पृष्ठे

शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

सुविचार

शाळेत असताना बोर्डावर सुविचार लिहायची जबाबदारी बहुतेक वेळा माझी असायची. तेव्हा फक्त ते सुविचार लिहायचो, त्यांचा अर्थ कळायचा पण त्यांचं महत्त्व नाही कळायचं कारण तेवढं जगच पाहिलं नव्हतं, तेवढा अनुभव गाठीशी नव्हता. पण आता थोडंफार जग पाहिलंय आणि थोडाफार अनुभव गाठीशी आहे तेव्हा काही सुविचारांचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडत आहे. खरं तर सुविचार म्हणजे कुणाचे ना कुणाचे अनुभवच नाही का? शब्दांत गोठलेले,थिजलेले . जोपर्यंत अनुभवाची झळ तुम्हांला लागत नाही तोपर्यंत ते तुमच्यासाठी फक्त थिजलेलेच राहणार. 

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

हिंदू

सगळी माणसं सारखीच आहेत यात काही वादच नाही , पण हे हिंदूंसोबतच इतरांनीही शिकायला हवंच. विशेषतः ज्यांना आपलाच धर्म श्रेष्ठ आणि एकमेव सत्य वाटतो त्यांनी. आणि राहता राहिला प्रश्न हिंदू या शब्दाचा. तर त्याचं मूळ काहीही असलं तरी आता हिंदू ही आपली ओळख झाली आहे. हिंदू शब्द नसता तरीही या धर्माला इतर कुठल्या तरी नावाने ओळखले गेले असतेच. आणि हिंदू नावाखाली जर वेगवेगळे भारतीय संप्रदाय एकवटले नसते तर आज त्यांचेच कित्येक धर्म झाले असते. कुणी शैव, कुणी वैष्णव, कुणी आणखी काही. मुळात "एकम सात विप्राः बहुधा वदन्ति" हीच हिंदू धर्माची विचारसारणी राहिलेली आहे नेहमीच. तुम्ही कोणा एका देवाला भजता किंवा कोण्या एका प्रेषिताला मानता म्हणून तुम्ही हिंदू अशी हिंदू धर्माची ओळख नाही हाच हिंदू धर्माचा मोठेपणा नाही का वाटत? मी हिंदू असूनसुद्धा नास्तिक असू शकतो ही हिंदू असण्यातली चैन नाही का? Authoritarian नसणं हे हिंदू धर्माचं बलस्थान नाही का वाटत? द्वैत अद्वैत, विशिष्ठाद्वैत यांच्यासोबत चार्वाकनीतीलाही फक्त हिंदू धर्मातच स्थान मिळू शकतं. मला वाटतं हिंदू धर्मात जर काही वाईट असेल तर ते एकच - जातीभेद. 

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

१४ जून २०१३

(माझ्या ब्लॉगवर काही अर्धवट पोस्ट्स आहेत. ही त्यांपैकीच एक. १४ जून २०१३ रोजी लिहिलेली. आता ती पूर्ण करण्याची शक्यता नाही कारण ते फिलिंग परत येणे शक्य नाही. म्हणून तशीच अर्धवट पोस्ट.)

बाहेर कसला मस्त मोसम आहे राव. आणि मी हे असलं काय बोअरिंग करत बसलोय. आणि इथे जाम कंटाळा आलाय राव labमध्ये बसून बसून. एक शोध निबंध (रिसर्च पेपर ) वाचूनच डोक्याचा पार खुळखुळा झालाय. आजचा विचारांचा कोटा संपलाय आणि आज तरी नवीन काही आयडिया उगवेलसं वाटत नाही. नुसती खिचडी झालीय डोक्यात. मी प्रॉब्लेमच्या जवळ असल्यसारखं वाटतंय. तसं आतापर्यंत ते बऱ्याच वेळा वाटलंय. असो. तर पाऊस… पावसाळ्यात एक खास मूड तयार होतो. अशा वेळी सगळं सोडून घरी असावं किंवा या पावसाचा मनमुराद आनंद घेत कुठेतरी निवांत ठिकाणी असावं…  अगदी कुठेही चालेल पण इथे नको. मनसोक्त जगावंसं वाटतं. खूप काही लिहावंसंसुद्धा वाटतं. कविता सुचायला लागतात. आठवणी दाटायला लागतात. सगळंच मस्त मस्त वाटायला लागतं. "श्रावण मासी, हर्ष मानसी…' अशी अवस्था होते.