आता रात्रीचा दीड वाजलंय आणि मी अजून नाही झोपलो म्हणून प्रचंड गिल्टी वाटत आहे मला. का कुणास ठाऊक स्वयंशिस्तीचं एक स्वयंभू दडपण आपोआपच आपल्या डोक्यावर कुठून तरी येऊन आपल्याला दाबून टाकू पाहत असतं क्षणोक्षणी. पण कधी कधी हे सगळं दडपण झुगारून देऊन मनमुक्त स्वच्छंद राहावंसं वाटतं- अगदी अर्धा एखादा दिवस का असेना आणि अशी बंडखोरी मी अधून मधून करत असतो. पण आपल्या या असल्या बंडखोरीला मर्यादा असतात. मला रिअलाईझ झालेली एक गोष्ट म्हणजे आपणच आपलं जग खूप मर्यादित करून घेत असतो आणि मग लाईफ किती बोरिंग, किती रटाळ आहे म्हणून ओरडत असतो. पण जेव्हा तो रटाळपणा सोडून नवीन काही करणं अपरिहार्य होतं तेव्हा मात्र आपण डगमगतो. हिवाळ्यातल्या थंड सकाळी ब्लॅंकेटची उब आपल्याला जी फीलिंग देते ना अगदी तीच फीलिंग आपल्याला आपलं बोरिंग आणि रटाळ रुटीन देतं - उबदार पण त्याज्य.