पाउस म्हटला की आठवतं ते लहानपणी चिखल तुडवीत, छत्री सांभाळत आणि कपडे सावरत, पावसाला शिव्या घालत शाळेत जाणं...किंवा मग कधीतरी खूप पाऊस आहे म्हणून शाळेला दांडी मारणं....शाळा सुटल्यावर भिजून आल्यावर डोकं कोरडं करत असताना आईचं आपल्यावर ओरडणं.... तसंच आठवतात कधीतरी रात्रभर लाईट गेल्यावर रंगलेल्या गप्पा आणि त्या अंधाराचा काळेपणा जो अजूनही हवाहवासा वाटतो....आणि सकाळी ओला होऊन आलेला न्यूजपेपर आणि त्याचा तो typical वास आणि त्यातल्या बातम्यांमधून सुद्धा ठिबकत असणारा पाऊसच.
पूजा झाल्यानंतर सकाळी तो घरात दरवळणारा उदबत्तीचा मंद वासही असाच एखाद्या क्षणी आठवून जातो.... क्षणिकच थोडासा दरवळतोसुद्धा....आणि मध्येच एखादी ज्ञानेश्वरीची ओवीसुद्धा कानात घुमून जाते....
आणि आठवते ती पंढरीची वारी.... आषाढाताली...तो टाळ मृदंगाचा गजर....ती एक एक मुक्काम सर करत पुढे जाणारी माउलींची पालखी....ते बेभान होऊन चालणारे वारकरी....ती गुलाल,अष्टगंध आणि अबीर बुक्क्याची उधळण ....तुकोबा ज्ञानोबाच्या घोड्याचं रिंगण....चैतन्यमय झालेली हि संपूर्ण चारचार सृष्टी....आणि विठोबाच्या कपाळावरचा तो श्रीगंध...भला मोठा....त्यालाच साजेसा....त्याच्या चेहऱ्यावरचा निरागस तरीही आश्वासक भाव....आपण स्वतः वारीला कधीही गेलो नसलो तरी मानाने त्या विठ्ठलाच्या चरणी सर्वांआधी माथा टेकून आलेलो असतो....
दहा दिवस चालणारा गणेशोत्सव....आणि दुःखी अंतःकरणाने केलेलं बाप्पाचं विसर्जनही....दोन तीन दिवस येऊन जाणारी गौरी....नागपंचमी....पोळ्याला चालणारा बैलांचा थाट....श्रावणात येणारी कृष्ण जन्माष्टमी....त्यानिमित्ताने फोडली जाणारी दही हंडी....आणि हो आठवतो तो याच सुमारास येणारा पंधरा ऑगस्ट सुद्धा...
पाऊस म्हटला की आठवते ती शेतातली पेरणी....कापसाची लावणी...आणि हे करत असताना पाऊस आला की सगळ्यांची होणारी धावपळसुद्धा....ठिबकणाऱ्या झोपडीच्या किंवा झाडाच्या आश्रयाला सगळ्यांचं भिजत उभं राहणं....आणि आठवतात त्या रात्री आजीच्या मांडीवर झोपून ऐकलेल्या मोठ्यांच्या चाललेल्या गप्पा....
आठवते अंगणातल्या कडूलिंबाच्या झाडाला फुटलेली पालवी....नुकताच अंगणात लावलेला झेंडू....जास्वंदाच्या टपोऱ्या लाल फुलांवर जमलेले दवासारखे पावसाचे थेंब....पारिजाताच्या फुलांचा पडलेला सडा....पाणी पिऊन बहरलेली वृन्दावानातली तुळस....शेन्द्र्या फुलांची अबोली....काट्या मधून हळूच डोकावणारे गुलाबाचे लाल, पिवळे, शेंदरे, आणि पांढरे नाजूक गेंद...आणि अंगणातला चाफा सुद्धा....
आणि आठवतं अशाच पावसाळ्यात घर सोडून शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना भरून आलेलं मन....मनात चाललेला विचारांचा पाऊस....आणि तरीही होणारा नाईलाज....
जरा अलीकडच्या काळात डोकावलं तर आठवतं ते आपल्याला कुणीतरी आवडायला लागलेलं....प्रेम म्हणा किंवा हवं ते म्हणा....त्या आठवणींना पावसाळ्यातच बहार येत असतो....
पाऊस.सृष्टीच्या जिवंतपणाची साक्ष देणारा. आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच आठवणी जागा करणारा. इतक्या की शब्द अपुरे पडावेत त्यांचं वर्णन करताना. त्या आठवणी कडू की गोड हे महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते त्यांचं असणं.
आणि सत्य हे असतं की आता आपण त्या सर्वांपासून कितीतरी दूर आलेलो असतो. कदाचित कधीच परत न जाण्यासाठी. पण तरीही ह्या आठवणी आपल्याला बळ देत असतात....जगण्याचं, लढण्याचं, वर्तमानाशी संघर्ष करण्याचं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्या स्वामी सामार्थांसारख्या.
(फोटो- सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स.com )

