पृष्ठे

शुक्रवार, १ जुलै, २०१६

Letter to my 21 year old self

Hi,
I am not as distant to you as I may sound. I am just 9 years away from you. Yet for these 9 years I have seen a lot of failure and learned a lot of lessons which I wish I had known when I was you.

I want to tell you that you are way too ignorant and full of preconceived notions. You need to get rid of those. You need to open your heart and mind to the world, to the people. Accept them as they are. There are many wonderful people who do not think or live or behave the way you do and still they are not wrong. They are as right as you are. Don't be mean or rude to them or to anybody, for that matter. 

You are also under the impression that the world will value you for your education and knowledge but that is not entirely true. The world values you only when you have something to deliver to it. I am not here to tell you the future but let me advice you that be prepared to face the failure. It tests bitter as hell but bear with it, face it with all your power and you will emerge stronger than before. 

शुक्रवार, १० जून, २०१६

डायरीच्या पानांतून

------------------------
डायरीच्या पानांतून 
------------------------
श्रद्धा हे ब्रम्हास्त्र आहे देवाला धमकावण्यासाठी. 'मला हवं तसं नाही झालं तर तुझ्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभं करीन' असं म्हणून. पण ते एकदाच वापरायचं असतं -  अगदीच आणीबाणीच्या वेळी.  एकदा का 'त्याच्या' असण्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं की तुम्ही एकटेच उरता आणि तुमचं अस्त्रही नष्ट झालेलं असतं. मग उरते ती नियती तुम्हाला फरपटत नेणारी आणि तुमचा नियतीवर मात करण्यासाठी चाललेला संघर्ष. पण त्या संघर्षात वेदना असतातच, पण मजाही असते आणि स्वबळावर लढण्याचा अभिमानही असतो. 

रविवार, १ मे, २०१६

डायरीच्या पानातून

------------------------------
(दि. १० सप्टेंबर २०१२) 
------------------------------
काही वेळापूर्वीच ढग आले, हवेतला कोरडेपणा जाऊन थोडासा दमटपणा आला, वारा वाहायचा थांबला, ढग एक एक करून आकाशात गर्दी करू लागले मग झाकोळून आलं-अगदी अंधारून-आणि सर्वांनी मिळून एकच ठराव संमत केला. त्याच्या जल्लोषात सर्वांनी कडकडाट केला आणि एकच वर्षाव सुरु झाला. आता लहान मोठे थेंब वेगाने जमिनीवर येत आहेत. बाणांच्या वर्षावासारखे. झाडांना,त्यांच्या आश्रयाला असलेल्या पक्ष्यांना, पानांना, गवताच्या पात्यांना, फुलांना, घरांना, रस्त्यांना, वाटांना, त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अगदी सर्वांनाच चिंब चिंब भिजवून ते थेंब जमिनीवर ओघळत आहेत. सृष्टीला न्हाऊ घालत आहेत. चैतन्याचाच वर्षाव हा. झाडांच्या ढाली फुटून गेल्या आहेत. त्याखाली आश्रय घेतलेली माणसे आता दुसरा आश्रय शोधत आहेत. होस्टेलच्या गच्चीवर स्वैर संचार करणारी माकडं बिचारी आपल्या पिलांसहित कुठे लपून बसली कुणास ठाऊक. galleryला असलेल्या लोखंडी गजांच्या खाली थेंबांची एक रंगच तयार झाली आहे. पलीकडचा निसर्गाचं त्यांत सूक्ष्म प्रतिबिंब दिसतंय. हवेत मस्त गारवा आलाय. होस्टेलच्या पटांगणात असलेली सगळी झाडे पाणी पिऊन तजेला आल्यासारखी दिसतायत. जिकडे पाहावं तिकडे हिरव्याच हिरव्या रंगाच्या छटा. मध्येच कुठे कुठे पिवळा रंग डोकं वर काढून जणू निसर्गाच्या प्रगल्भतेची साक्षच देतोय. एकदम प्रसन्न वाटतंय. 

डायरीच्या पानातून

-----------------------------------------------
डायरीच्या पानातून (दि. १६ डिसेंबर २०१२)
-----------------------------------------------
सकाळी लवकर उठण्याच्या आमच्या मनसुब्याला आमच्या जागरणाने सुरुंग लागत आहे. कितीही उशिरा झोपलो तरीही आम्ही पाचचा गजर लावतो कारण झोपताना आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास असतो. पण जसे आम्ही निद्रेच्या कवेत जातो तसे आम्ही आमचेही राहत नाही. मग कधी गजर वाजून वाजून कंटाळतो किंवा कधी आम्ही त्याचं तोंड बंद करतो. आणि परत आपल्या पोजमध्ये. आणि सकाळी वेळही जास्तच वेगाने धावायला लागतो. घड्याळात पहिले तर सात अन पाच मिनिटांनी उठून पाहतो तर आठ, अजून काही मिनिटे आणि साडेनऊ!!! मग काय पुन्हा एकदा पराभव. मग उद्या लवकर उठण्याचा निर्धार त्याच क्षणी होतो...अन त्या दिवसाचा रहाटगाडा चालू होतो. 

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

हा लांबच लांब डांबरी काळसर रस्ता, दूरपर्यंत कुठेच वळण नसलेला. सरळ त्या डोंगराच्या कुशीत शिरणारा. हा कोसळणारा पाऊस आणि त्यात चिंब भिजणारं शिवार. रस्त्यावर पाणी पडून त्यात पुसटसं हिरव्या पेन्सिलने रेखाटल्यासारखं दिसणारं झाडांचं प्रतिबिंब. रस्त्याच्या दुतर्फा झाडांवर आणि रानांमध्ये झालेली हिरव्या-पिवळ्या रंगाची उधळण. दूर डोंगरावर हळूच उतरत असलेले ढग आणि त्या ढगांत धुसर होत जाणारं डोंगरावरचं ते महादेवाचं देऊळ आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी निपचित पडलेला गाव. हे सगळं मी कित्येक वर्षे इथे कड्यावर उभा राहून पाहतोय. अगणित तपं उलटली मला इथे उभं राहून. तुम्हां माणसांच्या कित्येक पिढ्या माझ्या समोर जन्मल्या नि काळाच्या पडद्याआड गेल्या. माझ्या बरोबरीने, किंबहुना माझ्याही आधीपासून, तिथे उभे आहेत ते म्हणजे तो समोरचा निळसर डोंगर आणि त्यावरचं भगवी पताका पेलणारं ते देऊळ आणि त्या देवळातला तो देव. बाकी सगळे काळसर्पाने गिळून घेतले. 

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

मनोगत

आमच्यासारखे लोक लवकर उद्विग्न होतात, दुःखी होतात, खिन्न होतात, भावूक होतात, भारावून जातात आणि आनंदीही होतात. याचा अर्थ आम्हांला स्थितप्रज्ञता कळलेली नसते असं नव्हे. आम्ही केवळ मनात उठणाऱ्या तरंगांना प्रतिसाद देत असतो एवढाच काय तो फरक. कधी उदास वाटत असेल किंवा अत्यानंद वाटत असेल तर तो अख्खा दिवस आम्ही त्याच मूडमध्ये राहतो. व्यवहार आम्हांलाही तेवढाच कळतो जेवढा स्वतःला व्यवहारी म्हणून टेंभा मिरवणाऱ्यांना कळतो. फक्त भावनांच्या आवेगाला थोपवून धरणं आम्हांला जरा अवघड जातं आणि आमची तशी इच्छाही नसते. आम्ही त्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो आणि वाहत जातो. आणि तसं वाहताना कसलाच व्यवहारीपणा आम्हांला स्पर्श करत नाही. आम्ही अगदी तिथे असतो जिथे मन असतं. उगाच बुद्धीच्या मागे फरफटत जायला आम्हांला जमत नाही. 


-----------------------------------------
डायरीच्या पानातून (दि. २ जून २०१५ )
-----------------------------------------
नेहमीसारखीच एकाकी रात्र हळूच उतरलीय. संधिप्रकाशाला मागे सारून आत्ता माझ्या समोर तिने सगळ्या शहराला आपल्या काळोख्या मिठीत घेतलंय. घरोघरी, रस्तोरस्ती, गल्लोगल्ली बल्ब, ट्यूबलाईट्स पेटायला लागलेत. प्रवासी पक्षांचे थवे आपल्या वाटेवर मार्गस्थ झालेले दिसतायत. निरव असा मंदसा वारा हळूच वाहतोय. वाऱ्याचा तो स्पर्श डोळे आणि कान यापलीकडे असलेल्या आपल्याच असण्याची जाणीव करून देतोय. लाटांच्या गाजांनी सगळा आसमंत निनादून टाकलाय. वर आकाशात चांदण्यांच्या गर्दीतून चंद्रबिंब डोकावातंय. दूर एक विमान हळूच खाली उतरतंय अगदी समुद्रपक्षी पाण्यावर उतरावेत तसं. आणि मी इथे समुद्रकिनारी या सगळ्यांचा आस्वाद घेत बसलोय मस्त. 

मागे रस्त्यावर वाहनांची रेलचेल चालूच आहे पण त्याची समुद्राला आणि मलाही कसली आली तमा. तो आपला मस्त आहे आपल्याच विशालकाय अस्तित्वात रमलेला. त्याला ना शब्दांच्या कुबड्यांची गरज ना कुणाच्या सहानुभूतीची. आपलं अस्तित्व तो आपल्या असण्यातूनच सतत प्रकट करत असतो. समुद्रकिनारी मलाही एकदम विशालकाय झाल्यासारखं वाटतं, या अफाट निसर्गाचा एक भाग असल्यासारखं वाटतं, आपलं असणं सार्थकी लागल्यासारखं वाटतं. आपले सगळेच प्रश्न अगदी लहान वाटायला लागतात. संकुचित, क्षुद्र विचारांना जागाच उरत नाही मनात. ते उदात्त भावनांनी ओसंडून वाहतं. प्रश्नसुद्धा मोठे मोठे पडू लागतात आणि तशाच उदात्त कल्पनाही सुचायला लागतात. 

शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

माणूस हळू हळू एकटा पडत जातो. आयुष्याचा काही काळ अगदी जत्रा असते आणि मग सगळेच आपापल्या प्रश्नांमध्ये अडकत जातात, इतके की आपल्या माणसांच्या गर्दीत असूनही प्रत्येक जण एकेकटाच असतो. आनंद, दुःख, उद्वेग, संघर्ष यांच्या कल्लोळात प्रत्येक वेळी तो एकटाच असतो. तो आणि त्याचं एकट्याचं एकाकी विश्व बस. 

बुधवार, १६ मार्च, २०१६

जग हे कृष्ण आणि धवल असं विभागता नाही येत. करड्या रंगाच्या छटा असतात जिकडे तिकडे. काही कळ्याकडे झुकणाऱ्या तर काही पांढऱ्याकडे. प्रत्येकीत थोडासा कृष्ण आणि थोडासा धवल रंग असतोच. आपणही असेच मध्ये कुठल्या एखाद्या छाटेसारखे कृष्ण आणि धवल यांचं मिश्रण असतो. आपण कसे असतो ते पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. हे कळायला लागलं की बरेच पूर्वग्रह दूर होतात, नीरक्षीरविवेक ज्याला म्हणता तो दृष्टीमध्ये येतो. 

सोमवार, १४ मार्च, २०१६

पांढरे निशाण जिंदाबाद

(एक जुनी पोस्ट … तशीच पडून होती… म्हटलं चला प्रकाशित करूया… हे यासाठी सांगितलं की हे वाचून बरेच जण मी आता डिप्रेस झालो असा निष्कर्ष काढतात. असो. )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही नाही हो, चालू आहे कसंतरी रडत पडत जगणं. आयुष्यात असतंच काय वेगळं? रोजचं तेच ते. कधी ते चांगलं वाटतं, कधी रटाळ, तर कधी तेच बोजड वाटतं. आपण असे कोण लागून गेलो जेणेकरून आपल्या आयुष्यात काहीतरी एक्साईटींग घडेल. असंच असतं आयुष्य हे स्वीकारायला हवं. आयुष्याशी तह केला कि सगळं एकदम सोप्पं होऊन जातं. उगाच बंडखोरीच्या भानगडीत पडलं की ना स्वतःला चैन ना इतरांना. आपल्या मर्यादा ओळखल्या की अवास्तव अपेक्षांचे चटके बसत नाहीत. खरं म्हणजे केव्हा तरी एखादी वेळ येते जेव्हा मन बंडखोर होतं पण ती बंडखोरी नेहमीच परवडते असं नाही. एखाद्या वेळी हातीची शस्त्रे मुकाट्याने खाली ठेवली म्हणजे शांती मिळते. पांढरे निशाण जिंदाबाद. 
साचलेल्या भावना आहेत तशाच पडून
काही खोल मनात आणि बाकी डायरीच्या पानांत