कर्तृत्वाशिवाय माणूस काहीच नाही. जगात दोनच प्रकारचे लोक असतात - एक म्हणजे कर्तृत्ववान आणि दुसरे म्हणजे कर्तृत्वशून्य. आयुष्याचं सार्थक करायचं की ते व्यर्थ घालवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. जेव्हा आपण सोपा मार्ग निवडतो तेव्हा आपण आयुष्य व्यर्थ घालवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतो. काहीच न करणं फार सोपं असतं, प्रवाहाबरोबर वाहत जाणं त्याहून सोपं असतं. त्यात कसलाच पुरुषार्थ नाही. काहीतरी करण्याची निदान इच्छा असणं ही अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची पहिली पायरी पण फक्त तेवढं पुरेसं नाही. त्या इच्छेला कर्तृत्वाची जोड मिळाली तरच तिला काही अर्थ येतो. नुसतं जागून आपण काय वेगळं करतो? जगतात तर सगळेच.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
गुरुवार, १८ मे, २०१७
बुधवार, १७ मे, २०१७
काळ
मावळत्या सूर्याबरोबर विरघळून जातात निर्धारांचे पर्वत, मावळून जातात आशेचे दीप, वितळून जातात संकल्पांचे ढीग आणि गळून जाते जिद्दीचे अवसान. उद्याचा सूर्य अडकून पडतो संशयाच्या भोवऱ्यात आणि एकेक क्षण करतो एकेक युग वजा आयुष्यातून आणि शेवटी जाऊन पडतो भूतकाळाच्या काळकोठडीत कधीही पुन्हा परतून न येण्यासाठी. हवा असलेला सूर्य युगानुयुगे उगवत नाही आणि नको असलेला सूर्य मात्र अस्त पावत नाही. रात्रीचंही तेच. कित्येक युगांपासून आपण तिथेच आहोत आणि तसेच. बदलत जातो तो फक्त काळ.
शनिवार, १३ मे, २०१७
नदीकिनारी
एक धीरगंभीर अशी सायंकाळ. दिवसभराच्या दगदगीनंतर जरा थकूनच नदीकिनारी एकांतात बसलेला मी... निःशब्दसा. शब्दांचं कसलंच अवडंबर नाही. समोर मावळतीला लागलेला लालसर सूर्य. त्याने निळसर आकाशात केलेली तांबूस पिवळसर रंगांची उधळण. सगळ्या चाराचाराला हळूच आपल्या कवेत घेत जाणारा काळोख. संथ वाहणारा वारा, अगदी मंद मंद आणि हलकासा. दूर मंदिरातून उमटणारा मंजुळ घंटानाद. कपाळी लावलेल्या चंदनाचा हलकेच दरवळणारा सुगंध. पाण्यात अधून मधून होणारी माशांची सळसळ. दूरवर टिमटिमणाऱ्या दिव्यांच्या रांगा. आकाशात हलकेच डोकावणारी चंद्रकोर. परतीच्या वाटेवर असलेले पाखरांचे थवे. वातावरणात जाणवणारा थोडासा उकाडा आणि थोडासा दमटपणा. त्या किनाऱ्यावर दिसणारी झाडाझुडुपांची हिरवट काळसर रांग. काय असेल त्यांच्या पलीकडे? तिकडून सगळं कसं दिसत असेल? जीवन किती वेगळं आहे प्रत्येकासाठी! दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. आपल्याला जग जसं दिसतं तसं कदाचित ते इतरांना दिसतही नसेल. बाहेरचं जग म्हणजे तरी दुसरं काय आहे? आपल्या मानाचं प्रतिबिंबच, नाही का? सुख दुःखही शेवटी मनाचाच खेळ. मनासारखं झालं तर सुख नाही तर दुःख.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)