पृष्ठे

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

एखादा दिवस किंवा काही तास आपण ठरवून वाया घालवतो.  मागचे तीन चार तास मी तसंच करतोय. बरं वाटतं असं करायला अधूनमधून. त्याचं असं आहे की लहानपणापासून आपलं मन एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून गिल्टी वाटून घेण्यासाठी प्रोग्राम केलं गेलंय. वेळ वाया घालवणं ही त्यातलीच एक गोष्ट.  त्यामुळे असं ठरवून वेळ वाया घालवणं म्हणजे एक प्रकारची बंडखोरीच, नाही का? पण तीमध्ये वेगळीच मजा आहे, उन्माद आहे. 

बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

मुलगा: तुमच्या या साठ-पासष्ट वर्षांच्या आयुष्यात तुम्हांला देव वगैरे नसतं हे अजून कसं रिअलाईझ नाही झालं?

वडील: देव नाही ही फार टोकाची आणि उतावीळ भूमिका झाली. पण ठीक आहे.  ते तुझं सध्याचं मत आहे. मतं बदलू शकतात. असो...  आणि देव नाही हे रिअलाईझ झालं म्हणण्यापेक्षा तसं वाटलं मला कैक वेळेस असं मी म्हणेल. पण आपल्या जाणिवांचा आवाका किती? आणि अजून म्हणजे असा विचार करणारी तुमचीच पिढी काही पहिली नाही. आम्हीसुद्धा जमेल तेवढा विद्रोह केलाय प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध, रूढी-परंपरांविरुद्ध. आपापल्या कुवतीनुसार सगळेच तसं करत असतात. एका पिढीच्या श्रद्धांचं आणि समजुतींचं ओझं पुढच्या पिढ्यांना नेहमीच होत असतं. पण आयुष्य हे असं बंडखोरी करून नाही चालत हे काही काळानंतर कळायला लागतं. आयुष्याचा गाडा चालण्यासाठी पाय कुठेतरी टेकावे लागतात. मनाला एक आधार लागतो. प्रत्येक जीवाला आणि विशेषतः माणसाला निसर्गतःच शाश्वताची ओढ असते आणि ती आपल्या श्रद्धांमध्ये रूपांतरित होत असते.  देव आहे कि नाही यापेक्षा मला तो हवाय इतकंच मी जाणतो. आपल्या जाणीवे-नेणिवेच्याही पलीकडे एक शक्ती आहे हा विश्वास मला जगण्याचं बळ देतो. जीवन म्हणजे काही अराजक नाही किंबहुना ते नसावं असं मला वाटतं आणि त्यासाठी श्रद्धेचा आधार लागतो. जेव्हा अंगातलं त्राण कमी होत जातं तेव्हा ही श्रद्धाच आशेचा किरण असते. आता तू तरुण आहेस. आपल्यासमोर  अफाट आयुष्य पडलंय असं तुला वाटत असेल. पण एकदा हि जीवनाची गाडी उताराला लागली की अस्तित्वाचं ते टोक दिसायला लागतं आणि ते फार दूर नाही हे लक्षात घे. ते एकदा नजरेच्या टप्प्यात आलं की सगळंच गौण ठरतं. फक्त उरते ती श्रद्धा. आंधळी असेल कदाचित पण म्हणून ती वाईट असं मुळीच नाही. कशावर विश्वास ठेवायचा कशावर नाही हे तुझं तू ठरव. पण जगण्याची उर्मी कमी होऊ नये एवढं पहा म्हणजे झालं. 

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

गरज

आयुष्य म्हणजे गरजांची रांग आणि त्या पूर्ण करण्यासाठीचा आटापिटा.  एक गरज पूर्ण होत नाही तोवर दुसरी उभी राहते. गरजा आपल्यापेक्षा एक पाऊल पुढेच असतात, नेहमीच. या गरजांचं रूपांतर कधी हव्यासात होतं लक्षातच येत नाही आणि मग सुरु होते जीवघेणी धावपळ. हे सगळं कळत असतं पण इलाज नसतो प्रवाहासोबत वाहत जाण्याशिवाय.

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

बऱ्याच दीडशहाण्यांनी अतिशय उतावीळपणे आपण किती पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी डॉ. मेधा खोले यांच्याबद्दल आपापली मते मांडली आहेत. खोले बाई कशा चुकल्या हे सिद्ध करायची चढाओढ सोशल मीडियावर चालू होती मागच्या काही दिवसांत. त्या चूक की बरोबर हे लिहिणं हा हेतूच नाही माझा. मला इथं एवढंच म्हणायचंय की एखाद्याचं वैयक्तिक आयुष्य असं चव्हाट्यावर आणणं हे अतिशय चुकीचं आहे. भारतात विविध पोलीस स्टेशन्समध्ये दररोज लाखो तक्रारी दाखल होत असतील.  त्या कधी अशा चव्हाट्यावर येत नाहीत आणि येऊही नयेत. आज जे खोले बाईसोबत होतंय ते उद्या तुमच्या आमच्या सोबत होऊ शकतं. कारण काहीही असू शकतं. उद्या तुमचं नाव असं नको त्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चिलं जाऊ लागलं तर  काय वाटेल तुम्हाला?  कुणाकुणाला स्पष्टीकरण देत बसणार? आणि कोण ऐकणार तुमचं? इथे लोकांची मते आधीच तयार असतात.   What about right to privacy ? हे अतिशय भयानक आहे.  सोशल मीडियावर बहुतेक गिधाडं टपलेली  असतात.  तुमच्या प्राव्हसीचे लचके तोडायला. तुम्ही आम्हीसुद्धा बहुतेक वेळा जाणतेअजाणतेपणे त्या गिधाडांपैकी एक असतो. हे थांबायला हवं. समाज म्हणून आपल्यात प्रगल्भता कधी येणार?

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

अलबेल

तसं सगळं अलबेल आहे 
म्हटलं तर सगळं सेटल आहे
तरीही एक हुरहूर आहे
काही एक राहून गेल्याची
आणि जराशी खंतही आहे
क्षण काहीसे वाहून गेल्याची
बाकी सगळं अलबेल आहे 
जवळपास सगळं सेटल आहे

रविवार, २ जुलै, २०१७

आठवण

आठवण तुझी येते आणि 
शब्द कविता होऊन जातात 
विरहात मग भिजून चिंब 
शब्द सरिता होऊन जातात

शनिवार, १ जुलै, २०१७

माणूस म्हटलं की चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही आलंच. गुणावगुण हे मानवी स्वभावाचे भागच असतात. पण जेव्हा एखाद्याच्या मनाचा ठाव घ्यावा तेव्हा कळतं की प्रत्येकच माणूस हा स्वतःमध्ये अनुभूतींचं, त्यातून येणाऱ्या जाणिवांचं आणि संवेदनांचं एक अफाट, अमर्याद विश्व असतो. शब्दांत बांधता येणारच नाहीत एवढे अनुभव, भावना, विचार, मते, कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात. अभिव्यक्तीचं भाग्य प्रत्येकाला लाभतंच असं नाही. बऱ्याचजणांसोबत त्यांचं ते समृद्ध विश्वही काळाच्या पडद्याआड जातं हे आपलं- मानवजातीचं- दुर्भाग्यच म्हणावं लागेल.

शुक्रवार, ३० जून, २०१७


शेवटल्या त्या वळणावर 
मीच माझा मला गवसलो
आयुष्य हे सोसताना
जगणे ते विसरून गेलो

संध्याकाळी या कातरवेळी 
जाऊ पाहता मावळतीला
निळसर अफाट नभातून 
पंख माझे पसरून गेलो

बुधवार, २१ जून, २०१७

एखाद्या शापित संध्याकाळी सगळंच अर्थशून्य वाटायला लागतं. सगळ्या दिशा अंधारात बुडायला लागतात. सगळी क्षितिजे झाकोळून जातात. सगळं आकाश काळवंडून जातं. सूर्य कायमचा अस्तंगत होऊन जातो आणि पुढे पसरते ती पहाटेचा किनारा नसलेली भयाण काळरात्र. मानासहित सगळी गात्रे थकून जातात. कसलंच त्राण उरात नाही. सगळा विरोध मावळून जातो आणि आपल्या हाती उरतं ते फक्त भरकटलेल्या नावेगत वाहत जाणं काळाच्या प्रवाहाबरोबर. पण एवढ्या अंधारातही कुठूनतरी आशेची एक इवलीशी तिरीप डोकावत असते मनाच्या खोल गाभाऱ्यात. ती कायम तिथेच असते आणि ती अविरत देत असते आपल्याला संघर्ष करण्याचं सामर्थ्य आणि लढत राहण्याची उमेद. 

गुरुवार, १८ मे, २०१७

कर्तृत्व

कर्तृत्वाशिवाय माणूस काहीच नाही. जगात दोनच प्रकारचे लोक असतात - एक म्हणजे कर्तृत्ववान आणि दुसरे म्हणजे कर्तृत्वशून्य. आयुष्याचं सार्थक करायचं की ते व्यर्थ घालवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. जेव्हा आपण सोपा मार्ग निवडतो तेव्हा आपण आयुष्य व्यर्थ घालवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतो. काहीच न करणं फार सोपं असतं, प्रवाहाबरोबर वाहत जाणं त्याहून सोपं असतं. त्यात कसलाच पुरुषार्थ नाही. काहीतरी करण्याची निदान इच्छा असणं ही अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची पहिली पायरी पण फक्त तेवढं पुरेसं नाही. त्या इच्छेला कर्तृत्वाची जोड मिळाली तरच तिला काही अर्थ येतो. नुसतं जागून आपण काय वेगळं करतो? जगतात तर सगळेच. 

बुधवार, १७ मे, २०१७

काळ

मावळत्या सूर्याबरोबर विरघळून जातात निर्धारांचे पर्वत, मावळून जातात आशेचे दीप, वितळून जातात संकल्पांचे ढीग आणि गळून जाते जिद्दीचे अवसान. उद्याचा सूर्य अडकून पडतो संशयाच्या भोवऱ्यात आणि एकेक क्षण करतो एकेक युग वजा आयुष्यातून आणि शेवटी जाऊन पडतो भूतकाळाच्या काळकोठडीत कधीही पुन्हा परतून न येण्यासाठी.  हवा असलेला सूर्य युगानुयुगे उगवत नाही आणि नको असलेला सूर्य मात्र अस्त पावत नाही. रात्रीचंही तेच. कित्येक युगांपासून आपण तिथेच आहोत आणि तसेच. बदलत जातो तो फक्त काळ. 

शनिवार, १३ मे, २०१७

नदीकिनारी

एक धीरगंभीर अशी सायंकाळ. दिवसभराच्या दगदगीनंतर जरा थकूनच नदीकिनारी एकांतात बसलेला मी... निःशब्दसा. शब्दांचं कसलंच अवडंबर नाही. समोर मावळतीला लागलेला लालसर सूर्य. त्याने निळसर आकाशात केलेली तांबूस पिवळसर रंगांची उधळण. सगळ्या चाराचाराला हळूच आपल्या कवेत घेत जाणारा काळोख. संथ वाहणारा वारा, अगदी मंद मंद आणि हलकासा. दूर मंदिरातून उमटणारा मंजुळ घंटानाद. कपाळी लावलेल्या चंदनाचा हलकेच दरवळणारा सुगंध. पाण्यात अधून मधून होणारी माशांची सळसळ. दूरवर टिमटिमणाऱ्या दिव्यांच्या रांगा. आकाशात हलकेच डोकावणारी चंद्रकोर. परतीच्या वाटेवर असलेले पाखरांचे थवे. वातावरणात जाणवणारा थोडासा उकाडा आणि थोडासा दमटपणा. त्या किनाऱ्यावर दिसणारी झाडाझुडुपांची हिरवट काळसर रांग. काय असेल त्यांच्या पलीकडे? तिकडून सगळं कसं  दिसत असेल? जीवन किती वेगळं आहे प्रत्येकासाठी! दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. आपल्याला जग जसं दिसतं तसं कदाचित ते इतरांना दिसतही नसेल. बाहेरचं जग म्हणजे तरी दुसरं काय आहे? आपल्या मानाचं प्रतिबिंबच, नाही का? सुख दुःखही शेवटी मनाचाच खेळ. मनासारखं झालं तर सुख नाही तर दुःख. 

शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

The day is finally in sight when I have to leave this place. For me this is one of those times when you have to leave behind everything that you are attaches to and move on because your future lies somewhere else. I saw it coming and it looked so beautiful and now that it is here it doesn't look that nice. It demands me to go through a lot of change. It dictates who I get to live with, who I get to work with and where. I am going to miss everything at least for a few days and then I will miss a part of it forever. I will also miss the comfort and the warmth and, of course, the freedom that I used to enjoy here.  The worst part of it is that I would no longer belong here. It would be my past and I won't be a part of those tiny, seemingly wasteful but memorable and cherishable moments like having tea with the friends and the teasing and taunting and every bit of trivial activity. I will miss my students who, no matter how they behave, are totally adorable and nice. Each of them is innocent in his/her unique way. I will miss the routine. I will, in particular, miss my room mates who are such great, supportive and also funny guys. Anyway, I am glad that at least I could spend a part of my life time here as a faculty and could make some great friends and, of course, got a chance to reconnect with my Gurus and Alma Mater.