पृष्ठे

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

सृजन

(सहजच सुचलं आणि लिहिलं.) 

काही लोक  मोठे असतात म्हणून लिहितात आणि काही लिहितात म्हणून मोठे असतात आणि बाकीचे माझ्यासारखे बरेचजण मोठे नसतात. पण म्हणून काही ते लिहित नाहीत असं नाही. (आणि ते सर्वच जण लिहितात असंही नाही.) अभिव्यक्त तर प्रत्येकाला व्हायचं असतं. आणि अभिव्यक्तीबरोबरच किंवा त्यापेक्षाही जास्त सृजनाचा आनंद लिखाणातून मिळतो म्हणून मी लिहितो. आणि लिहिणं हे प्रत्येक वेळी सृजनच असतं असंही नाही पण ते आनंददायी असतं यात दुमत नाही.

लेखक, कवी या लोकांबद्दल लहानपणापासूनच म्हणजे कळायला लागल्यापासून नितांत आदर वाटतो. हे लोक म्हणजे शून्यातून विश्व कसं करायचं हे बरोबर जाणतात.म्हणजे पहा सृजनाचा काय  आनंद घेतात ना हि मंडळी. आणि हीच का आणखीही काही लोक आहेत म्हणजे चित्रकार, संगीतकार, गायक, वगैरे कलाकार मंडळी तेही सृजनच करत असतात. आणि माझ्या मते जगतात तर हेच लोक. आणि त्याखालोखाल काही प्रमाणात रसिक मंडळी. यात खूप जण आले. निर्मिती मग ती कसल्याही प्रकारची असो आनंददायी असते. 

प्रतिभा नावाची एक गोष्ट प्रत्येक नवनिर्मिती मध्ये असते. लेखनाचा विचार केला तर प्रतिभा हा लेखाकांमाधला differentiating factor  म्हणता येईल. आणि प्रतिभा हि निसर्गदत्तच असली पाहिजे. आपल्या प्रयत्नांनी फार फार तर लिखाण कौशल्य सुधारता येईल पण लिखाण प्रतिभाशाली होईलच असं नाही. ती दैवी देणगीच. म्हणूनच ज्ञानेश्वरांना १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिता येते आणि आमच्यासारख्यांना ती हाती घ्यायलाही वयाची २३ वर्षे जावी लागतात. 

ज्ञानेश्वरीवरून लक्षात आलं- ज्ञानेश्वरी वाचनाचा आनंदच काही और आहे. गीतेवरच  एवढं विश्वासार्ह भाष्य क्वचितच भारतीय साहित्यात आढळून येईल. तसं ते नाहीच येणार असं म्हटलं तरी चालेल. मी म्हणतो केवढी हि प्रतिभा आणि किती माह्त निर्मिती. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास किंवा थोडं मागे गेलं तर व्यास, वाल्मिकी, आणि वेदांचं सृजन करणारे असंख्य अज्ञात जण आणि जगातल्या कित्येक भाषांना आपल्या प्रतिभेच्या आविष्काराने समृद्ध करणारे असंख्य साहित्यिक यांना पाहून निसर्गच धन्य होत असेल कारण हि सर्व त्याचीच निर्मिती. देव आहे कि नाही याबद्दल कुणी काहीही म्हणो मी तर म्हणेन तो आहे. कारण चेतनच केवळ निर्मितीक्षम असतं. जड ते केवळ असतं पण त्याला आपल्या अस्तित्वाची देखील जाण नसते. मग निसर्गाची निर्मितीक्षमता ही कुठून आली? ती त्या चैतन्याचंच लक्षण आहे.

माझ्या लिखाणाला अनुभवाची चौकट अजून तरी पार करता आलेली नाही. तशी अपेक्षाही नाही कारण तेवढी योग्यातही अजून नाही. म्हणून माझं लिखाण हे क्वचितच सृजनशील आहे. त्यापेक्षा ती अनुभूतीची, भावनांची, विचारांची, मतांची अभिव्यक्ती आहे असं मी म्हणेन. शब्द माझे असं मीच काय कुणीच म्हणू शकत नाही. मी फक्त त्यांचा क्रम तेवढा ठरवणार. आणि हे तरी मी केलं असं कसं म्हणावं. कारण माझ्यासहित हे सर्वच त्या सृष्टीकर्त्याचीच तर निर्मिती आहे. आणि त्याच्याच चरणी अर्पण.
                                                           ||श्रीकृष्णार्पणमस्तु ||