कोणतीही संस्कृती, धर्म, भाषा किंवा विचारसरणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जाते तेव्हा ती जशास तशी तिथल्या जनमानसात रुजावी हे शक्य नाही. तिच्यामध्ये त्या ठिकाणानुसार बदल होणारच किंबहुना झालेच पाहिजे. नाहीतर भारतातल्या कम्युनिस्ट पक्षासारखी गत होते. ते फक्त भारतात राहतात, भारतीयांसारखे दिसतात, भारतीय भाषा बोलतात म्हणून भारतीय अन्यथा ते चीन किंवा रशियाच्या डोक्याने विचार करणारेच आहेत. हे तत्त्व बऱ्याच गोष्टींना लागू होते. स्थलकालसापेक्षता नावाची एक गोष्ट असते हे काही महाभाग विसरतात. भारतात असलेल्या सगळ्याच धर्मांनासुद्धा स्थितीशीलता आलेली दिसते. प्राचीन भारताच्या वैभवाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण इथल्या तत्कालीन सर्वसमावेशक समाजव्यवस्थेला, राज्यव्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला विसरतो. आता आपले धर्म, समाज, राज्यव्यवस्था, प्रशासन सर्वांनाच एक प्रकारची मरगळ आली, त्यांमध्ये ताठरपणा आलाय हे दिसून येतं. मला वाटतं आपण नावाला स्वतंत्र आहोत बाकी आपल्या मनमनावर कसल्या ना कसल्या संकुचित विचारांचा, मतांचा प्रभाव आहेच. ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच नाही का?
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
बुधवार, ९ जानेवारी, २०१३
बुधवार, २ जानेवारी, २०१३
एकाकी
कधी कधी अतिशय कठोर वाटणारं मन एखाद्या संध्याकाळी उगाच हळवं होऊन जातं...काहीही कारण नसताना. ते तसं बराच वेळ राहतं. काहीतरी चुकतंय असं उगाच मला सांगू पाहतं. त्याला केवळ शब्दच समजावू शकतात. मग मी त्याला वर्तमानापासून दूर शब्दांच्या, आठवांच्या दुनियेत घेऊन जातो, काही कविता ऐकवतो, जुन्या आठवणी स्मरतो. मग आम्ही तिकडे बराच वेळ रमून जातो. परतावंसंच वाटत नाही. पण कर्तव्य या गोंडस नावाच्या घाण्याला जुंपलो गेलोय, त्याचा दोर मला सप्तपाताळातूनही खेचून परत आणतो. इथून मनाची सुटका नाही. मनाला बंदिवासात टाकून पुन्हा रहाटगाड्याला बांधला जातो. त्या बंदिशाळेत मन बिचारं एकाकी, पोरकं...घुसमटत राहतं. कधी कधी ते बंडसुद्धा करू पाहतं पण ते बंड चिरडून टाकलं जातं...त्याचा नाईलाज होतो आणि माझासुद्धा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)