दोन वर्षांपासूनची तिची माझी साथ आज अचानक संपुष्टात आली. ध्यानीमनीही नसताना. आज सकाळी उठलो तेव्हा वाटलंसुद्धा नव्हतं कि आजच दिवस इतका निष्ठुर असेल. अगदी संध्याकाळपर्यंत सगळं नॉर्मल होतं. कदाचित मलाच ते नॉर्मल वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आय आय टी मध्ये आलो तेव्हापासून आम्ही सोबत होतो. ती पण नवीनच होती इथे. आमची पहिली भेट मला अजून आठवते. १ जानेवारी २०१२. संध्याकाळी सहा सातच्या सुमारास मी पहिल्यांदा तिला पाहिलं आणि तेव्हापासून एकही दिवस असा नाही जेव्हा आम्ही भेटलो नाही. रोजच भेटगाठ व्हायची. तिच्या असण्याची अगदी सवय झाली होती. इतकी की तिच्या नसण्याची कल्पनाच करू शकत नव्हतो. पण आता ती नाही हेच सत्य आहे. तिच्या जाण्याच्या धक्क्यातून अजून पुरता सावरलोही नाही मी. ती कायमचीच गेली. पुन्हा मला कधीही भेटणार नाही. आत्ताच तिच्या जाण्याची तक्रार इथल्या सिक्युरिटी ऑफिसमध्ये नोंदवून आलो. कारण ती माझी सायकल होती मित्रांनो आणि ती चोरीला गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा