पृष्ठे

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

खरं सांगायचं तर

(पांडुरंग सांगवीकरच्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे अगदी सहज वगैरे  लिहिलं. माणसानं कसं स्वतःशी प्रामाणिक वगैरे असावं म्हणून.  नाकर्तेपणा जिंदाबाद ...! )

माझे बी. टेक.चे दिवस म्हणजे काही लय भारी वगैरे नव्हते. म्हणजे ते कॉलेज डेज वगैरे असं काही मी मुळीच मिस करत नाही. नाही म्हणायला काही आठवणी आहेत,  पण 'जाने काहां गए वो दिन' असलं फिल्मी मुळीच नाही हं. खरं तर फायनल इयरला असताना जाम कंटाळा आला होता कॉलेजचा. कधी एकदा इथून बाहेर पडतो असं झालं होतं. उगाच खोटं कशाला सांगा? काही लोक उगाच मसाला लाऊन लाऊन आपल्या कॉलेजच्या दिवसांचं वर्णन करत असतात जणू काही ते त्या कॉलेजचे हिरोच होते. खरं सांगायचं म्हणजे कॉलेजच्या दिवसांत मी एकदम सुस्त प्राणी होतो. चार वर्षांत काही म्हणजे काहीच केलं नाही. फक्त पास होण्यापुरता अभ्यास तेही पर्याय नव्हता म्हणून करावा लागला. आणि निव्वळच पर्याय नव्हता असंही काही नाही. कधी कधी अभ्यासात मजासुद्धा यायची. कधी कधी आपण हे म्हणजे लय भारी शिकतो आहोत असं वाटून एकदम उत्साहाची भारती यायची. पण ती लगेच ओसरुनही जायची.  आणि इंजिनिअरिंगची इतर मुले करतात तसं मी मुळीच क्लेम करत नाही कि परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून मी पास झालो. गरजेपुरता अभ्यास करायचो. उगाच स्वतःला हुशार म्हणून प्रोजेक्ट कशाला करा? 

तर सांगायचं म्हणजे नाईलाज म्हणून केलेला अभ्यास सोडला तर आमचे बीटेकचे दिवस म्हणजे एकदम कोरेच. कुठल्या कल्चरल प्रोग्राममध्ये, कुठल्या स्पोर्टमध्ये कशातच भाग घेतला नाही. बरं अभ्यासात लय भारी होतो असंही नव्हतं. दिवसभर क्लासेस झाले कि रूमवर येउन गप्पा मारत बसायचं किंवा मग युनिवर्सिटीकडे फेरफटका मारायचा नाहीतर काळेश्वरला जायचं हा एकच उद्योग होता आमचा. हो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये माझ्यासारखीच काहीही न करणारी बरीच मित्रमंडळी होती. म्हणजे एकंदरच काय तर कॉलेजात आम्ही एकदम मिडल क्लास विद्यार्थी होतो. पण हे सगळं ठरवून वगैरे नव्हतं, सर्वांना वाटतं तसंच 'आपण काहीतरी वेगळं करावं' असं वाटायचं पण नेमकं काय करावं हेच कळायचं नाही. सीव्हीमध्ये लिहायला म्हणून थर्ड इयरला असताना एक इव्हेंट तेवढा ऑर्गनाईझ केला होता. तेच काय ते वेगळं. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे थर्ड इयरला असतानाच एका मुलीला प्रोपोज केलं होतं पण तिकडून नकार आला आणि तो प्रयत्न सपशेल फसला. 

आणि उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून सांगतो कि मी आमचं काहीही न करणं ग्लोरिफाय वगैरे करत नाही बरं का. पण त्याची काही खंतसुद्धा नाही. उलट त्या दिवसांकडे मी आता त्रयस्थपणे पाहतो. पण त्रयस्थपणे म्हणजे रुक्षपणे नव्हे. काही मजेदार, काही गमतीशीर, काही हळव्या(?) आठवणीही आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी...

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

संहिता (The Script)


या चित्रपटात "माणूस स्वतःची संहिता स्वतः कधी लिहू शकेल?" असा एक डायलॉग आहे. मी तो ट्रेलरमध्ये पहिला आणि मग थोड्या वेळाने क्लिक झालं कि 'अरे हो, यावर आपण कधी विचारच केला नाही'. आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. काही जणांना ते शक्य होतं आणि काही जणांना त्यासाठी झगडावं लागतं आणि काही जण आपण जसे जगतो आहोत तसंच आपल्याला जगायचं होतं असं म्हणून स्वतःची समजूत काढतात. पण आपल्या आयुष्याची संहिता आपण लिहिणं हे सोपं नसतंच. त्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. कारण आपल्या संहितेत ज्यांवर आपला कंट्रोल नाही अशा गोष्टी पण येतातच आणि त्या आपापल्या परीने संहितेवर परिणाम करत असतात. 

संहिता




सुमित्रा भावे आणि सुनील सुकठनकर (नाव बरोबर आहे ना ? कारण इंग्रजी Sukthankarवरून इथे ट्रान्सलेट केलंय) या दिग्दर्शक द्वयीने आतापर्यंत दहा (?) चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या कलाकृतींना आतापर्यंत बरेच अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यांमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे त्यांचा संहिता हा चित्रपट काल ४ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला. मी अजून पहिला नाही पण एकंदर त्यांच्या चित्रपटांचे विषय पाहता संहिताबद्दल एक उत्सुकता लागलेली आहे. या द्वायीचे देवराई, नितळ, दहावी फ हे चित्रपट मी पहिले आहेत. त्यांचे चित्रपट हे अगदी वास्तवदर्शी आणि वेगवेगळ्या गंभीर विषयांवर असतात. निव्वळ मनोरंजनासाठी म्हणाल तर निराशा होईल पण वेगळ्या विषयावरचा चित्रपट पहायचा असेल तर या द्वायीचे चित्रपट पाहणं एक चांगला अनुभव असू शकतो. संहिता चित्रपटाची झलक   इथे क्लिक करून पाहू शकता.