![]() |
| पाम्बन ब्रिज |
![]() |
| रामेश्वरम बेट (गुगल mapवरून ) आणि आग्नेयेला रामसेतू |
![]() |
| पाम्बन ब्रिजच्या जवळ |
आपण रामेश्वरममध्ये येतो आणि त्या ज्योतिर्मय शिवशंकराच्या दर्शनाची ओढ लगते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल हे वैभवशाली ज्योतिर्लिङ्ग. बाराव्या शतकात पांड्या राजांनी बांधलेल्या या मंदिराचा गाभारा भारतातल्या सगळ्या मंदिरांत लांब आहे. मंदिराला दोन प्रवेश द्वारे आहेत- एक पूर्व द्वार आणि दुसरं पश्चिम द्वर. आत प्रवेश पश्चिम द्वारातून आहे. पण प्रवेशापूर्वी काही जण मंदिरात असलेल्या बावीस तीर्थांमध्ये स्नान करून घेतात. मग शिवाच्या भेटीसाठी दर्शनाच्या रांगेत तिष्ठत उभे रहतात. शिवशंभुला प्रत्यक्ष आणि मनोमन कित्येक नमस्कार करून त्याच्याशी संवाद चालू होतो. मन पवित्रतम होते. राग, लोभ वगैरे षडविकारांचा लवलेशही राहत नाही. आणि मग बराच वेळ तिष्ठत काढल्यावर एकदा तो शिव दर्शनाचा अमृतयोग येतो. भव्य अशी ती शिवपिंड पाहून कृतार्थ झाल्याची भावना होते.
इथे अवघ्या भारतातून येणाऱ्या भक्तांची गर्दी बाराही महिने असते. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्त जणांची संख्या सुद्धा लक्षणीय असते. त्यामुळे इथे मराठी, मारवाडी, गुजराती, उत्तर भारतीय अशी (फक्त) हॉटेल्स (जेवण नाही) आढळून येतात.
देवदर्शन झाल्यावर त्याची निर्मिती असलेल्या भव्य निसर्गाचं दर्शन करण्यासाठी आम्ही धनुषकोडीला जायला निघालो. धनुषकोडी रामेश्वरम बेटाच्या आग्नेय टोकावर एकेकाळी असलेलं गाव. १९६४ च्या चक्री वादळात तिथल्या बऱ्याच रहिवाशांसह नष्टप्राय झालेलं. तेव्हापासून तमिळनाडू सरकारने मानवी वस्ती साठी अयोग्य म्हणून घोषित केलेलं. तरीही इथे तुरळक वस्ती आहे. शिक्षण तर सोडाच वीज सुद्धा माहिती नसलेली ही वस्ती. पर्यटन हाच इथल्या उपजीविकेचा मुख्य पर्याय . थोड्या फार प्रमाणात मासेमारी करून, सागरी शंख शिंपले विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. रामेश्वरम हून जाणारी बस जुन्या धनुषकोडीपर्यंत जात नाही. मध्येच जिथपर्यंत पक्का रस्ता आहे तिथ पर्यंत सोडते. तिथून पुढे रामसेतू कडे जाण्यासाठी रस्ता वगैरे नाही. आणि ट्रान्स्पोर्टचं एकमेव साधन म्हणजे खासगी वाहने. जणं आणि येणं शंभर रुपये पर हेड. आणि तिथे अर्धा तासच थांबायला भेटतं. सगळा प्रवास रेतीमधून. जायला अर्धा तास लागतो.
जीपमध्ये बसून निघाल्यापासून पंधरा मिनिटांत आम्ही मधल्या एका मुक्कामावर पोचलो. इथे जुन्या रेल्वे स्टेशनचे, चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. इथेच एका झोपडीसदृश मंदिरात एक तरंगता दगड सुद्धा बघण्यात आला. तो प्रवाळाचा असावा. आमचा जीप ड्रायवर गाईडचीसुद्धा भूमिका बजावत होता. इथेच पाण्यासाठी खोदलेले विहीर वजा खड्डे पाहायला मिळाले. अवशेषांचं दर्शन करून करून आम्ही पुढे निघालो. आता उजव्या बाजूला शांत हिंदी महासागर आणि डाव्या बाजूला बंगालचा उपसागर असं दृश्य दिसू लागलं. दोहोंच्या मध्ये असलेल्या शे-सव्वाशे फुट रुंदीच्या पट्ट्यावरून आमची जीप जात होती. हा रामसेतू.
![]() |
| रामसेतू: भारत भूमीचं टोक. इथून जवळपास दहा किलोमीटरवर श्रीलंका (फोटो सौजन्य: गुगल) |
आणि एकदाचे आम्ही त्या टोकावर पोहचलो. इथला निसर्ग काय वर्णावा ? अथांग पसरलेला तरीही शांत असा हिंदी महासागर, उधणणारा बंगालचा उपसागर, त्यांच्या मधला जमिनीचा अरुंद पट्टा, त्यावर मोजकेच पर्यटक, दूर समुद्रात दिसणारी जहाजे, डोक्यावर तळपणारा सूर्य, सुसाट वाहणारा वारा, नितळ निळं पाणी असं ते नितांत सुंदर दृश्य शब्दांच्या आवाक्यात येतच नाही. मी, प्रशांत, नगेन्द्रन आणि विशाल असा आम्हा चौघांचा ग्रुप. पैकी माझी बहुतेक वेळा फोटोग्राफारची भूमिका असायची. बाकी तिघे समुद्रात उतरून मनसोक्त भिजत होते. मी मात्र किनाऱ्यावरच उभा राहून सृष्टी सौंदर्य डोळ्यांत, श्वासांत, हृदयात आणि कॅमेऱ्यात भरून घेत होतो.

![]() |
| विशाल, प्रशांत आणि नगेन्द्रन |
त्या निळ्याशार, फेसाळणाऱ्या सागराला पाहून सगळ्या चिंता, सगळी टेन्शन्स कुठल्या कुठे पळून गेली. राहिलो फक्त मी आणि आनंद. इथे निसर्ग भव्य आणि सुंदरही आहे. आपलं अस्तित्व विसरायला लावणारं त्याचं ते रूप. रामाच्या चरणांनी पवित्र झालेल्या त्या भूमीशी येउन सागरही प्रसन्न झालेला. आणि आपल्या अक्षय आनंदाची अभिव्यक्तीच तो त्याच्या लाटांमधून करत असेल.
सुमारे तासभर तिथे घालवल्यानंतर आमचा धनुष्कोडीकडे परतीचा प्रवास सुरु झाला. किंबहुना ड्रायवरला दुसऱ्या ट्रीपची घाई असल्याने आम्हांला परतावं लागलं. परतीच्या वेळी जीप मधून टिपलेली ही काही क्षणचित्रे
![]() |
धनुष्कोडीला आम्ही सुमारे साडेचार पाच वाजता पोहचलो. तिथेही मी वगळता बाकीच्या त्रिकुटाला समुद्रात उतरायची लहर आली. इथे लाटा बऱ्यापैकी उंच होत्या. सूर्य आता पश्चिमेकडे झुकला होता. पण तो मावळतीचा क्षण टिपायला कॅमेऱ्यात त्राण उरले नव्हते. म्हणून तो क्षण डोळ्यांतच साठवून आम्ही रामेश्वरमकडे परत निघालो.










