत अशी हिरवी-पिवळी पाने आणि या सर्वांना समर्थपणे पेलणारा त्याचा आठ-दहा फूट व्यासाचा बुंधा आणि त्यांना अन्न पाणी पुरवणारी ती विस्तीर्ण आणि खोलवर पसरलेली त्याची मुळे; त्याची ती घनदाट, काळीभोर, थंड अशी सावली; त्याच्या पानांशी झोम्बणारा वारा आणि मग त्यांचा तो सळसळणारा आवाज; त्याच्या बुंध्याशी शेंदूर फासून बसलेली ती दैवतं; वर त्रिकाळ चालणारा पक्षांचा गलबला आणि वानरांचा उच्छाद; खाली बागडणारे आम्ही; आम्हांवर अधूनमधून 'विहिरीकडे जाऊ नका' म्हणून ओरडणारी मोठी माणसे; आजूबाजूला नजर जाईल तिथवर पसरलेली हिरवीच हिरवी शेतं; भिजवलेल्या रानामधून गार होऊन येणारा वारा; त्याच पिंपळाखाली  सर्वांसोबत बसून खाल्लेली भाकरी, तोन्ड अंबवणारी बोरं, पेरू, जांभळे या आणि अशा लहानपणीच्या कित्येक आठवणी त्या अश्वत्थाशी जुळलेल्या आहेत. 


त्याचं स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे असं मला वाटतं. कित्येक पिढ्या त्याच्यासमोर जन्मल्या, वाढल्या, नांदल्या आणि अनंतात विलीन होऊन गेल्या. त्या सर्वांच्या आठवणी पोटात घेऊन अजून तो त्याचा मार्ग क्रमितच आहे. आणि म्हणूनच कदाचित तो उन, पाऊस, वादळ, वारा आणि क्वचित प्रसंगी माणसे या सर्वांना तोण्ड देत मोठ्या डौलानं शांत, धीरगंभीर आणि  अविचलपणे उभा आहे.....अजूनही....कुटुंबातल्या कुणा खंबीर वयोवृद्ध माणसासारखा. कदाचित आम्हांनंतरही येणाऱ्या कित्येक पिढ्या तो तसाच उभा असेल, मूकपणे. आमच्याही काही थोड्याफार आठवणी आपल्या पोटात साठवून. (इथे गैरसमाज न व्हावा. आम्ही अजून पंचविशीतच आहोत. वृद्ध नाही.) 

गुरुवार, १९ जुलै, २०१२

वेदना (pain)

19/07/2012; 8:50pm 

(इथे मी दुःख हा शब्द शारीरिक दुःख (वेदना) या अर्थाने वापरला आहे. )

आत्ता या क्षणी मी अतिशय जास्त वेदना  अनुभवतोय. त्यांची तीव्रता शब्दांत नाहीच सांगता येत. ते असं आहे कि माझ्या कानात खूप दुखतंय. खूप म्हणजे अगदी प्रचंड. इतकी वेदना मी याआधी कधीच नव्हती अनुभवली. hospital मध्ये जाऊन आलो. डॉक्टरांनी pain killer दिलीय. आणि उद्या ENT सर्जनची appointment घ्यायला सांगितलंय.  पण pain killerचा काही परिणाम नाही झाला अजून तरी. म्हणजे आता सकाळपर्यंत ही वेदनाच माझी सांगाती. म्हणून विचार केला कि या वेदनांना  व्यक्त करून थोडीशी mental relief तरी मिळवावी. म्हणजे काय असतं कि माणूस शरीराने जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याचं मनही आजारी पडतं. आणि वेदनांची तीव्रता अजूनच वाढते. अशा वेळी त्या वेदनांवरही  मात करून माणसाचं लक्ष दुसरीकडे वेधणारी गोष्ट असावी लागते. माझ्यासाठी ती  गोष्ट म्हणजे लिहिणं आहे असं मला वाटतंय. कदाचित pain killerचा परिणाम व्हायला सुरुवात झाल्यामुळे तसं वाटत असेल. असो. 

सावरकरांच्या भाषेत सांगायचं तर "दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल हा निसर्गानेच बांधलेला असतो". मग ते दुःख राईएवढं असो किंवा पर्वताएवढं. व्यक्त व्हावसं वाटणं हे दुःखात नेहमीपेक्षा जास्त असतं . आणि ते एकदाच नाही तर दुःख सारेपर्यंत. पण ज्याच्याजवळ दुःख व्यक्त करावं ती व्यक्ती संवेदनशील असायला हवी. नाहीतर ती अभिव्यक्ती दुःख कमी करण्यापेक्षा ते वाढवते. 

आणि वेदना कधीकधी इतकी जास्त असते की आता कसंही करून यातून सुटका व्हावी असं वाटतं. ती कुठल्याही मार्गाने होवो. अगदी मृत्यूही स्वागतार्ह वाटायला लागतो. म्हणजे मला तसं काही नाही वाटत. पण आता अचानक झोप लागावी किंवा बेशुद्ध पडावं  असे विचार डोकावतात मनात. पण मग वाटतं कि एवढ्या वेदना होऊन सुद्धा आपण शुद्धीवर आहोत म्हणजे तो बेशुद्धीचा threshold खूपच painful असेल. म्हणजे technical भाषेत सांगायचं तर the pain just a moment before unconsciousness. आणि त्यावर असं कि बेशुद्धीमध्ये ती relief अनुभवायला आपण कुठे असतो? आणि शुद्ध आल्यावर त्या वेदना असतातच स्वागताला.

मरणाचंही असंच असतं का? म्हणजे अपरिमित वेदना आणि त्यातच जीवाचा अंत असं? कारण मृत्यू हे एक transition आहे अस्तित्वाच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत किंवा कदाचित असण्याकडून नसण्याकडे. मग वेदना या होणारच. उगाच विचार येतो कि अपघातात जखमी झालेल्यांच्या, युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या वेदना कल्पनातीत असतील. आणि असा विचार करूनच दया मरणाला काही देशांत कायदेशीर मान्यता आहे. ती असावी कि नाही हा मुद्दा इथे नाही मांडायचा मला. 

एक गोष्ट मात्र निश्चित-ती अशी कि वेदना किंवा दुःख माणसाला काही काळासाठी का असेना अंतर्मुख बनवतात आणि आत्मपरीक्षण करायला लावतात. दुःखात अगदी दगडासारखा माणूस सुद्धा हळवा होतो.  

गुरुवार, ७ जून, २०१२

पाऊस आणि काही क्षणचित्रे


पाउस म्हटला की आठवतं ते लहानपणी चिखल तुडवीत, छत्री सांभाळत आणि कपडे सावरत, पावसाला शिव्या घालत शाळेत जाणं...किंवा मग कधीतरी खूप पाऊस आहे म्हणून शाळेला दांडी मारणं....शाळा सुटल्यावर भिजून आल्यावर डोकं कोरडं करत असताना आईचं आपल्यावर ओरडणं.... तसंच आठवतात कधीतरी रात्रभर लाईट गेल्यावर रंगलेल्या गप्पा आणि त्या अंधाराचा काळेपणा  जो अजूनही हवाहवासा वाटतो....आणि सकाळी ओला होऊन आलेला न्यूजपेपर आणि त्याचा तो typical  वास आणि त्यातल्या बातम्यांमधून सुद्धा ठिबकत असणारा पाऊसच.

पूजा झाल्यानंतर सकाळी तो घरात दरवळणारा उदबत्तीचा मंद वासही असाच एखाद्या क्षणी आठवून जातो.... क्षणिकच थोडासा दरवळतोसुद्धा....आणि मध्येच एखादी ज्ञानेश्वरीची ओवीसुद्धा कानात घुमून जाते....

आणि आठवते ती पंढरीची वारी.... आषाढाताली...तो टाळ मृदंगाचा गजर....ती एक एक मुक्काम सर करत पुढे जाणारी माउलींची पालखी....ते बेभान होऊन चालणारे वारकरी....ती गुलाल,अष्टगंध आणि अबीर बुक्क्याची उधळण  ....तुकोबा ज्ञानोबाच्या घोड्याचं रिंगण....चैतन्यमय झालेली हि संपूर्ण चारचार सृष्टी....आणि विठोबाच्या कपाळावरचा तो श्रीगंध...भला मोठा....त्यालाच साजेसा....त्याच्या चेहऱ्यावरचा निरागस तरीही आश्वासक भाव....आपण स्वतः वारीला कधीही गेलो नसलो तरी मानाने त्या विठ्ठलाच्या चरणी सर्वांआधी माथा टेकून आलेलो असतो....

दहा दिवस चालणारा गणेशोत्सव....आणि दुःखी अंतःकरणाने केलेलं बाप्पाचं विसर्जनही....दोन तीन दिवस येऊन जाणारी गौरी....नागपंचमी....पोळ्याला चालणारा बैलांचा थाट....श्रावणात येणारी कृष्ण जन्माष्टमी....त्यानिमित्ताने फोडली जाणारी दही हंडी....आणि हो आठवतो तो याच सुमारास येणारा पंधरा ऑगस्ट सुद्धा...

पाऊस म्हटला की आठवते ती शेतातली पेरणी....कापसाची लावणी...आणि हे करत असताना पाऊस आला की सगळ्यांची होणारी धावपळसुद्धा....ठिबकणाऱ्या झोपडीच्या किंवा झाडाच्या आश्रयाला सगळ्यांचं भिजत उभं  राहणं....आणि आठवतात त्या रात्री आजीच्या मांडीवर झोपून ऐकलेल्या मोठ्यांच्या चाललेल्या गप्पा....

आठवते अंगणातल्या कडूलिंबाच्या झाडाला फुटलेली पालवी....नुकताच अंगणात लावलेला झेंडू....जास्वंदाच्या टपोऱ्या लाल फुलांवर जमलेले दवासारखे पावसाचे थेंब....पारिजाताच्या फुलांचा पडलेला सडा....पाणी पिऊन बहरलेली वृन्दावानातली तुळस....शेन्द्र्या फुलांची अबोली....काट्या मधून हळूच डोकावणारे गुलाबाचे लाल, पिवळे, शेंदरे, आणि पांढरे नाजूक गेंद...आणि अंगणातला चाफा सुद्धा....

आणि आठवतं अशाच पावसाळ्यात घर सोडून शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना भरून आलेलं मन....मनात चाललेला विचारांचा पाऊस....आणि तरीही होणारा नाईलाज....

जरा अलीकडच्या काळात डोकावलं तर आठवतं ते आपल्याला कुणीतरी आवडायला लागलेलं....प्रेम म्हणा किंवा हवं ते म्हणा....त्या आठवणींना पावसाळ्यातच बहार येत असतो....

पाऊस.सृष्टीच्या जिवंतपणाची साक्ष देणारा. आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच आठवणी जागा करणारा. इतक्या की शब्द अपुरे पडावेत त्यांचं वर्णन करताना. त्या आठवणी कडू की गोड हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते त्यांचं असणं.

आणि सत्य हे असतं की आता आपण त्या सर्वांपासून कितीतरी दूर आलेलो असतो. कदाचित कधीच परत न जाण्यासाठी. पण तरीही ह्या आठवणी आपल्याला बळ देत असतात....जगण्याचं, लढण्याचं, वर्तमानाशी संघर्ष करण्याचं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्या स्वामी सामार्थांसारख्या.

(फोटो- सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स.com )


रविवार, ३ जून, २०१२

विषयांतर


शब्द आणि भावना- एक अभिव्यक्तीचं माध्यम तर दुसरं कारण. भाव भावना शब्दांशिवायही स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकतात. किंबहुना सगळ्याच भावना शब्दांमध्ये व्यक्त नाही करता येत. मग म्हणूनच आपण डोळ्यांतून, स्पर्शातून त्या व्यक्त करत असतो. पण शब्दांना मात्र ओलावा येतो तो भाव भावनांमुळेच. अन्यथा ते रुक्षच राहतात. सरकारी कागदपत्रांसारखे किंवा गणित, विज्ञान इत्यादी शास्त्रांसारखे. म्हणूनच कि काय शाळेत भाषा विषय तेवढे जरा जास्त आवडायचे मला.

मुळातच माणूस (किंवा कोणताही सजीव घ्या) भावनिक असतो. फक्त कुणी जरा जास्त व्यक्त करतं कुणी कमी एवढंच. पण भावनाहीन होणं हे कुणालाही कधीच शक्य नाही. आणि गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञ या संकल्पनेची गल्लत आपण बहुतांशी भावनाहीन असण्याशी करतो. केवळ सुख किंवा दुःख याच भावना आहेत असं नाही. त्या कधी कधी खूप गुंतागुंतीच्या असतात. आणि प्रत्येकाची त्या व्यक्त करण्याची रीतही वेगवेगळी असते.....


रविवार, २७ मे, २०१२

नसती उठाठेव


कधी कधी खूप कंटाळा येतो- जगण्याचा, अस्तित्वाचा. आपलं अस्तित्वच एक ओझं वाटायला लागतं. खूप थकल्यासारखं वाटतं. ही नसती उठाठेव कशासाठी चाललीय, इतकं अवघड आहे जगणं, मनासारखं कधीतरी जगता येईल कि नाही असं  वाटतं. जगणं  -अगदी साधी आणि सरळ गोष्ट. पण आपला हव्यास (ज्याला आपण महत्त्वाकांक्षा असं गोन्डस नाव देतो), आपले egos आपलं जगणं अगदी complex करून टाकतात. किंबहुना ते जगणं उरतच नाही, practical असण्याच्या नावाखाली ती तडजोड असते आनंदाशी, आनंदी असण्याशी आणि ती कशासाठी तर आनंदासाठीच. हे म्हणजे मृगजळासारखं आहे. आपण त्याच्या जवळ जाईपर्यंत ते अजूनच पुढे गेलेलं  असतं. आणि ते मिळवण्यातच आनंद आहे असा आपला ग्रह आपण करून घेतलेला असतो. आणि मग काय त्याच्यामागे धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरा आनंद कशात आहे हे आपण विसरूनच जातो. मला आठवतं लहानपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद असायचा. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसा छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंदही कमी होत गेला आणि आनंदाची व्याख्याच आता बदललीय. असं करून आपण आपल्यालाच आनंदापासून दूर नेतोय  हे कळत नाही असं नाही. पण आता आपला इगो आपल्याला परत जाऊ देत नाही. तू हे मिळवलंस आता तुला हे मिळवायचंय असं  आपण स्वतःला बजावत असतो. मला एवढ्या पगाराचा, असल्या प्रोफाईलचा जॉब  मिळवायचाय. "तुम्ही गरीब म्हणून जन्मलात यात तुमचा काही दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे"  ही असते आपली ideology.  पण "का, कशासाठी" असा साधा प्रश्नही आपण स्वतःला कधी विचारात नाही. मान्य आहे पैसा कमावलाच पाहिजे. ते आवश्यक पण आहे. पण कोणती किंमत देऊन? साध्य देऊन साधन घेतल्यासारख झालं हे , नाही का?


गुरुवार, ३ मे, २०१२

प्रतिभा.............

एक दिवस (कि रात्री) ती दिसली. माझ्याजवळ येऊन खूप सुंदर, मोहक, निरागस हसली. आणि अशी येऊन थेट माझ्या शेजारीच बसली. अगदी मला खेटून. मला म्हणाली "असा पहिल्यांदाच भेटल्यासारखा काय पाहतोस ? नेहमीच तर भेटतो आपण." कोण ही,  कुठून आली आणि अशी काय बोलते? आणि पहिल्यांदाच तर भेटत होतो आम्ही बहुधा. की नाही? आता मात्र मला तिला पूर्वी कधीतरी भेटल्यासारख वाटतंय. की ती म्हणाली म्हणून मला तसं वाटतंय. पण मग आम्ही आधी भेटलो तर मला काही आठवत का नाही? ते जाऊदे. ती अप्रतिम सुंदर  होती. माझी तांद्री  भांगीत मला म्हणाली "चल आपण अस्तित्वाच्या पार त्या टोकाला जाऊ,  देहभान विसरून. जीथं फक्त तूच असशील आणि सोबत मी.  फक्त तुझीच. आणि मग आपण या भौतिक, व्यवहारी जगाचे सर्व नियम भिरकावून काही तरी नवीन असं निर्माण करूया."  तिची असली काहीतरी बडबड चालू होती. मी आपला देहभान हरपून तिच्याकडे बघतच होतो. आता मात्र हे जरा जास्तच होत होतं. "मी  स्वप्नात तर नाही ना?" माझ्या मनात मनात  शंका आली. इतक्यात ती म्हणाली "काय फरक पडतो? स्वप्न आणि सत्य हि दोन्हीही सारखीच नाही का? स्वप्नात जे दिसतं ते तेवढ्या पुरतं सत्यच नसतं का? आणि जे जागेपणी अनुभावतोस ते तरी सत्य असतं कशावरून? तेही कधी ना कधी स्वप्नवतच होणार असतंच की. सत्य हे असं पाच  ज्ञानेन्द्रीयांच्या अनुभूतींमध्ये नाही पकडता येत. ते कधीकधी त्याच्याही आवाक्या बाहेरचं असतं.  आणि ते काळ आणि स्थळ सापेक्ष असतं." हे पचायला जरा जडच होतं. आणि मझं देहभान खरच हरपलं होतं. 

मी: हे काय असलं अतार्किक बोलतेस? आणि मला सांग तू आहेस तरी कोण? 
(हे नक्कीच स्वप्न असणार. त्याशिवाय एवढी सुंदर मुलगी मला स्वतःहून 'मी फक्त तुझीच' असं म्हणणारच नाही. )

ती: मी कोण ते तुला कळेलच वेळ आल्यावर. आणि आता तू मला सांग तर्क काय असतो? अनुभवांची गोळाबेरीजच ना. मग तर्क तरी अनुभवाच्या कुंपणाबाहेर कसा जाईल? हेच तर सांगायचंय मला तुला. तर्काच्या आणि मुळातच अनुभवाच्या बंधनाच्या बाहेर ये. मनाला मुक्त कर. त्याला मुक्तपणे संचार करू दे या अमर्याद विश्वाखिलात आणि त्याच्याही पलीकडे. हे जाणून घे कि तर्क, कारण, परिणाम वगैरेंच्याही पलीकडे आहे मन. त्याला या भौतिकाच्या बंधनात असा जखडू नकोस. 

जशी ती दिसायला सुंदर होती तशी तिच्या बुद्धीची झेपही विलक्षण होती. पण मला काही काळात नव्हतं. बाकी काहीही असो मला ती आवडायला लागली होती हे मात्र नक्की. म्हणजे मी अगदी तिच्या प्रेमातच पडलो होतो म्हटलं तरी चालेल. Love at First Sight. 

ती: कसला विचार चालू आहे महाशय? प्रेमात वगैरे पडलास कि काय माझ्या?

मी: (मनात) ही पक्की मनकवडी सुद्धा आहे तर. आता तर हिच्यासमोर विचार करायची पण चोरीच आहे. काय करवं?

ती: काहीही नको फक्त एकच कर. तुझा so called common sense आहे ना तो जरा बाजूला ठेव आणि त्या अमर्याद आकाशाच्याही पलीकडे जाऊन पहा हे सगळ जगच वाट पाहतंय तुझी. हे तारे-ग्रह, ही सजीव आणि निर्जीव सृष्टी, सगळ चाराचारच. 

मी: ए बरं ते जाऊ दे तुझं नाव काय आहे? 

ती: का? लग्न करणार माझ्याशी?

मी: हो करीन की. तुझी हरकत नसेल तर. 

ती: माझ्या हरकतीचा प्रश्न येतोच कुठे. मी प्रतिभा. तुझीच. आणि हे लग्न वगैरे असल्या  कुबड्यांची गरज नाही आपल्या सोबतीला. मी कायमचीच तुझी आहे. अगदी कल्पांतापर्यंत. 

wow!!! हे मात्र अगदीच मस्त होतं. एकदम अनपेक्षित. एवढी सुंदर मुलगी. नावही किती सुंदर- 'प्रतिभा'. आणि मला म्हणते 'मी तुझीच'. आता मात्र मी बेशुद्ध पडायचा तेवढा बाकी होतो. 

ती: एवढा हरखून जाऊ नकोस. खरच मी तुझी आहे. 

मी: चल, काहीतरी सांगू नकोस. मग इतके दिवस आपण कसे नाही भेटलो? आणि तू कुठे होतीस? आणि आत्ताच का भेटतोय आपण? 

ती: इतके दिवस तुला माझी आणि तुझी तरी ओळख कुठे होती? अजूनही ती झालीय कि नाही शंका आहे पण तू तुला आणि मला थोडसं का होईना ओळखायला लागला आहे असं  म्हणता येईल. आणि इतक्या दिवसांचं  काय घेऊन बसलास? तू आता कुठे आहेस हे  तरी सांगू शकशील का? 

आणि काय आश्चर्य..... मी कुठे होतो याचा काहीच थांग पत्ता लागत नव्हता. जागा कि झोपेत कि अजून  कुठल्या दुसऱ्याच अवस्थेत? जिवंत कि मृत? काहीच काळात नव्हतं. आजूबाजूला नुसता अंधारच अंधार दाटलेला. मला दिसत होती ती तीच फक्त. प्रतिभा. स्वयंप्रकाशित अशी. सगळा  प्रकाश तो तिच्याच पासून होता. त्यात मी कुठेच नव्हतो. मी फक्त ऐकत होतो, पाहत होतो आणि बोलत होतो किंवा कदाचित बोलतही नव्हतो कारण तिला बोलायची गरजच नव्हती. मी फक्त विचार करत होतो आणि ती जाणून घ्यायची. मला फक्त आपण आहोत एवढी जाणीवच तेवढी होती. बाकी शरीर कुठे होतं कोण जाणे? पण हृदयाची स्पंदनं  आणि श्वासोच्छावास पण जाणवत होते. म्हणजे तिथे फक्त जाणणारा मी होतो पण जाणवणारा मी डोळ्यांना दिसतच नव्हतो. म्हणजे फसगत नेमकी कशाची होत होती डोळ्यांचीच कि सगळ्याच इंद्रियांची ते काही काळात नव्हतं. 


तेव्हा मी जागृती, सुषुप्ती, निद्रा कि समाधी यापैकी कोणत्या अवस्थेत होतो हे मला अजून कळलेलं नाही. ती नेमकी कोण होती याचाही मी अजून विचार करतोय.......

शनिवार, ३१ मार्च, २०१२

क्षण


भविष्यात सगळं काही मस्त, आनंदी-आनंद वगैरे दडलेलं आहे आणि हा वर्तमान तेवढा खडतर असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि एकदा का हा काळ संपला कि मग आयुष्य कसं मजेत जगता येईल या भाबड्या आशेनं आपण हाती असलेला सोनेरी क्षण जगायचं सोडून धावत सुटतो . आणि जेव्हा आपण आपल्या इच्छित क्षणापर्यंत पोहोचतो तेव्हा लक्षात येत कि इथे तर काहीच वेगळं नाही सगळं काही तसंच आहे. उलट काही मोठे प्रश्नही आहेत स्वागत करायला. पण केव्हातरी आपल्या हाती असलेले क्षणही आता आपले राहिलेले नसतात. त्यांच्या आठवणी झालेल्या असतात किंवा त्याही नाही कारण ते आपण जागलेलोच नसतो. त्या क्षणांसोबातच कदाचित इतरही बरंच काही गमावलेलं असतं आपण पण याची जाणीव होण्याइतकीही उसंत घेत नाही आपण. आणि एवढं सगळं होऊनहि आपण परत धावतच राहतो हातचं सोडून पळत्यापाठी. आणि मग कुठल्यातरी क्षणी आपल्या लक्षात येत कि आता आपले इथले सगळेच क्षण संपलेत आणि जगायचं तर राहूनच गेलं. अशा वेळी धावायचं थांबवतो आपण कारण पुढे काहीच नसतं धावण्यासाठी. म्हणजे क्षण तर असतातच पण ते आपले नसतात. मग आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येत कि  आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांसोबातच दूर कुठेतरी आपली जिवाभावाची माणसेही हरवली आहेत जी अशा सांजवेळी आपल्यासोबत असायला हवी होती. आणि जी आपल्यासोबत असतात ती त्यांच्या भविष्याचा वेध घेत धावत असतात, जसे आपण धावलो, जगायचं सोडून. पण हा साक्षात्कार व्हायला सगळे क्षण संपायलाच हवेत का? आयुष्यातल्या एक दोन प्रसंगातूनही असं होणार हे कळून येतंच की. तासाच प्रसंग (म्हणजे काही फार भयंकर वगैरे नाही , आपण ज्याला enlightening  incidence वगैरे म्हणू तसा) काल घडला. आणि झोपताना विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की अरे आपलं हे नेहमी असंच  होत आलंय. मग ठरवलं की हातात आलेला प्रत्येक क्षण जागायचा. आयुष्यात आलेली माणसं जपायची. म्हणजे शेवटी आपण आयुष्यातले बरेच क्षण जगलो असं समाधान तरी असेल. आणि हे असं फक्त त्या शेवटच्या क्षणी मिळणाऱ्या समाधानासाठीच करायचं असं  नाही. एकदा का आपण प्रत्येक क्षण जगायला लागलो की मग आपण  जिच्यासाठी म्हणून धावत होतो ती गोष्ट त्या प्रत्येक क्षणांमध्ये सापडते. आणि मग आपण आपला शेवटचा क्षणही जगतो. तोही अगदी मनसोक्त...........!

गुरुवार, २२ मार्च, २०१२

NP Complete

आपलं मन किती विचित्र असतं ना, लहान मुलासारखं. जे आपल्याजवळ नाही तेच नेमकं त्याला हवं असतं. म्हणजे त्याला सतत काहीतरी हवंच असतं. कधी गर्लफ्रेंड, कधी पैसा, कधी stability , तर कधी काही वेगळं. ही यादी कधीही न संपणारी आहे. पण कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपलं मन थकून जातं, खेळून दमलेल्या लहान मुलासारखं. मग अशा वेळी त्याला काहीही नको असतं. हवा असतो तो पाठीवरून फिरणारा मायेचा हात आणि थोडीशी विश्रांती, जेणेकरून ते पुन्हा धावायला सज्ज होईल. आणि अशा क्षणीच realise होतं कि हि सगळी धावपळ कशासाठी, नेमकं कशाच्या मागे जात आहोत आपण हेच आपल्याला माहिती नाही.  मला जेव्हा मला आयुष्यात नेमकं काय हवंय असा  प्रश्न पडतो तेव्हा माझ्याकडे एकच उत्तर असतं- समाधान. पण ते कसं मिळेल हेच माहिती नसतं. सगळ्यांचं असंच असतं बहुतेक.  computer science च्या भाषेत असल्या प्रोब्लेम्सना NP complete प्रोब्लेम्स म्हणतात. आयुष्यात असे बरेच NP complete प्रॉब्लेम्स  असतात. काळाच्या ओघात आपल्याला त्यांची उत्तरंही मिळत जातात. पण आयुष्यातले सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात. काही सोडून द्यायचे असतात. कारण आयुष्य म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरं देणं नव्हे तर कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते सोडून द्यायचे हे शिकणं होय.

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

शाळा माझीही

तिकडे महाराष्ट्रात 'शाळा' रिलीज झालाय. मला इकडे चेन्नईमध्ये तो कधी पाहायला भेटेल ते माहिती नाही. तसं मी शाळा हि कादंबरी वाचली आहे साधारणपाने दोन वर्षांपूर्वी. मस्त आहे खूप. आता नेटवर 'शाळा'चे reviews  पाहून परत कादंबरीची आणि मग अर्थातच माझ्या शाळेची आठवण झाली. खरं तर हि कादंबरी वाचणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या शाळेची आठवण होतेच. आणि मग आपण आपल्या नववीच्या वर्गात जातो. मग आपल्याला परत भेटतात 'सुऱ्या', 'चित्र्या','फावड्या' वगैरे मित्र मंडळी. आणि हो त्या आपल्या वर्गात असणारी 'शिरोडकर'सुद्धा. त्यांची नवे हि काहीही असोत, हि मंडळी थोड्या फार फरकाने सर्वांच्याच आयुष्यात आलेली असतात. आणि आपलीहि गोष्ट थोड्या फार फरकाने 'जोश्या'सारखीच असते, नाही का?