पृष्ठे

रविवार, ११ मे, २०१४

हे आपलं असंच

पुस्तक वाचण्यातली जी मजा आहे ती चित्रपट पाहण्यात नाही. पुस्तक वाचताना वाचक त्याच्या मर्जीनुसार चित्र रंगवू शकतो. पुस्तकातले सगळेच अनुभव वाचकाने घेतले असतीलच असं नाही पण तरीही आपापल्या अनुभवांशी सांगड घालण्याचा त्याचा प्रयत्न असतो. चित्रपटात मात्र ते कल्पनास्वातंत्र्य नसतं. तिथे डायरेक्टरच्या डोक्यात जे येईल ते प्रेक्षकांना पाहावं लागतं. उदाहरणादाखल व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडी मधला हा उतारा पहा 

"बघता बघता काळोख नाहीसा झाला. दिसू लागले. झाडेझुडपे, दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिसेनाशा झाल्या. रातकिड्यांचे गाणे थांबले. झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जाड कावकाव ऐकू आली. तांबडा पिवळा सूर्य माळाआडून वर आला. हिरवट प्रकाशाला पिवळी झळाळी आली. बोरींच्या झुडपात बसून राहिलेल्या सातबाया जाग्या झाल्या. शेपटी नाचवून कलकलू लागल्या. … "

बाकी शून्य-४

प्रिय,

आपल्या आयुष्यात होणाऱ्या भूकंपाने फक्त आपणच हादरून जात असतो. जगाला त्याचा मागमूसही नसतो आणि पर्वाही नसते. आणि तरीही आपण उगाच सगळ्यांना ओरडून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. माणसानं आपले अनुभव आपल्यापुरतेच ठेवावेत हेच खरं. आपल्या भाव भावनांचं उगाच प्रदर्शन न मांडलेलं बरं. आणि मुळात तशी गरज का म्हणून वाटावी? माहित आहे ना आपल्या हाकेला उत्तर नाही येणार म्हणून. मग हाक द्यायचीच कशाला? 

-बाकी शून्य 

शुक्रवार, ९ मे, २०१४

रिसर्च

जगातला ९९% रिसर्च हा फक्त डिग्री किंवा प्रमोशन मिळवण्यासाठीच केला जातो. फक्त पेपर छापायचे हा एकच हेतू असतो. बाकी तो आपण कशासाठी करतोय, त्याचा खरोखरच काही उपयोग आहे की नाही हे तपासून बघण्याची तसदी कुणीही घेत नाही. आता माझाच रिसर्च घ्या. तो कुठेच इम्प्लिमेंट होणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. अजून कशाला मी आणि माझा गाईड आणि फार तर रिव्ह्युअर यांच्याशिवाय माझा थेसिस कुणीही वाचणार नाही हेही चांगलंच माहित आहे. तरीही मी हे का करतोय?कारण तोच एक मार्ग आहे एम.एस. कम्प्लीट करण्याचा. बरं रिसर्च म्हणजे काही लई भारी वगैरे नसतं. जगातलं सगळ्यात बोरिंग काम असतं ते. कसलीच एक्साईटमेंट नसते आणि एक्साईटमेंट तर सोडाच अधून मधून डिप्रेशनचे फेजेस येत असतात. कसलीच निश्चितताही नसते. मग तरीही मी हे करतोय. ही कुणाची फसवणूक म्हणायची? स्वतःची की समाजाची? 


गुरुवार, १ मे, २०१४

असंच काहीतरी

मंडळी तुम्ही काहीही म्हणा पण एक गोष्ट खरी की आपल्याला आपली लाईफ भयंकरच बोरिंग वाटत असते. आपल्या लाईफमध्ये सालं काही happeningच नाही असं सतत वाटत असतं. तेच तेच रटाळ जगणं. कधी कधी तर कुठे तरी पळून जावसं वाटतं. याउलट आपल्याला इतरांच्या लाईफचं खूप आकर्षण असतं आणि कधी कधी हेवासुद्धा वाटतो. त्यात आपले मित्र, नातेवाईक तर असतातच पण विशेषतः चित्रपट, सिरिअल्स, कथा-कादंबऱ्या यांच्यातले कॅरॅक्टर्ससुद्धा असतात. त्यांचं लाईफ किती happening असतं ना. भलेही ते काल्पनिक असेल पण रंजक असतं.