पृष्ठे

सोमवार, १४ जुलै, २०१४

असाच एक विचार

जसजशी रात्र चढत जाते डोक्यातले विचार कमी होत जातात आणि शेवटी कुठल्या तरी एका विचाराभोवती अस्तित्व फिरत राहतं. तो एकच एक विचार भारावून टाकतो. काहीतरी गवसल्याचा साक्षात्कार होतो. आयुष्याला दिशा मिळाल्याचा साक्षात्कार होतो. मग त्या विचाराने भारावून झोपेच्या स्वाधीन होतो. केव्हा झोप लागते कळतही नाही . स्वप्नांमध्ये त्या विचाराचा लवलेशही नसतो आणि सकाळ होईपर्यंत तर झोपेच्या तळी तो विचारच गाडला जातो. आणि मग सकाळी एवढंच आठवतं की एका विचाराने आपण रात्री भारावून गेलो होतो आणि प्रश्न पडतो की का? तो विचार इतका उदात्त होता की ती रात्र इतकी गहिरी होती? नेहमीप्रमाणे उत्तर मिळत नाहीच. आयुष्याला अशा विचारांतून कित्येक दिशा गवसल्या आहेत आणि कित्येक मार्ग सापडले आहेत. काही मार्ग क्रमिले आणि काही वळणे मागेच सोडावी लागली. सगळ्याच वाटा काही आपल्यासाठी नसतात. त्या फक्त तिथे असतात, कधीतरी एखादा पर्याय म्हणून. बाकी आपले राजमार्ग आपण ओळखायचे असतात. किंबहुना आपण ज्या मार्गावर चालतोय तोच आपला राजमार्ग म्हणायचा असतो. 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

रविवार, ६ जुलै, २०१४

भय इथले संपत नाही



मी अजून अर्धंच अंतर पार केलेलं होतं. तसा मला निघायला उशीरच झाला होता. आता दिवस मावळतीकडे चालला होता आणि मला अजून बरंच अंतर जायचं होतं. साधारण एक दीड तास तरी लागणार होता इथून गावात पोहचायला. आणि गावात जायला या वेळी काही वाहन भेटणार नाही याची कल्पना होती. पायी चालत जायचं असा निश्चय करूनच आलो होतो. निदान सायकल आणायला हवी होती असं आता वाटत होतं. जसा सूर्य क्षितिजाआड जायला लागला तशी हिरवी झाडं काळी व्हायला लागली. त्या झाडांच्या भल्या भयानक लांब सावल्या भयावह वाटायला लागल्या. रेल्वेपटरीच्या जवळच्या वळणावर आलो तेव्हा सगळीकडे अंधारलं होतं. त्या वळणावरची निलगिरीची झाडं भयंकर दिसत होती. पूर्ण रस्ताच सुनसान. माणसाचा दूरदूरपर्यंत कुठेच मागमूस नव्हता. दिवसा डोळ्यांना सुखावणारी दोन्ही बाजूंची हिरवी शेतं आता काळीकुट्ट दिसत होती. रातकिड्यांचा आवाज सतत background music सारखा चालू होता. एक मिनिटसुद्धा मोठा वाटत होता. पूर्वी कधीतरी ऐकलेल्या भूत प्रेताच्या गोष्टी मनात थैमान घालत होत्या. हृदयाचे ठोके भयंकर वाढले होते. आकाशात चंद्रकोरसुद्धा ढगांआड गेली असल्याने काळोख अजूनच गहिरा दिसत होता. माझी पंचेंद्रिये एकदम अलर्ट झाली होती. सतत कुणीतरी माझा पाठलाग करतंय असं अधून मधून वाटत होतं आणि अंगावर सर्रकन काटा येत होता. पण मी फक्त पुढे पाहून चालत होतो कारण मागे पहायची हिंमतच होत नव्हती. मागेच काय आजूबाजूलासुद्धा पहायची हिंमत होत नव्हती. मनात हनुमान चालीसा म्हणत होतो. तरीही भीती वाटत होती. भितीपुढे श्रद्धा कमकुवत पडते का ? की आपली श्राद्धाच मुळात कमकुवत असते? एखादं कुत्रं जरी जवळून गेलं तरी मला बरं वाटत होतं. या क्षणी चोर-दरोडेखोरांनी आडवलं असतं तरीही मला आनंदच झाला असता. आता फक्त आणि फक्त गाव जवळ करायचा होता. या मृत काळ्याकुट्ट शांततेपासून दूर जायचं होतं. मनातले विचार काही थांबायला तयार नव्हते. आजूबाजूची सळसळसुद्धा काळजाचं पाणी करून जात होती. किती अंतर पार केलं याचा काही हिशेब नव्हता. मग थोड्याच वेळात दूर अंतरावर लुकलुकते दिवे दिसले आणि गाव जवळ आल्याचं वाटून थोडं बरं वाटलं. मग गावाच्या शिवारात आल्यावर एखाद दुसरा माणूस भेटत होता. आता फार बरं वाटत होतं. काही वेळातच तो गडद अंधार आणि तो गडद प्रहर भेदून मी शेवटी गावात पोहचलो आणि एका भयंकर काळ्या प्रवासाचा अंत झाला. भीती आपल्या मनातच असते पण तरीही आपल्या मनाचा ताबा घेते. भीतीच्या पोटी तर्कबुद्धीला थाराच नसतो. 

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

मनाशी संवाद

प्रत्येक वेळी मागे वळून पाहिल्यावर आपण किती इग्नोरंट होतो (रादर वेडे होतो) हे कळतं. म्हणजे पुढे गेल्यावर कळतं की आपण हे करायला हवं होतं किंवा नको होतं. कारण तेव्हा एक टॉप व्ह्यू आलेला असतो भूतकाळाचा. प्रत्येक पॉईन्टच्या भोवतालची सगळी परिस्थिती माहित असते.  पण वर्तमानात तसं नसतं. वर्तमान एक कोडं असतं. काही अंतरापलीकडे नजरच पोहचत नाही. भविष्यात डोकावणं फार थोड्या लोकांना जमतं. त्यामुळे नेहमी मनात एक फिलिंग असते की मी काहीतरी मिस करतोय जे वेळ निघून गेल्यावर किंवा फार उशीर झाल्यावर कळणार आहे. पण हे अपरिहार्य आहे म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे जे जे करता येईल ते करायचं आणि जे जे समोर येईल ते ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं बस. 

मंगळवार, १ जुलै, २०१४

मनात येईल ते

दिड वाजलाय रात्रीचा आणि अजून मी जागाच. पण हे रोजचंच झालंय आता जवळपास. 'वीणा इन व्हिएन्ना' ऐकतोय. सुचवण्यासाठी थ्यांक्स टू विशाल. झोपावं असं मनात आहे पण हे क्षण असेच धरून ठेवण्याचा एक प्रयत्न. रात्री नाऊनंतर टाईम एकदम accelerate होतो. हा हा म्हणता मध्यरात्र उलटून जाते. पण कानात इअरफोन्स आणि मनात विचार असले की झोप कुठून येणार? आणि त्यात भरीस भर म्हणून पाऊस पडून थंड झालेलं वातावरण. ही रात्र अशीच चालत राहिली तर कुणाचं काय बिघडतं? या क्षणी जगात काय काय घडत असेल बरं? उद्या ल्याबमध्ये भयंकर झोप येणार. 

माणूस अजब गोष्ट आहे ना? आपल्याभोवती आपल्याच विचारांचं जग निर्माण करतो आणि मग भोवतीच्या खऱ्या जगात त्याचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न करतो. विचारही किती! क्षणक्षणाला एकेक उगवतात. पाण्यावर उठणाऱ्या तारांगांसारखे. नुसती हालचाल चाललेली असते मनाची. झोपेत तरी कुठे शांत असतं ते? स्वप्नं पडतातच…  इच्छा असो वा नसो आणि मग त्यांत रमायला लागलं की सकाळ होते. मग स्वप्नात काय पाहिलं हेही आठवत नाही. लिहिण्यात तोचतोचपणा आल्यासारखं वाटतंय. पण करणार काय माणूस तोच आहे ना राव. संगितासारखा आनंद जगात इतर कुठे आहे? म्हणूनच तर काहीजणांना हे विश्व संगीतातून निर्माण झाल्यासारखं वाटत असावं. आपल्याला काय वाटतं हे आपल्या मूड्सवर खूपच अवलंबून असतं. या पोस्टला टायटल काय द्यावं हाही एक प्रश्नच आहे. randomला मराठीत काय म्हणतात काय माहित राव.