हा लांबच लांब डांबरी काळसर रस्ता, दूरपर्यंत कुठेच वळण नसलेला. सरळ त्या डोंगराच्या कुशीत शिरणारा. हा कोसळणारा पाऊस आणि त्यात चिंब भिजणारं शिवार. रस्त्यावर पाणी पडून त्यात पुसटसं हिरव्या पेन्सिलने रेखाटल्यासारखं दिसणारं झाडांचं प्रतिबिंब. रस्त्याच्या दुतर्फा झाडांवर आणि रानांमध्ये झालेली हिरव्या-पिवळ्या रंगाची उधळण. दूर डोंगरावर हळूच उतरत असलेले ढग आणि त्या ढगांत धुसर होत जाणारं डोंगरावरचं ते महादेवाचं देऊळ आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी निपचित पडलेला गाव. हे सगळं मी कित्येक वर्षे इथे कड्यावर उभा राहून पाहतोय. अगणित तपं उलटली मला इथे उभं राहून. तुम्हां माणसांच्या कित्येक पिढ्या माझ्या समोर जन्मल्या नि काळाच्या पडद्याआड गेल्या. माझ्या बरोबरीने, किंबहुना माझ्याही आधीपासून, तिथे उभे आहेत ते म्हणजे तो समोरचा निळसर डोंगर आणि त्यावरचं भगवी पताका पेलणारं ते देऊळ आणि त्या देवळातला तो देव. बाकी सगळे काळसर्पाने गिळून घेतले.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६
मंगळवार, २६ एप्रिल, २०१६
मनोगत
आमच्यासारखे लोक लवकर उद्विग्न होतात, दुःखी होतात, खिन्न होतात, भावूक होतात, भारावून जातात आणि आनंदीही होतात. याचा अर्थ आम्हांला स्थितप्रज्ञता कळलेली नसते असं नव्हे. आम्ही केवळ मनात उठणाऱ्या तरंगांना प्रतिसाद देत असतो एवढाच काय तो फरक. कधी उदास वाटत असेल किंवा अत्यानंद वाटत असेल तर तो अख्खा दिवस आम्ही त्याच मूडमध्ये राहतो. व्यवहार आम्हांलाही तेवढाच कळतो जेवढा स्वतःला व्यवहारी म्हणून टेंभा मिरवणाऱ्यांना कळतो. फक्त भावनांच्या आवेगाला थोपवून धरणं आम्हांला जरा अवघड जातं आणि आमची तशी इच्छाही नसते. आम्ही त्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो आणि वाहत जातो. आणि तसं वाहताना कसलाच व्यवहारीपणा आम्हांला स्पर्श करत नाही. आम्ही अगदी तिथे असतो जिथे मन असतं. उगाच बुद्धीच्या मागे फरफटत जायला आम्हांला जमत नाही.
-----------------------------------------
डायरीच्या पानातून (दि. २ जून २०१५ )
-----------------------------------------
नेहमीसारखीच एकाकी रात्र हळूच उतरलीय. संधिप्रकाशाला मागे सारून आत्ता माझ्या समोर तिने सगळ्या शहराला आपल्या काळोख्या मिठीत घेतलंय. घरोघरी, रस्तोरस्ती, गल्लोगल्ली बल्ब, ट्यूबलाईट्स पेटायला लागलेत. प्रवासी पक्षांचे थवे आपल्या वाटेवर मार्गस्थ झालेले दिसतायत. निरव असा मंदसा वारा हळूच वाहतोय. वाऱ्याचा तो स्पर्श डोळे आणि कान यापलीकडे असलेल्या आपल्याच असण्याची जाणीव करून देतोय. लाटांच्या गाजांनी सगळा आसमंत निनादून टाकलाय. वर आकाशात चांदण्यांच्या गर्दीतून चंद्रबिंब डोकावातंय. दूर एक विमान हळूच खाली उतरतंय अगदी समुद्रपक्षी पाण्यावर उतरावेत तसं. आणि मी इथे समुद्रकिनारी या सगळ्यांचा आस्वाद घेत बसलोय मस्त.
मागे रस्त्यावर वाहनांची रेलचेल चालूच आहे पण त्याची समुद्राला आणि मलाही कसली आली तमा. तो आपला मस्त आहे आपल्याच विशालकाय अस्तित्वात रमलेला. त्याला ना शब्दांच्या कुबड्यांची गरज ना कुणाच्या सहानुभूतीची. आपलं अस्तित्व तो आपल्या असण्यातूनच सतत प्रकट करत असतो. समुद्रकिनारी मलाही एकदम विशालकाय झाल्यासारखं वाटतं, या अफाट निसर्गाचा एक भाग असल्यासारखं वाटतं, आपलं असणं सार्थकी लागल्यासारखं वाटतं. आपले सगळेच प्रश्न अगदी लहान वाटायला लागतात. संकुचित, क्षुद्र विचारांना जागाच उरत नाही मनात. ते उदात्त भावनांनी ओसंडून वाहतं. प्रश्नसुद्धा मोठे मोठे पडू लागतात आणि तशाच उदात्त कल्पनाही सुचायला लागतात.

शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)