मी काही लई भारी लिहितो असा दावा करत नाही पण कधी कधी असं होतं कि मी माझाच ब्लॉग जेव्हा वाचतो तेव्हा एखादी चांगली पोस्ट वाचून वाटतं कि 'अरेच्चा, हे मी लिहिलंय? कसं काय सुचलं बुवा आपल्याला हे?' पण असं जेव्हा वाटतं तेव्हा थोडासा आनंदही होतोच. आणि का नाही होणार? आपले विचार नेमक्या शब्दांमध्ये गुंफता येणं हे आनंददायीच असतं. ते नेहमीच जमतं असं नाही. कधी कधी शब्दांची ओढाताणही करावी लागते. असे ओढाताण करून लिहिलेले कित्येक ड्राफ्ट ब्लॉगवर पडून आहेत.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४
शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४
वास्तव आणि अवास्तव
आपल्या अपेक्षा आपल्या इगोचंच प्रतिबिंब नसतात का? निदान मला तरी तसं वाटतं. नाहीतर स्वतःच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत कोण कशाला पडतो? पण वास्तव आणि अवास्तव अपेक्षा यांच्यातली सीमारेषा कुठेय? निदान ती निश्चित करून घेतली पाहिजे… पण आपला इगो पण बडी कमाल की चीज है भाई. स्वस्थ बसू देईल तर शपथ. अर्धा असलेला ग्लास पूर्ण भरल्याशिवाय चैन नाही. आणि याहून विशेष म्हणजे हे सगळं कळतं हो पण वळत नाही ना.
बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४
आदर्शवाद
तुम्हांला वाटतं का की आपण आदर्शवादाच्या फारच आहारी गेलो आहोत? संस्कृती, परंपरा, धर्म वगैरेंच्या नावाखाली खोट्या समजुतींना घट्ट धरून बसलो आहोत? आम्हांला प्रत्येक पुरुष हा मर्यादापुरुषोत्तम राम आणि प्रत्येक स्त्री ही सीता असावी असं वाटतं. आम्हांला अगदी आदर्श नागरिक हवे असतात. लहानपणापासून प्रत्येकानेच कसं आदर्श असलं पाहिजे याचे पाठ पढवले जातात. घरी दारी शाळेत अगदी सगळीकडेच. कुणी एखादा चुकला कि राईचा पर्वत करून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण केला जातो. मग लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच या खोट्या आदर्शवादाच्या भोवऱ्यात सापडून वाहत जातात. ते कधी वर येतच नाहीत. हा आदर्शवाद पिढ्यानपिढ्या तसाच पुढे पसरत जातो. आम्ही आमच्या महापुरुषांमध्येही देवाचा अंश शोधत बसतो. त्यामुळे त्यांचं माणूस असणंच नाकारतो आणि मग त्यांच्या चुकाही साहजिकच नाकारतो. किंबहुना त्यांना चुका करण्याची मुभाच देत नाही. पण माणसाला देव करण्यापेक्षा त्याला माणूस म्हणून त्याच्या चुकांसाहित स्वीकारायला आपला समाज कधी शिकणार? 'आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही' असं सांगताना कित्येक आई वडिलांची छाती अभिमानाने फुलून येते पण त्या मुलाच्या इच्छेचं काय? त्याच्या स्वप्नांचं काय? इथे मतभेद असण्याची शक्यताच मुळी नाकारली जाते. अशा सतत आदर्शांच्या दडपणात जागणाऱ्या समाजात कोण कसं सुखी होणार?
शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४
हैदर
हैदर एक चांगली कलाकृती आहे. पण त्यामध्ये भारतीय सैन्याचं जे चित्रण केलंय ते मात्र धडधडीत खोटं आहे आणि फुटीरवाद्यांना सपोर्ट करणारं आहे. मला एक गोष्ट कळत नाही की बॉलीवूडवाले फुटीरवाद्यांच्या एवढं का प्रेमात पडलेत. इतकंच प्रेम उफाळून येत असेल तर पाकिस्तानात जाऊन चित्रपट बनवा आणि तिकडेच प्रदर्शित करा. हे म्हणजे भारताच्या तुकड्यांवर जगायचं आणि पाकचे गुणगान गायचे असं झालं. फक्त बॉलीवूडवालेच नाही तर अरुंधती रॉयसारखे तथाकथित पुरोगामीसुद्धा हाच सूर आळवतात. म्हणजे त्यांच्या आणि नवाझ शरीफ वगैरेंच्या विचारांत किती एकवाक्यता असते पहा. नवाझ शरीफ यांचं मागे संयुक्त राष्ट्रामध्ये जे भाषण झालं अगदी त्याचा प्रतिध्वनी वाटावा असा हैदर हा चित्रपट आहे. हे असं का हो ? ज्या भारतीय सैन्याने पुराच्या थैमनतुन काश्मिरींना वाचवलं, जे भारतीय सैन्य दिवस रात्र डोळ्यात तेल घालून यांचं आणि देशाचं रक्षण करतं त्याच सैन्याचं असं चित्रण करून काय साधायचंय यांना? कि काहीतरी वादग्रस्त केल्याशिवाय यांचं समाधान होतच नाही? हा सरळ सरळ देशद्रोह नाही तर काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे जे काय असेल ते असेल हो, पण अभिव्यक्तीच्या नावाखाली तुम्ही जो खोटेपणाच बोंबलून जगाला सांगता आणि फुटीरवाद्याचं जे गलिच्छ उदात्तीकरण करता त्याचं काय? Hamletवर चित्रपट बनवायला यांना काश्मीरची पार्श्वभूमी का घ्यावी लागते ते काळात नाही बुवा. यांचं फंडिंग अल कायदा किंवा तत्सम दहशतवादी संघटनांकडून होत असणार. अन्यथा कोणत्या देशातले लोक त्यांच्याच देशाचं असं demeaning portrait रंगवतात.
बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४
स्थितप्रज्ञ
(आमच्या एका फोन संभाषणाचा हा सारांश)
आनंदाच्या हजार क्षणांपेक्षा दुःखाचा, उद्वेगाचा, वेदनेचा एक क्षण माणसाला स्थितप्रज्ञतेच्या जवळ घेऊन जातो. माणसानं स्थितप्रज्ञ असावं की नसावं हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकतो, पण 'कठीण समय येता' स्थितप्रज्ञ वृत्ती कधीही चांगली असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि तसा अनुभवसुद्धा आहे. 'पण त्यासाठी दुःख भोगलंच पाहिजे का' हाही युक्तिवाद अगदी मान्य. पण आयुष्यात नेहमीच सुख येत नाही हेही सत्य आहे. शेवटी काय तर 'समलोष्टाश्मकांचन' हे महत्त्वाचं.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)