महापुरुषांना महात्म्य, देवाला देवत्व कोण देतो? आपणच ना? आपल्या या डबक्याएवढ्या जगातल्या नैतिकतेच्या, आदर्शाच्या व्याख्यांत त्यांना आपण चपखल बसवतो आणि मग त्यांची पूजा मांडतो हारतुरे घेऊन. आपणच त्यांना आदर्शांच्या अत्युच्च शिखरावर नेउन बसवतो आणि मग त्यांचं खाली उतरणं आपल्यालाच रुचत नाही आणि पचतही नाही. त्यांचं माणूस असणंच नाकारून आपण त्यांना अस्पृश्य करून टाकतो. त्यांना वास्तवाच्या प्रकाशापासून दूर ढकलून कल्पनांच्या अंधाऱ्या देवळात बसवतो. आपले आदर्श असे आपणच दूर सरतो आणि आपल्यातल्या कुणालाही त्यांच्या जवळपासही जाऊ देत नाही.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५
बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५
क्षणिक बुद्धत्व
बुद्धत्व - सगळ्या इच्छांपासून मुक्ती, सगळ्या आकांक्षांपासून मुक्ती. बुद्धाचं निर्वाण हे त्याच मुक्तीचं रूप. पण तुम्हाआम्हासारख्यांना तिथपर्यंत पोचत येत नाही. बुद्ध म्हणजे अगदी मुक्तीचीसुद्धा आस नसणे. सगळ्यांनीच निर्वाणाची आस धरली तर ते एक तर बुद्धही होऊ शकणार नाहीत कारण तिथे इच्छा आली आणि दुसरं म्हणजे जगाचा गाडासुद्धा बंद पडेल. पण कधी कधी माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा त्याला काही सत्ये उलगडतात आणि अगदी बुद्धाएवढा नाही तरीही त्याच्या काही अंश म्हणावा एवढा साक्षात्कार होतो. तो तो प्रत्येक प्रसंग माणसाला बुद्धात्वाच्या जवळच घेऊन जातो असं मला वाटतं. ते आपलं क्षणीक बुद्धत्व. मग ते निराशा, दुःख, अपेक्षाभंग इत्यादी कशातुनही आलेलं असेल. तो क्षण खरा असतो, ते वाटणं खरं असतं, तो साक्षात्कार खरा असतो. बाकी प्रत्येक क्षणी आपण स्वतःला फसवत असतो. पण बुद्धत्व म्हणजे नाकर्तेपणा नव्हे. बुद्धत्व म्हणजे संन्यासी होऊन हिमालयात जाणेही नव्हे. बुद्धत्व म्हणजे स्थितप्रज्ञता. बुद्धत्व म्हणजे "कर्मण्येवाधीकारास्ते मा फलेषु कादाचानः".
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५
आपल्या सुख-दुःखांचं, आपल्या अनुभवाचं जे काय कौतुक असतं ते फक्त आपल्यालाच असतं. इतरांना त्याची उब किंवा झळ कधीच पोहचत नाही आणि म्हणूनच त्यातला आनंद किंवा आगतिकता कधी जाणवत नाही. शेवटी त्या बऱ्यावाईट अनुभवातून जो धडा मिळतो त्याचे धनीही आपणच असतो. पण मग तरीही व्यक्त होण्याचा अट्टाहास असतोच आणि तो साहजिकच आहे. आपण ज्या परिस्थीचा सामना केलाय त्याबद्दल कुणीतरी आपली पाठ थोपटावी असं प्रत्येकाला वाटतं. त्याने काही होत नसलं तरीही पुढे अजून लढत राहायला बळ मिळतं.
बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५
मनातल्या आशेला धुमारे फुटत असताना कुठेतरी शंकेची टिटवी किंचाळते आणि परत ते धुमारे करपून जातात आणि घोर निराशा होते. अकारण जशी आशा उगवते तशीच ती लुप्तसुद्धा होते. उसनं अवसान आणलं की असंच व्हायचं. खरं तर आता आनंदातही आनंदी व्हावं की नाही हेच कळेनासं झालंय. स्वतःच्याच आनंदाला स्वतःचीच नजर लागेल ही भीती वाटत असते. जसा क्षणात उन आणि क्षणात पाऊस असा उन पावसाचा खेळ असतो तसं झालंय आशा-निराशेचं, सुख-दुःखाचं. या क्षणीची आशा पुढच्या क्षणी घोर निराशेत रुपांतरीत होते. या क्षणी आनंदी झालं की पुढच्या क्षणी काहीतरी बिनसतं. काही एका गोष्टीसाठी आता आनंदी व्हावं आणि तीच गोष्ट पुढच्या क्षणी नाहीशी व्हावी असं काहीतरी चालू असतं आणि आपला भला मोठ्ठा पोपट होतो नियतीच्या हातून.
(आणि हो, हे वाचून कुणीही प्लीज काय झालं म्हणून विचारू नका राव. काही नाही झालं खरं तर. मी मस्त आहे, मजेत आहे. जरा प्रॉब्लेम चालू आहेत आणि ते असतातच. मी असं काही लिहितो म्हणजे दिवसभर एकदम उदास वगैरे असतो असं काही नाही. कुठल्या तरी एखाद्या क्षणाचा उमाळा असतो असा. त्याचा असा शब्दंतून निचरा झाला की बरं वाटतं. जेव्हा मी काहीतरी लिहितो तेव्हा मी नॉर्मल आहे हे आसं समजा.)
मंगळवार, २१ जुलै, २०१५
व्यक्तिवाद आणि राष्ट्रवाद
आपले विचार आपल्या अनुभवातूनच येतात तरीही त्यांना मूर्त होण्यासाठी काहीतरी निमित्त हवं असतं. जसं अग्नी प्रज्वलित होण्यासाठी एक ठिणगी हवी असते तसं. लोकमान्य चित्रपट पाहतोय आत्ता. लोकमान्यांचा काळच वेगळा होता का हो? लोक देशभक्तीने अगदी भारावून गेलेले होते. इतके की देशासाठी अगदी प्राणही ओवाळून टाकायला तयार होते. सगळे नसतीलही कदाचित, पण निदान असे लोक होते. आम्हीही इतिहास शिकताना अगदी देशभक्तीने भारावून गेलोल होतो. जो काही थोडासा इतिहास आमच्या अल्पमतीला समजला त्यावरून देशासाठी मरायची नाही पण निदान थोडासा स्वार्थ त्याग करायची आमची मानसिकता तयार झाली आहे. देशभक्ती आमच्या लेखी एक उदात्त भावना आहे. आम्हांला वाटत असे की सगळेच देशभक्तीला उदात्त समजत असतील. पण ते तसं नाही. विशेषतः सोशल मिडियाच्या कृपेने बऱ्याच जणांचे विचार कळले आणि काही जण तर देशभक्तीलासुद्धा जेव्हा संकुचित ठरवतात हे पाहून वाटतं की आपल्या स्वातंत्र्यासाठी अगदी प्राचीन काळापासून जे लढले आणि हुतात्मे झाले त्यांचं काय? ते संकुचित होते म्हणून बळी गेले? की वेडे होते म्हणून? विचार स्वातंत्र्य जरूर असावं त्यात दुमत नाहीच. आपण व्यक्तिवाद (individualism) आणि राष्ट्रवाद (nationalism किंवा patriotism) यांचा समतोल साधायला हवा. जसा राष्ट्रवादाचा अतिरेक होता कामा नये तसाच किंबहुना त्याहून जास्त म्हणजे व्यक्तिवादाचा अतिरेक होता कामा नये. व्यक्ती आणि राष्ट्र एकमेकांना पूरक असावीत.
मंगळवार, ५ मे, २०१५
सोमवार, ४ मे, २०१५
एक स्वप्न
मरणाच्या दरीत कोसळताना
जगण्याचा पुन्हा मोह झाला
डोळ्यांदेखत माझ्या अन
चक्काचूर हा देह झाला
त्या नसण्यातही एक असणं होतं
जसं जगताना असून नसणं होतं
पण रात्र सरली स्वप्न भंगून
अस्तित्व पुन्हा मूर्त झालं
असण्याचा उन्माद घेऊन
जगणं पुन्हा धूर्त झालं
जगण्याचा पुन्हा मोह झाला
डोळ्यांदेखत माझ्या अन
चक्काचूर हा देह झाला
त्या नसण्यातही एक असणं होतं
जसं जगताना असून नसणं होतं
पण रात्र सरली स्वप्न भंगून
अस्तित्व पुन्हा मूर्त झालं
असण्याचा उन्माद घेऊन
जगणं पुन्हा धूर्त झालं
मंगळवार, २८ एप्रिल, २०१५
पण शब्द…
एक विचार मनात येतो
कविता होऊ पाहतो
पण शब्द…
एक भावना ओथम्बुन वाहते
प्रकट होऊ पाहते
पण शब्द…
एक गहिवर गळ्यात दाटतो
अश्रूंचा बंध फुटतो
पण शब्द…
एक आनंद मनात साठतो
अगदी गगनाला गाठतो
पण शब्द…
एक स्तब्धता मनात शिरते
संध्याकाळ एकाकी उरते
पण शब्द…
पण शब्द
हरवून जातात कुठेतरी
नकळतच केव्हा
किंवा नसतातच ते तिथे
हवे असतात जेव्हा
सोमवार, २० एप्रिल, २०१५
आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला जाणवतं की आपल्याला उभं राहण्यासाठी सुख, यश, अचिव्हमेंट्स, देव, दैव, समाजमान्यता यांसारख्या कसल्याच कुबड्यांची गरज नाही आणि कधीच नव्हती. आपण आपल्याच बळावर उभे आहोत आणि राहू शकतो, स्वयंभू असे. आपण आपल्यातच एक विश्व असतो. गरज असते ती जरा अंतर्मुख होऊन विचार करण्याची. स्वतःशीच संवाद साधण्याची.
मंगळवार, ३१ मार्च, २०१५
Keeping minds open...
I have believed this always. The whole point of this belief is why think in a constrained way? Why let your experience hinder your imagination? And also why let others' experience influence your opinion or belief or thoughts? Actually that's okay as long as the things are very objective and quantifiable. (I believe that beyond a limit everything is subjective. There is nothing objective at all in precise sense and the quantification is just an approximation). But where things start getting fuzzy, having first hand experience or at least keeping your skies open for your imagination to fly is better than accepting any idea alien to your mind. I have always believed that whatever knowledge we have acquired is almost correct 'so far' and may be not so in universal sense. You find one black swan and all your beliefs (or theories) are shattered. So it is advisable to just believe that swans are white 'so far'. Keep your mind open to new truths or new perspectives of the same truth. Even the electrons don't know objectively if they exist or not. Sometimes the term truth itself is the matter of experience rather than blind acceptance. It has many many ways to reveal itself and not just one. I also, most of the times, wonder if we have a capability to see the whole picture.
शुक्रवार, १३ मार्च, २०१५
Watching an awesome movie - "Liberal Arts". I like this, I mean watching the movies late night when everyone and everything around is asleep. Movies with good background music and a good story and near perfect words woven into dialogues expressing your own heart. While all you listen is just a periodic noise of the fan and your heart and of course the movie dialogues and music but all that is in sync with your heart. Yes, you listen to your heart when nothing else is there to disturb. No worries, no tensions, no problems, no questions. You keep all your worries and all your problems aside for this moment. And here you are listening to your true self. I like such movies and also such books which put your emotions, thoughts, opinions, feelings, etc. into precise words which you have always struggled to express. Sometimes you feel like that's exactly I have wanted to say always.
शुक्रवार, ६ मार्च, २०१५
India's Daughter
India's Daughter ही बीबीसीची डॉक्युमेंटरी पहिली. तिच्यामध्ये मला काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही आणि तिच्यावर बंदी घालायची काहीच गरज नव्हती. जे दाखवलं गेलं ती वस्तुस्थिती आहे. खरं तर या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची पाशवी मानसिकता जगासमोर आली. आणि गुन्हेगारच कशाला, खुद्द वकिलांचे बुरसटलेले विचार पाहून वाटलं आगोदर त्यांनाच फासावर लटकावलं पाहिजे. मुख्य म्हणजे गुन्हेगाराला आपण केलेल्या कृत्याचा यत्किंचितही पश्चात्ताप नाही हे पाहून तर नुसता संताप झाला. मान्य आहे की कायदेशीर कारवाई व्हायला वेळ लागतो, पण किती? आणि अशाच अनेक केसेस ज्या अजून लटकलेल्या आहेत त्या कधी निकाली काढणार? आपल्या न्यायव्यवस्थेवरही एक प्रश्नचिन्ह या निमित्ताने उभं झालं आहे
या डॉक्युमेंटरीवरून सोशल मिडियामध्ये दोन सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. एक जे बंदीची मागणी करतात किंवा सरकारचं समर्थन करतात आणि दुसरे जे बंदीला विरोध करतात. मला वाटतं डॉक्युमेंटरीवर बंदी घालून सरकारनं सगळ्या जगात स्वतःचं हसं करून घेतलेलं आहे आणि आपल्या देशाची नाचक्की करून घेतली आहे. डॉक्युमेंटरीमागे बीबीसीचा उद्देश काय असायचा तो असेल. बंदीची मागणी करणाऱ्यांचा युक्तिवाद असा की युरोप आणि इंग्लंडमधेही बलात्कार होतातच की त्याची का नाही डॉक्युमेंटरी बनवली जात? हा युक्तिवाद त्या डॉक्युमेंटरीमध्ये मुलाखत देणाऱ्या बलात्काऱ्याचीच भाषा नाही तर काय आहे? 'भारतात एवढे बलात्कार होत असतात मग बळी जाणारे आम्हीच का?' असं तोही विचारात होता आणि त्याचा वकीलही.
डॉक्युमेंटरीमुळे अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होईल आणि त्याचा आपल्या पर्यटनावर आणि आणखी कशावर परिणाम होईल अशी सरकारला भीती वाटत असेल तरीही इथे सरकारचं चुकलेलं आहेच कारण असं बंदी घालून गोष्टी लपवत येत नाही. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. असंही महिला सुरक्षेच्या बाबतीत भारताची प्रतिमा जगात फार उजळ आहे असं मुळीच नाही. नुसतंच incredible India म्हणून भागात नाही तर त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. नुसते कठोर कायदेच नाही तर त्यांची अंमलबजावणीही तेवढ्याच कठोरतेने आणि तत्परतेने व्हायला हवी. शासन, प्रशासन आणि पोलिस यांनी संवेदनशील आणि जागं असायला हवं. जनतेकडे नुसतं सब्जेक्ट्स म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहायला हवं. मुख्य म्हणजे न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलने करावी लागू नयेत कारण सगळ्यांनाच ते जमत नाही आणि तेवढी उर्जाही सगळ्यांमध्ये नसते.
या डॉक्युमेंटरीवरून सोशल मिडियामध्ये दोन सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. एक जे बंदीची मागणी करतात किंवा सरकारचं समर्थन करतात आणि दुसरे जे बंदीला विरोध करतात. मला वाटतं डॉक्युमेंटरीवर बंदी घालून सरकारनं सगळ्या जगात स्वतःचं हसं करून घेतलेलं आहे आणि आपल्या देशाची नाचक्की करून घेतली आहे. डॉक्युमेंटरीमागे बीबीसीचा उद्देश काय असायचा तो असेल. बंदीची मागणी करणाऱ्यांचा युक्तिवाद असा की युरोप आणि इंग्लंडमधेही बलात्कार होतातच की त्याची का नाही डॉक्युमेंटरी बनवली जात? हा युक्तिवाद त्या डॉक्युमेंटरीमध्ये मुलाखत देणाऱ्या बलात्काऱ्याचीच भाषा नाही तर काय आहे? 'भारतात एवढे बलात्कार होत असतात मग बळी जाणारे आम्हीच का?' असं तोही विचारात होता आणि त्याचा वकीलही.
डॉक्युमेंटरीमुळे अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होईल आणि त्याचा आपल्या पर्यटनावर आणि आणखी कशावर परिणाम होईल अशी सरकारला भीती वाटत असेल तरीही इथे सरकारचं चुकलेलं आहेच कारण असं बंदी घालून गोष्टी लपवत येत नाही. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. असंही महिला सुरक्षेच्या बाबतीत भारताची प्रतिमा जगात फार उजळ आहे असं मुळीच नाही. नुसतंच incredible India म्हणून भागात नाही तर त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. नुसते कठोर कायदेच नाही तर त्यांची अंमलबजावणीही तेवढ्याच कठोरतेने आणि तत्परतेने व्हायला हवी. शासन, प्रशासन आणि पोलिस यांनी संवेदनशील आणि जागं असायला हवं. जनतेकडे नुसतं सब्जेक्ट्स म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहायला हवं. मुख्य म्हणजे न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलने करावी लागू नयेत कारण सगळ्यांनाच ते जमत नाही आणि तेवढी उर्जाही सगळ्यांमध्ये नसते.
मंगळवार, ३ मार्च, २०१५
स्वयंभू
शब्दांच्याही पार पलीकडे एक जग असतं… अनुभूतीचं… निःशब्द… शांत… धीरगंभीर असं. विचारांचं वादळ जेव्हा मंदावत जातं तेव्हा मनाच्या तळ्यात एक निरव शांतता पसरत जाते… सगळं स्तब्ध होत जातं… स्वप्नं, आकांक्षा, कल्पना, इच्छा, हव्यास, सुख-दुःखं यांचा सगळा गाळ खोल तळाशी जाऊन बसतो आणि एव्हाना धूसर दिसणाऱ्या कित्येक गोष्टी स्पष्ट दिसू लागतात… खिडकीच्या काचा पुसल्यावर बाहेरचं जग दिसावं तेवढ्या आणि तशा. त्या तळ्याच्या काठावर आठवणींचा भला मोठा पिंपळवृक्ष उभा असतो. क्वचितच त्याचं एखादं पान पाण्यावर अगदी अलगद उतरतं. हळुवारपणे ते पाण्यावर तरंगायला लागतं आणि मग केव्हातरी तेही तळाशी जाऊन स्थिरावतं. सगळी इंद्रिये पार थकून तळ्याकाठी विसावा घेत असतात. कुणीच काही बोलत नाही. सगळे आपापलं अस्तित्व अनुभवत असतात. तशात एक सत्य प्रकर्षानं जाणवतं ते हे की आपण उगाच आपल्या अस्तित्वाचा डांगोरा पिटत असतो… अनुभूतीचा टेंभा मिरवत असतो… कल्पनांचे पिसारे फुलवत असतो… सुखाचं प्रदर्शन मांडत असतो… दुःखाचा ढोल वाजवत असतो… या सगळ्यांशिवाय आणि या सगळ्यांच्या पलीकडे अस्तित्व असतं आणि ते नितांत सुंदर असतं, हळुवार असतं, सुखद असतं, आनंदघन असतं आणि मुख्य म्हणजे स्वयंभू असतं.
शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५
उद्या
चला रात्र झाली, निरव शांतता सगळीकडे पसरली आणि मनाचे आवाज ऐकू येत आहेत. असं इअरफोन कानात टाकून लिहायचा योग बऱ्याच दिवसांनी आलाय. वेळ नव्हता असं नाही, इच्छा नव्हती असंही नाही पण लिहायला जी एक उर्मी लागते ती नव्हती. असो.
आयुष्यात उद्या आहे म्हणून आज आनंद आहे. कारण उद्याच्या बळावर आज आशा जिवंत आहे आणि नुसती जिवंतच नाही तर तिला स्वप्नांचे धुमारेही फुटलेले आहेत. हे असं स्वप्नं पाहणं जिवंत असल्याचं लक्षण आहे, नाही का? एक विचार किंवा एक इच्छा, मग एक आशा, मग भव्य स्वप्नं, आणि मग त्यांची पूर्ती किंवा त्यांचा चक्काचूर आणि मग अजून एक नवा विचार हेच तर आयुष्य.
आयुष्यात उद्या आहे म्हणून आज आनंद आहे. कारण उद्याच्या बळावर आज आशा जिवंत आहे आणि नुसती जिवंतच नाही तर तिला स्वप्नांचे धुमारेही फुटलेले आहेत. हे असं स्वप्नं पाहणं जिवंत असल्याचं लक्षण आहे, नाही का? एक विचार किंवा एक इच्छा, मग एक आशा, मग भव्य स्वप्नं, आणि मग त्यांची पूर्ती किंवा त्यांचा चक्काचूर आणि मग अजून एक नवा विचार हेच तर आयुष्य.
शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५
गर्दी
"क्लासमेट"मध्ये एक डायलॉग आहे: "गर्दीत… प्रत्येक कॉलेजमध्ये गर्दीत पोरं नसतात का? स्कॉलर नसलेली, कला बिला न येणारी, पोरी पटवायची फक्त इच्छा असलेली… तशातलाच एक". मला तर हे आपलंच वर्णन वाटतंय. अजून बऱ्याच जणांना तसं वाटत असणार. आम्हीही असेच गर्दीतले एक. तेव्हा आणि आताही. पण गर्दीतून बाहेर येण्याचा अट्टाहास मात्र मुळीच नाही. कारण गर्दीला चेहरा नसला तरी गर्दीतल्या प्रत्येकाला तो असतोच. गर्दीतही प्रत्येक जण आपलं स्वतःचं एक विश्व जपतो, स्वतःचं अस्तित्व बाळगतो. आणि मला म्हणाल तर लक्षवेधी असण्यापेक्षा गर्दीत मिसळून जाणंच छान वाटतं.
आमच्यासारख्या गर्दीतल्या पोरांच्या काही सवयी असतात… स्वभावच म्हणा हवं तर. आम्ही मुद्दामहून नजरेत भरेल असं काहीही कधीही करत नाही. आमचं बरंच काही मनातल्या मनातच चालू असतं. कुणी म्हणजे अगदी कुणीही अगदी एक टक आमच्याकडे पाहत असेल तर आम्हांला अस्वस्थ वाटायला लागतं. या अशा स्वभावामुळेच गर्दीत सुरक्षित वाटतं. खरं म्हणजे गर्दी ही आमच्यासाठी सुरक्षा कवच असते.
आमच्यासारख्या गर्दीतल्या पोरांच्या काही सवयी असतात… स्वभावच म्हणा हवं तर. आम्ही मुद्दामहून नजरेत भरेल असं काहीही कधीही करत नाही. आमचं बरंच काही मनातल्या मनातच चालू असतं. कुणी म्हणजे अगदी कुणीही अगदी एक टक आमच्याकडे पाहत असेल तर आम्हांला अस्वस्थ वाटायला लागतं. या अशा स्वभावामुळेच गर्दीत सुरक्षित वाटतं. खरं म्हणजे गर्दी ही आमच्यासाठी सुरक्षा कवच असते.
शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर माणसाला कसं हेलकावत ठेवायचं ते नियतीला अगदी बरोब्बर कळतं. 'आता आपली नाव बुडून पार रसातळाला जाणार' असं वाटत असतानाच दूर कुठेतरी एखादं बेट धुसरसं दिसायला लागतं आणि मग आपण पंचप्राण एकवटून त्या दिशेने जायला लागतो. पण तिथे पोहचल्यावर मात्र 'यापेक्षा आधीची परिस्थिती काय वाईट होती' अशी अवस्था होते. नियतीने आपला डाव खेळलेला असतो.
गुरुवार, १५ जानेवारी, २०१५
कुठला रस्ता ?
हिवाळ्यातली सुंदर सकाळ. मी आपला मुक्तपणे बाईकवरून भटकायला निघालोय. काळसर पायघडीसारखा लांबवर पसरलेला काळा रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पहुडलेली हिरवी शेतं आणि सगळ्या परिसरावर हळूच पसरलेली धुक्याची निळसर चादर. नुकतीच रात्रीच्या निद्रेतून जागी झालेली चराचर सृष्टी. रस्त्याच्या त्या टोकाला उगवणारा लालसर सूर्य आणि झाडांच्या लांबच लांब पडलेल्या फिकट सावल्या. अंगाला झोंबणारे थंड हवेचे झोत. हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय. कुठे जायचं ते मात्र काही माहित नाही. पण संध्याकाळ व्हायच्या आत घरी परत जायचंय एवढं मात्र निश्चित. मी आपला निवांतपणे चाळीसच्या स्पीडने चाललोय. या रस्त्याला मैला-मैलावर अनेक फाटे फुटतात आणि मग कोणता मार्ग निवडावा हे काळात नाही. सगळेच मार्ग चोखाळावेसे वाटतात पण ते शक्य नाही. या मार्गांपैकी एक मार्ग निवडताना खूप घालमेल होते कारण बाकीचे मार्ग आपले नव्हेत हि वेदना त्यात असते. कुठला एक मार्ग निवडण्यापेक्षा पुढच्या मैलावर असे अनेक फाटे आहेत हेच फार सुखावह असत. कारण 'अनेक पर्याय आपल्याला खुले आहेत' ही भावना त्यामागे असते. एखादा रस्ता निवडला की परत फिरून दुसरा रस्ता निवडणं एक तर अशक्य किंवा अवघड. आयुष्याचंही असंच असतं, नाही का? आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत याचा आनंद फार असतो, पण जेव्हा उपलब्ध पर्यायांमधून एक निवडण्याची वेळ येते तेव्हा मात्र घालमेल होते. 'आपण चुकत तर नाही ना' असं सतत वाटत राहतं. कारण एकदा का तुम्ही एक पर्याय निवडला कि तो कायमचा तुमच्या पुढच्या आयुष्याशी जुळतो मग तिथून माघारी फिरणे अवघड. कधी कधी आपण निवडलेल्या पर्यायापेक्षा बाकीचे सगळेच पर्याय चांगले वाटायला लागतात आणि दुःखाची गोष्ट म्हणजे ते खरंच तसं आहे का हे मात्र आपल्याला कधीच कळत नाही.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

