पृष्ठे

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

पाऊस: तेव्हा


मी सहावी सातवीत असेल. शाळा घरापासून जवळपास एक-दीड किमीवर होती.    शाळेवर टीनची पत्रे होती. तेव्हाचा पाऊस पण माझ्या एवढा होता. कधी कधी दुपारीच मध्यंतरनंतर आभाळ भरून यायचं. काळंकुट्ट व्हायचं. शाळेच्या अवती भवति सगळी शेतंच शेतं होती. आणि माझी जागा नेमकी विंडो सीट असायची. मग काय बाहेर एकदम मस्त चित्र दिसायचं. शेतांमध्ये कुठे भुईमुग, कुठे ज्वारी, कुठे ऊस, कुठे कापूस अशी पिकं डुलत असायची. आणि ढगाळ वातावरणात पिकांचा हिरवा रंग अजूनच खुलायचा. थंड वारा सुटायचा. खिडक्यांची आदळ आपट व्हायची. शिकणं शिकवणं बाजूलाच राहायचं. सगळेच मग पावसाचा आनंद घ्यायला सज्ज व्हायचे. थोड्याच वेळात मग एक थंड झुळूक यायची आणि त्यामागोमाग हलक्या सारी उतरायच्या. पत्रांचा आवाज व्हायचा. ते एक संगीतच असायचं. मग त्या आवाजामध्ये आम्हा मुलांचा आवाज मिसळून जायचा. बोलायला तेवढीच संधी मिळायची. आता इथून पुढचे तास होणार नाहीत याचा अजून आनंद असायचा. मग कुठे कुठे पत्रे गळायला लागायची. बेंचेस मागे पुढे सरकवले जायचे. मग मध्येच विजेचा कडकडाट. पण त्याला कोण जुमानतो? शाळेचं ग्राउंड ओलं चिंब होऊन जाई. त्यावरचे खोखोचे पोल्स स्थितप्रज्ञपणे भिजत उभे असायचे. नवीनच लावलेली नारळाची आणि इतर झाडं पावसात नाहून निघायची. शाळेच्या भिंतींतून पाणी झिरपू लागायचं. बाहेर एखादं कुत्रं अंग चोरून झाडाशी उभं असलेलं दिसे आणि त्या बिचाऱ्याची दया येई. रस्त्यावरून एखादीच भिजत जाणारी सायकल दिसे. हवेसोबत उडणारे पावसाचे फवारे बघायला अजूनच मजा येई. मग पाऊस कमी झाला कि शाळा सुटायची. आणि सगळे एकदम गोंधळ करत वर्गाबाहेर पडायचे. पावसाशी पाठशिवणीचा खेळ सुरु व्हायचा. त्यानं गाठायच्या आत घरी पोचायचं असे. पण तो कसला आम्हांला कोरडा सोडतोय? बरोबर अर्ध्या वाटेत आलं कि गाठायचा. आणि तो येताना दिसायचा. कधी कधी आम्हांला समांतर शेतांतून चालायचा. पण मग आमच्याकडे मोर्चा वळायचाच त्याचा. मग काय छत्री असेल तर तिचा आडोसा नाहीतर भिजत जायचं. भिजल्याच्या भीतीपेक्षा भिजल्यावर घरी रागावतील याचीच भीती असायची. पण तरीही सगळ्यांसोबत भिजायला मस्त वाटायचं. रस्त्यांवरून ओहाळ वाहायला लागायचे. त्यातून चालायला मजा यायची. एखादं वाहन आलं कि सगळे रस्त्याच्या खाली उतरायचो. पण तरीही पाणी उडून अंगावर यायचंच. मग सगळे एका आवाजात  त्याला ओरडायचे. एखाद्या झाडाखालून जाताना आमच्यावर पाणी उडवून ते झाड सुद्धा आम्हांला भिजवून टाकीत असे. तेव्हा जे शिकलो, जे घडलो ते या पावसाच्याच साक्षीनं, याच्याच सान्निध्यात. आताही तो आला कि या आणि इतरही सगळ्याच पावसाळी आठवणी घेऊन येतो. मनाला ओलं चिंब, हिरवं करून टाकतो. 

आठवणींना धुमारे 
मनाला शहारे 
गर्द हिरवे नजारे 
म्हणजे पाऊस 

मनाचं चिंब होणं 
आठवणींत धुंद होणं 
मृद्गंधाचं मंद दरवळणं  
म्हणजे पाऊस 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा