पृष्ठे

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

हेच लाईफ आहे

वादळातून बाहेर आल्यावर जेव्हा तुम्हांला वाटतं की आता तुम्ही कसल्याही वादळाला तोंड देऊ शकता तेव्हा त्यापेक्षाही मोठं वादळ नियती तुमच्या समोर आणून उभी करते. एक संपला की दुसरा प्रश्न तो संपला की तिसरा अशी प्रश्नांची मालीका, ते सोडवण्यासाठी तुमचा आटापिटा, त्यातून धडपडणारे आणि घडणारे तुम्ही आणि अधूनमधून येणारे काही निवांत क्षण.  हेच लाईफ आहे. या सगळ्या संघर्षात Free Willचं काय असं बरेच जण विचारतात. पण तुमच्या आयुष्यात जे काही होतं त्यावर तुमचं नियंत्रण एका मर्यादेपलीकडे तुम्हांला हवं तितकं नसतं हेही नाकारून चालणार नाही. शेवटी आपण सारे आपल्यापेक्षाही भव्य आणि आपल्या दृष्टीने जवळपास अमर्याद अशा प्रवाहाचा भाग आहोत. त्यामुळे त्या प्रवाहाच्या दिशेने वाहणं हे अर्थातच क्रमप्राप्त आहे. बाकी आपण सगळेच प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असतोच. 




शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

राञ

दिवस म्हणजे युद्ध. रात्र म्हणजे युद्धविराम. राञ  वैऱ्याची नसते. दिवसच वैरी असतो. राञ आपली असते. सूर्याबरोबरच अस्ताला जातो तो कलकलाट - बाहेरचा आणि मानतालाही. जगाचा रहाटगाडा काही काळ स्तब्ध होतो. अंधाऱ्या रात्री कधी घराबाहेर पडून पहा. दूर आकाशात शांतपणे मार्गस्थ असलेलं चंद्रबिंब, त्याला साथ करणाऱ्या चांदण्या, शांततेत बुडून गेलेला आसमंत, शांतपणाचा उपभोग घेणारी वेडीवाकडी तरीही डौलदार झाडे, निर्जन पसरलेला रास्ता, दूर कुठेतरी अस्तित्वासाठी फडफडत असलेली ट्यूब लाईट, दुरून कुठूनतरी या शांततेचा भंग करणारा कधी कुत्र्यांचा तर  कधी किरकिऱयांचा अधूनमधून येणार आवाज हे सगळं आणि आपल्या मनातलं शमलेलं वादळ यांचं एक गूढ नातं आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला राञ आपलीशी वाटते. रात्रीचा एकेक क्षण असा हातात धरून ठेवावासा वाटतो.