दोन वर्षांपासूनची तिची माझी साथ आज अचानक संपुष्टात आली. ध्यानीमनीही नसताना. आज सकाळी उठलो तेव्हा वाटलंसुद्धा नव्हतं कि आजच दिवस इतका निष्ठुर असेल. अगदी संध्याकाळपर्यंत सगळं नॉर्मल होतं. कदाचित मलाच ते नॉर्मल वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आय आय टी मध्ये आलो तेव्हापासून आम्ही सोबत होतो. ती पण नवीनच होती इथे. आमची पहिली भेट मला अजून आठवते. १ जानेवारी २०१२. संध्याकाळी सहा सातच्या सुमारास मी पहिल्यांदा तिला पाहिलं आणि तेव्हापासून एकही दिवस असा नाही जेव्हा आम्ही भेटलो नाही. रोजच भेटगाठ व्हायची. तिच्या असण्याची अगदी सवय झाली होती. इतकी की तिच्या नसण्याची कल्पनाच करू शकत नव्हतो. पण आता ती नाही हेच सत्य आहे. तिच्या जाण्याच्या धक्क्यातून अजून पुरता सावरलोही नाही मी. ती कायमचीच गेली. पुन्हा मला कधीही भेटणार नाही. आत्ताच तिच्या जाण्याची तक्रार इथल्या सिक्युरिटी ऑफिसमध्ये नोंदवून आलो. कारण ती माझी सायकल होती मित्रांनो आणि ती चोरीला गेली.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३
शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३
आपल्याला जग जसं दिसतं, आपण जी सुखदुःखं अनुभवतो, ते सगळं अगदी जशाला तसं नसलं तरी निदान काही अंशी कुणाला तरी सांगावं , कुठं तरी व्यक्त व्हावं म्हणून शब्दांचा आधार. अनुभूतीला किती अंगं, किती कंगोरे! बदलत जाणाऱ्या, हिंदोळणाऱ्या मनाबरोबर बदलणारे दृष्टीकोण, बदलणारे संदर्भ, बदलणारे अर्थ, बदलणाऱ्या जाणीवा, आणि एकूणच बदलणारं जगच. स्थिर असं काय आहे? शाश्वत असं काय आहे? चिरंतन असं काय आहे? आलेला प्रत्येक क्षण भूतकाळाच्या अथांग सागराचं अंग होऊन जातो, आपल्याही नकळत. आपण "जुने जाऊद्या मरणालागुनी " म्हणत नव्याच्या स्वागतासाठी सज्ज होतो. पण खरंच जुनं ते मरणपंथाला जातं? आपल्यालाही जुनं ते सारंच सरणावर जावं असं कुठे वाटतं ? मला तरी तसं नाही वाटत. उलट जुनं ते सगळंच मस्त वाटतं. ते सुखदायक असो कि क्लेशदायक. असंच कधी कधी चित्रपट पाहिल्यासारखं आठवायचं. हवं तर फास्ट फॉरवर्ड करायचं, हवा तो भाग रिपीट मोडमध्ये प्ले करायचा. आहे कि नाही मस्त?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)