पृष्ठे

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

एक धागा सुखाचा


'उद्या'च्या गर्भातून डोकावणाऱ्या आशेच्या सोनेरी किरणांच्या बळावर आपला 'आज' सुसह्य होत असतो. उद्याच्या उंबरठ्यावर गेल्यावरही तिथे अंधार पाहून थोडीशी निराशा होते. पण त्यालाही सोनेरी आशा उरी बाळगणारा 'उद्या' असतो. हे अविरत चालूच राहतं. कधीकधी तो सोनेरी क्षण हाती लागतोसुद्धा. पण ज्यासाठी हा आटापिटा केला होता त्याचं आयुष्य फक्त एका क्षणापुरतंच ही जाणीव मात्र उद्विग्न करते. मग त्या सोनेरी क्षणाचा आनंद अन विरह असा संमिश्र भावकल्लोळ. आणि तो किंवा तसा क्षण पुनः प्रकटावा यासाठी परत 'आज' 'उद्या'चा खेळ आणि मध्येच दही दिशांनी चालून येणारे काही काळेकुट्ट क्षण, त्या सोनेरी क्षणांपेक्षा कैक पटीने महाकाय. कधीकधी प्रश्न पडतो हेच का आयुष्य? त्या सुखाच्या, आनंदाच्या एका धाग्यासाठी दुःखाचे, विरहाचे,उद्वेगाचे शेकडो धागे गुंफून बनवलेलं जरतारी आयुष्याचं वस्त्र ल्यायचं? नियती देईल ते मुकाट पदरी पडून घेऊन आनंदी असल्याचं स्वतःलाच सांगायचं? का नाही बंड करायचं याविरुद्ध? आम्हांला सुखाचे शेकडो धागे असलेलं जीवनवस्त्र हवंय. किंमत बोला...!!!

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

गर्दी

गर्दीचा मला भयंकर तिटकारा वाटतो. गर्दीत मिसळणारा प्रत्येकच जण आपला चेहरा, आपली ओळख, आपल्या भावना सर्व काही हरवून गर्दीत शिरतो आणि त्या यंत्रवत समूहाचा भाग होऊन जातो. भीतीचं एक वलय नेहमी आपल्या भोवती घेऊनच त्या गर्दीत वावरतो. गर्दीला दिशा नसते. भरकटलेल्या थव्यासारखी ती फक्त गतिमान असते. त्यातल्या प्रत्येक पाखराची दिशा वेगळी, दशा वेगळी ...प्रत्येक जण आपल्यापुरताच. माणुसकीचा ओलावा आटून  गेलेला. 

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३


आपले पोलिस आणि सरकार यांना तहान लागल्याशिवाय विहीर खोदायची गरज वाटत नाही. जेव्हा कुठेतरी स्फोट होतो तेव्हाही हे एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याशिवाय दुसरं काहीही करत नाहीत. सरकार पोलिसांवर, पोलिस गुप्तचर यंत्रणेवर खापर फोडून जबाबदारी झटकू पाहतात. मग 'तपास चालू आहे', 'हे सहन केलं जाणार नाही',  असल्या पोकळ गप्पा मारल्या जातात. त्यांच्यात काहीही तथ्य नसतं. इतके स्फोट झाले आजपर्यंत, तरीही यांचं दरवेळी बेसिकपासूनच सुरु होतं. आतापर्यंत एक predictive model नाही बनवता आलं यांना? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे शेंबड्या पोरालाही कळतं, मग का नाही पाकिस्तानचं नाक दाबत? या स्फोटाचा कट इस्लामाबादमध्ये शिजला हे उघड आहे. मग का पाकिस्तानशी असलेले संबंध नाही तोडत? पण नाही... इथे आपल्या मंत्रिमंडळात बरेच पाकधार्जिणे लोक बसलेत. आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही आणि हे पाकिस्तानातून कांदा आयात करतात आणि इथे आणून तो सडवतात. 

इथे स्फोटात लोक जीवानिशी जातात पण यांना काय त्याचं? ए.सी.मध्ये बसलेल्या त्यांच्यापर्यंत स्फोटाची झळ आणि आवाज दोन्हीही कसं पोचणार? नुसता स्फोट झाल्या ठिकाणी दौरा केल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी वेळीच प्रतिबंधक उपाय करावे लागतात आणि हितसंबंधांच्याही पलीकडे जाऊन निर्णय घ्यावे लागतात. उगाच ए.सी.मध्ये खुर्चीवर बसून  दहशतवादाला रंग देत बसलं कि आपल्या XXखाली बॉम्ब ठेवला तरी पत्ता लागत नाही आणि हे असले स्फोट होतात.

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

मानवाधिकाराचे मक्तेदार

पुन्हा एका फाशीच्या निमित्ताने मानवाधिकाराचा डंका वाजवणाऱ्यांना निमित्त मिळालंय. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने तर अफझल गुरूला दिलेली फाशी कशी चुकीची आणि अन्यायकारक आहे यावरून लेखांचा भडीमार केला आहे. मागे कासाबच्या फाशीच्या वेळीही काही मानवाधिकाराच्या मक्तेदारांना भरून आलं होतं.  आणि आता अफझल गुरूसाठी ह्यांची एकच रडारड कि त्याला प्रतीवादाची पुरेशी संधी नाही देण्यात आली, त्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी वापरलेले पुरावे पुरेसे नव्हते, इत्यादी.  यांच्या लेखी दहशतवादी तेवढेच मानव. त्यांच्यामुळे नाहक बळी गेलेल्यांच्या मानवाधिकाराचं काय? जेव्हा कसाबच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या शेकडो निरपराध्यांचे प्राण घेऊन जात होत्या तेव्हा त्यांचा काय दोष होता? त्यांच्यावरचे कुठले आरोप सिद्ध झाले होते?  भारताच्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा तिथे ज्या सुरक्षारक्षक आणि जवान यांना हौतात्म्य आलं त्यांच्या जगण्याच्या मुलभुत अधिकाराचं काय? त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंग ओढवला त्याचं काय? जेव्हा इथे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात तेव्हा मानवाधिकाराच्या नवे ओरडणाऱ्या तथाकथित बुद्धीजीवींची दातखीळ बसते कि काय? काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मानवाधिकारांची चिंता करणाऱ्यांना भारतीय सेनादलातील जवानांचे बलिदान दिसत नाही का? 

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

कुणी एक उठून दहशतवादाला भगवा रंग देतो आणि हिरव्याचा कैवारी असल्याचा 

आव आणतो. कुणी दुसरा उठून आपल्या इतिहासात शिरतो आणि वाटेल तसा 

गोंधळ घालतो. मग कुणी तिसरा उठून आमच्या श्रद्धा, आमची आराध्ये यांना 

संकुचित ठरवू पाहतो. निकटच्याच काळात कदाचित या श्राद्धांनाही अंधश्रद्धा ठरवून 

त्यांचंही निर्मुलन करण्याचा घाट एखाद्या तथाकथित 'पुरोगामी, उदारमतवादी, 

धर्मनिरपेक्ष' व्यक्ती किंवा संघटनेने घातला तर नवल वाटायला नको. धर्मनिरपेक्षता 

आणि धर्मविरोध यांच्यातला फरक न कळणारं किंवा तो कळूनही धर्माला 

निवडणुकीतला एक्का बनवू इच्छिणारं नेतृत्व लाभल्यावर कसली अपेक्षा करणार?