कधीकधी आपण गणपती करायला जातो पण त्याचा मारुती होतो. याचं उदाहरण म्हणजे खालचा परिच्छेद. उगाच जुळवून आणलेल्या शब्दांचा ढीग. टारझनसारखं एक पारंबी सोडून दुसरीला लटकायचं असं केलंय. आणि शेवटी जिथून निघालो तिथे परत. केकुलेच्या स्वप्नातल्या सापासारखं.
आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो. सुखाच्या सावलीत दुःखाच्या झळा जाणवत नाहीत. भलेही ते कितीही तीव्र असो. भूतकाळच तो. त्या दुःखाचे व्रण तेवढे मनावर राहतात. काळाबरोबर ते धुसर होत जातात. तरीही त्यांना आपण किती जपतो! मुळात सुखी राहण्याची माणसाची प्रवृत्तीच नाही का? बरं एवढ्यावर कुठे आपलं समाधान होतं? आपली दर्दभरी कहाणी कुठेतरी कथन करावी असा अट्टाहास. आपण जे भोगलंय, जे सोसलंय, ज्या धैर्यानं कठीण प्रसंगाला तोंड दिलंय त्याची स्टोरी ऐकणारं कुणीतरी हवं असतं. मग अर्थातच त्या कथेचं उदात्तीकरण आलं. इथे ऐकणाऱ्या व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती अपेक्षित असते. इथेच नात्यांची गरज निर्माण होते. नातं मग ते कसलंही असो त्यात ओलावा हवा. ओलावा नसलेली नाती रुक्ष असतात. वठलेल्या झाडासारखी. ती सावलीही देत नाहीत आणि फळेही. ती असली तरी नसल्यासारखीच. त्यांचा आधार वाटण्यापेक्षा ओझंच वाटत राहतं. असली ओझी डोक्यावरून उतरवताही येत नाहीत. ती तशीच आयुष्यभर वाहावी लागतात. आयुष्यात असल्या नात्यांसारखीच कितीतरी ओझी आपण वाहत असतो. आणि आयुष्य बोजड करून टाकतो. त्यामुळे समोर आलेलं सुखही आपल्याला नीट दिसत नाही. त्याला डावलून आपण पुढे जातो. अज्ञात सुखाच्याच मागे धावत. आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो…

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा