पृष्ठे

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१३

गुरुदेव

आमच्या परम पूज्य गुरूदेवांचा महिमा वर्णावा तो किती. सहा शास्त्रे, आठरा पुराणे, वेद, स्मृती, श्रुती यांनासुद्धा अगम्य असं त्यांचं व्यक्तिमत्व. आमच्या सुदैवाने ते सगुण ,साकार आहेत. पण बरेचदा त्यांचं दर्शन दुर्लभ असतं. आमच्याशी फक्त आंतरजालावरून संपर्क ठेवतात. तेव्हा ते निर्गुणच असतात. ते माणूस या क्षुद्र संकल्पनेच्या कितीतरी परे आहेत. आणि समोरचासुद्धा, म्हणजे त्यांचा शिष्य, हा त्यांच्याच मार्गावर असेल असे त्यांना वाटत असते. आणि ते असं काही गूढ, अगम्य बोलतात कि आम्ही दंग होऊन जातो कारण त्यांच्या एक दीड तासाच्या प्रवचनानंतरसुद्धा आम्हांला त्यातलं अवाक्षरही कळलेलं नसतं. त्यातलं त्यांना कितपत कळतं हा अजून संशोधनाचा विषय (ओपन प्रॉब्लेम )आहे.

त्यांच्या कक्षात जाणं हा एक दिव्य अनुभव असतो. तिथे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सर्व क्षुद्र इच्छांवर (म्हणजे भूक वगैरे) विजय मिळवला असला पाहिजे. कारण तिथे गेल्यावर तास दीड तास तरी तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. फक्त तुम्ही, गुरुदेव आणि तुमच्या बुद्धीचा गोंधळ याचंच आत अस्तित्व असतं.  तुम्ही आत शिरता आणि ते तुम्हांला थोडा वेळ वाट पाहायला लावतात. ही तुमची परीक्षा असते. तो थोडा वेळ दहा मिनिटांपासून ते एक तासापर्यंत असू शकतो. मग ते तुमच्याकडे मोर्चा वळवतात. आणि तुमचं काहीही ऐकून न घेत आपलं प्रवचन सुरु करतात. त्यांचं प्रवचन ऐकत असतानाच तुमचं म्हणणं त्यांच्या गळी उतरवणं हे खरं संवाद कौशल्य. पण ते तुमच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. ते कधी झोपतात (किंवा कधी झोपत नाहीत) हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. कारण संगणकामध्ये ते जेव्हा काही शोधतात तेव्हा हमखास रस्ता चुकतात आणि त्याचं कारण म्हणजे ते रात्री झोपलेले नसतात. तसे ते २४ तास निद्राधीन असतात असा आमचा अंदाज आहे. पण यावर अजून प्रकाश टाकावा लागेल. 

त्यांचा आम्हां शिष्यांवर खूप विश्वास आहे. एवढा कि कोणत्याच कार्यात आम्हांला मदत करणं त्यांना आवडत नाही. आम्ही ते करायला समर्थ आहोत अशी त्यांना खात्री असते. पण अधूनमधून (म्हणजे तीन महिन्यातून एकदा) ते आमच्या कार्याचा आढावा घेत असतात आणि आपल्या अमोघ वाणीने आम्हांला असंख्य अशा सूचना करत असतात. त्याही आमच्या अल्पमतीच्या परिघात येत नाहीत. यात त्यांना दोष कसा द्यायचा. गरजेनुसार शिकण्यावर (नीड बेस्ड लर्निंग) त्यांचा नेहमी भर असतो. आवश्यकतेपेक्षा जास्त विषय शिकायचे कशाला असं त्यांचं ठाम मत आहे. 

अजून किती म्हणून लिहू त्यांचा महिमा. शब्दच ज्यांच्या वाणीने गोंधळून जातात तिथे आम्ही अल्पमती काय लिहिणार. त्यांनी आम्हांला अनुग्रह दिला यातच आम्ही धन्य झालो. आता फक्त इहलोकीची इतर कर्तव्ये करण्यासाठी आमची इथून मुक्तता करावी एवढीच इच्छा, कारण आम्ही इथे कायमस्वरुपीच आलो आहोत असा त्यांचा (गैर) समाज झालेला दिसतोय. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा