(पांडुरंग सांगवीकरच्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे अगदी सहज वगैरे लिहिलं. माणसानं कसं स्वतःशी प्रामाणिक वगैरे असावं म्हणून. नाकर्तेपणा जिंदाबाद ...! )
माझे बी. टेक.चे दिवस म्हणजे काही लय भारी वगैरे नव्हते. म्हणजे ते कॉलेज डेज वगैरे असं काही मी मुळीच मिस करत नाही. नाही म्हणायला काही आठवणी आहेत, पण 'जाने काहां गए वो दिन' असलं फिल्मी मुळीच नाही हं. खरं तर फायनल इयरला असताना जाम कंटाळा आला होता कॉलेजचा. कधी एकदा इथून बाहेर पडतो असं झालं होतं. उगाच खोटं कशाला सांगा? काही लोक उगाच मसाला लाऊन लाऊन आपल्या कॉलेजच्या दिवसांचं वर्णन करत असतात जणू काही ते त्या कॉलेजचे हिरोच होते. खरं सांगायचं म्हणजे कॉलेजच्या दिवसांत मी एकदम सुस्त प्राणी होतो. चार वर्षांत काही म्हणजे काहीच केलं नाही. फक्त पास होण्यापुरता अभ्यास तेही पर्याय नव्हता म्हणून करावा लागला. आणि निव्वळच पर्याय नव्हता असंही काही नाही. कधी कधी अभ्यासात मजासुद्धा यायची. कधी कधी आपण हे म्हणजे लय भारी शिकतो आहोत असं वाटून एकदम उत्साहाची भारती यायची. पण ती लगेच ओसरुनही जायची. आणि इंजिनिअरिंगची इतर मुले करतात तसं मी मुळीच क्लेम करत नाही कि परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून मी पास झालो. गरजेपुरता अभ्यास करायचो. उगाच स्वतःला हुशार म्हणून प्रोजेक्ट कशाला करा?
तर सांगायचं म्हणजे नाईलाज म्हणून केलेला अभ्यास सोडला तर आमचे बीटेकचे दिवस म्हणजे एकदम कोरेच. कुठल्या कल्चरल प्रोग्राममध्ये, कुठल्या स्पोर्टमध्ये कशातच भाग घेतला नाही. बरं अभ्यासात लय भारी होतो असंही नव्हतं. दिवसभर क्लासेस झाले कि रूमवर येउन गप्पा मारत बसायचं किंवा मग युनिवर्सिटीकडे फेरफटका मारायचा नाहीतर काळेश्वरला जायचं हा एकच उद्योग होता आमचा. हो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये माझ्यासारखीच काहीही न करणारी बरीच मित्रमंडळी होती. म्हणजे एकंदरच काय तर कॉलेजात आम्ही एकदम मिडल क्लास विद्यार्थी होतो. पण हे सगळं ठरवून वगैरे नव्हतं, सर्वांना वाटतं तसंच 'आपण काहीतरी वेगळं करावं' असं वाटायचं पण नेमकं काय करावं हेच कळायचं नाही. सीव्हीमध्ये लिहायला म्हणून थर्ड इयरला असताना एक इव्हेंट तेवढा ऑर्गनाईझ केला होता. तेच काय ते वेगळं. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे थर्ड इयरला असतानाच एका मुलीला प्रोपोज केलं होतं पण तिकडून नकार आला आणि तो प्रयत्न सपशेल फसला.
आणि उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून सांगतो कि मी आमचं काहीही न करणं ग्लोरिफाय वगैरे करत नाही बरं का. पण त्याची काही खंतसुद्धा नाही. उलट त्या दिवसांकडे मी आता त्रयस्थपणे पाहतो. पण त्रयस्थपणे म्हणजे रुक्षपणे नव्हे. काही मजेदार, काही गमतीशीर, काही हळव्या(?) आठवणीही आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा