पृष्ठे

शुक्रवार, २६ मे, २०२३

सहानुभूती

 तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचा उद्वेग किंवा तुमचा आनंद किंवा तुमचं दु:ख किंवा तुमची तळमळ किंवा थोडक्यात तुमच्या मनातली कोणतीही भावना अगदी जशास तशी इतरांना कळेल याची संभाव्यता जवळजवळ शून्य आहे कारण तुमच्याकडे असलेली माहिती, तुमच्याकडे असलेला अनुभव, तुमची परिस्थिती , तुमची जडणघडण  तुमच्या मनात त्या वेळी चाललेली हलचाल ही केवळ तुमच्यापुरती असते. इतरांसाठी तर हे सगळं शून्य असतं. ते त्यांच्या अनुभवाच्या आणि भावनांच्या पटलावर तुमचा दृष्टिकोन project तर  करू शकतात पण loss of information अटळ आहे. हे म्हणजे द्विमितीय कागदावर त्रिमितीय चित्र रेखाटण्यासारखं आहे. चित्र त्रिमीतीय असल्याचा आभास तर होतो पण त्या चित्राच्या उर्वरित बाजू कुठेच पाहता येत नाहीत.   सहानुभूतीचं अगदी असं आहे. 

शनिवार, २० मे, २०२३

Random Thought

 In my mind I have a very abstract and blurry picture of physical reality. This picture is a result of study - both accidental and deliberate- of physics and recent developments in physics. There are so many gaps in this picture - some can be attributed to the gaps in physics itself but others are purely due to my lack of knowledge. Yet, somehow, I feel that one day these gaps will be filled and the picture will become more clear than what it is today.

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

Monologue 14 Feb 2022

 आता रात्रीचा दीड वाजलंय आणि मी अजून नाही झोपलो म्हणून प्रचंड गिल्टी वाटत आहे मला. का कुणास ठाऊक स्वयंशिस्तीचं एक स्वयंभू दडपण आपोआपच आपल्या डोक्यावर कुठून तरी येऊन आपल्याला दाबून टाकू पाहत असतं क्षणोक्षणी. पण कधी कधी हे सगळं दडपण झुगारून देऊन मनमुक्त स्वच्छंद राहावंसं वाटतं- अगदी अर्धा एखादा दिवस का असेना आणि अशी बंडखोरी मी अधून मधून करत असतो. पण आपल्या या असल्या बंडखोरीला मर्यादा असतात. मला रिअलाईझ झालेली एक गोष्ट म्हणजे आपणच आपलं जग खूप मर्यादित करून घेत असतो आणि मग लाईफ किती बोरिंग, किती रटाळ आहे म्हणून ओरडत असतो. पण जेव्हा तो रटाळपणा सोडून नवीन काही करणं अपरिहार्य होतं तेव्हा मात्र आपण डगमगतो.  हिवाळ्यातल्या थंड सकाळी ब्लॅंकेटची उब आपल्याला जी फीलिंग देते ना अगदी तीच फीलिंग आपल्याला आपलं  बोरिंग आणि रटाळ रुटीन देतं - उबदार पण त्याज्य. 

गुरुवार, ९ जून, २०२२

सुख

माणूस कायम सुखाच्या शोधात असतो. आपली अख्खी  हयात तो याच एका गोष्टीच्या मागे फिरत असतो. तो कधी आपल्या कामात सुख  शोधण्याचा प्रयत्न करतो, कधी यशामध्ये, कधी आपल्या कुटुंबियांच्या सहवासात. सुख हे असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आणि वेगवेगळ्या क्षणांमध्ये विखुरलेलं असतं. ते पाण्यासारखं प्रवाही असतं. ते एकगठ्ठा कधीच हाती लागत नाही. कितीही तहान लागलेली असली तरी आपल्याला एकेक घोटच पाणी प्यावं लागतं तसंच सुखाचं आहे. ते जसं येईल तसं थोडं थोडंच उपभोगीत जावं  यातच त्याची गोडी असते.  त्याला घट्ट धरून ठेवण्याचा अट्टाहास नसावा.     

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

भाषा

भाषा जशी काही मैलांवर बदलते तशी ती काही काळानंतरही बदलत जाते. मराठीच काय सर्वच भारतीय भाषा अतिशय समृद्ध आहेत आणि काळाच्या ओघात त्यांच्यामध्ये बदल होणार आणि झालेही पाहिजे.   बदलाला विरोध करणारी कोणतीच भाषा दीर्घकाळ टिकू शकत नाही.  भाषेची शुद्धता ही कुणाची मक्तेदारी नाही. भाषेला राजाश्रय जरूर असावा पण राजकीय अट्टाहासाच्या जाळ्यात ती अडकता कामा नये. भाषा टिकवण्याचं , वाढवण्याचं काम हे तुम्हा आम्हा सारखे सामान्य लोकच करीत असतात

सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

हे जग विविधरंगी आहे पण मग आपलंच आयुष्य असं कृष्णधवल का असं तुम्हांला कधीतरी वाटलंच असेल किंवा अजूनही वाटत असेल. माझ्या मते याचं कारण म्हणजे आपण छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये इतके अडकून पडतो की त्यांच्या पलीकडचं जग पाहतच नाही. म्हणून मग हे जग म्हणजे आपल्याला केवळ प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठीचा आपला संघर्ष इतकंच मर्यादित वाटायला लागतं. पण प्रश्नांच्या गुंत्यातून बाहेर पडलं की रंगांची उधळण आपोआप दिसायला लागेल. 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

आयुष्य

आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवतं की आयुष्य म्हणजे काही स्पर्धा (रेस) नव्हे. आयुष्य म्हणजे प्रवास. कुणी आपल्यापुढे तर कुणी आपल्यामागे असणारच. सगळेच आपापला मार्ग क्रमित आहेत. थोड्याफार फरकाने सगळेच संघर्ष करत आहेत. उगाच आपला मोठेपणा, इगो, सुख-दुःख यांचं प्रदर्शन करण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाचंच आयुष्य एकेक महाकाव्य आहे आणि प्रत्येकच जण आपापल्या कथेचा नायक/नायिका आहे. 

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

तुकाराम

तुकाराम मुंडेंना लोकांनी चक्क तुकाराम महाराज करून टाकलं आणि तेही असे तुकाराम महाराज जे लोकांना हवे आहेत. तुकाराम महाराज काय किंवा तुकाराम मुंडे काय दोघेही शेवटी माणसेच. त्यांना माणसेच राहू द्या. लार्जर दॅन लाईफ काहीही आणि कुणीही नसतं. किंबहुना लार्जर दॅन लाईफ असं कुणी असावं ही आपण सगळ्यांच्या मनातली भावना असते. सांख्यिकीच्या भाषेत सांगायचं झालं तर बहुतेकजण मध्याच्याच अवती भवती कुठेतरी  असतात आणि मग कधीतरी कुणी एखादा तुकाराम होतो मध्यापासून थोडा दूर जाऊ पाहणारा. आपण त्यांना लार्जर दॅन लाईफ ठरवून मोकळे होतो आणि आपली आपल्याच कर्तव्यापासून सुटका करून घेतो. आपण आपली नैतिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या अशा आऊटसोर्स करू पाहत असतो. 

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

राम

'राम मंदिराच्या बाबतीत तुझी भूमिका काय आहे ?'

'माझ्या भूमिकेचा संबंध काय? एक हिंदू म्हणून माझी भूमिका मंदिर व्हावे हीच असायला हवी आणि आहे . मला अधून मधून स्युडो सेक्युलॅरिझमचे उमाळे नाही येत. राम  मंदिराबाबत भूमिका विचारणे म्हणजे मूर्खपणा होय. सत्य काय आहे? त्या जागी आधी मंदिर होते हे सिद्ध झालंय त्यामुळे माझ्याच काय कुणाच्याही भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे? आणि माझी भूमिका विचारण्यामागचा हेतू मला उजवा, डावा, कट्टर, धर्मांध, सेकुलर, आमच्या बाजूचा,  त्यांच्या बाजूचा आदींपैकी एक लेबल लावणे हाच असू शकतो.

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

आंतरजातीय विवाह

लग्न हे केवळ दोन व्यक्तिंमधलं नातं नसून दोन कुटुंबांमधलं नातं असतं. आणि जेव्हा दोन कुटुंबे नातं जोडतात तेव्हा अर्थातच कॉम्पॅटिबिलिटीचा विचार होणारच. आताशा कुठे लोकांची वागणूक, राहणीमान, खानपान हे जातींच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये थोडीफार समानता येत आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाहासाठी आपला समाज परिपक्व व्हायला बराच अवधी जावा लागेल असं मला तरी वाटतं. कुठलाही बदल एकदम घडण्यापेक्षा हळूहळू झाला तर दीर्घ काळ टिकतो. त्यामुळे आंतरजातीय विवाहांची प्रक्रिया ही क्रांतीपेक्षा उत्क्रांती म्हणून घडली तरच त्यातून चांगलं काही निष्पन्न होईल.