पृष्ठे

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

दुनियादारी: कादंबरी आणि चित्रपट

काल दुनियादारी चित्रपट पहिला. आणि साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी जेव्हा दुनियादारी रिलीज झाला होता तेव्हाच दुनियादारी ही कादंबरी वाचली. चित्रपट आणि कादंबरी दोन्हीही अप्रतिम आहेत. चित्रपटासाठी मूळ कथेत काही मुलभूत बदल केले आहेत पण ते कुठेच अनाठायी वाटत नाहीत. उलट चित्रपट हिट होण्याचं बरचसं श्रेय त्या बदलांनाच द्यावं लागेल. 

कादंबरी सुरु होते ती श्रेयस पुण्यात आल्यावर आणि मग श्रेयसभोवती फिरते. चित्रपट सुरु होतो म्हातारे शिरीन आणि प्रितम श्रेयसला भेटायला म्हणून पुण्याला जायला निघतात तेव्हा. खरं तर कादंबरीमध्ये श्रेयस किंवा कुणीच म्हातारं होत नाही म्हणजे त्याआधीच कादंबरी संपते. कादंबरीमध्ये गुजराती असलेली शिरीन आणि प्रितम पटेल ही भावंडं चित्रपटात चक्क शिरीन आणि प्रितम घाटगे अशी मराठी होतात आणि त्यांची पार्श्वभूमी सुद्धा राजकीय दाखवली आहे. त्यांचे वडील राजकारणात असल्याचं दाखवलंय. कादंबरीत एक साधा मवाली असलेल्या साईलासुद्धा चित्रपटात राजकीय पार्श्वभूमी मिळते आणि त्याच्यातला विलन अजून पॉवरफुल होतो. या दोन्ही बदलांना पुढे मोठ्या खुबीने एकमेकांत गुंफलंय.  जेव्हा साई आणि शिरीन यांचं लग्न ठरल्याचं कळतं तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शिरीन आणि प्रितम ही भावंडं कट्टा gangचे फ्रेंड्स आणि त्या शिरीनचं लग्न कट्टा gangचा जानी दुश्मन असलेल्या साईशी? पण हा बदल जमून गेलाय. कादंबरीत श्रेयस मिनुच्या प्रेमात आपण होऊन पडतो. पण चित्रपटात तो नाटक करत असल्याचं चित्रण आहे हे जरा खटकतं. असो. नंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे चित्रपटात चक्क श्रेयस आणि शिरीनचं लग्न होतं. कादंबरीत असलं काहीही होत नाही,सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. चित्रपटात एम. के.ला जास्त महत्त्व नाही दिलं आणि ते एका दृष्टीने बरंच झालं कारण कादंबरीतही जेव्हा एम.के. आणि श्रेयस यांचा संवाद येतो तेव्हा कादंबरीचा पेस मंदावल्यासारखा वाटतो.  पण कादंबरीत दारू ढोसून मारणाऱ्या एम के ने चित्रपटात आत्महत्या का केली हे कळत नाही. आणि चित्रपटाचा शेवट तर अगदी यू टर्नच आहे- शेवटी श्रेयस मरतो. पण हा एंड सुद्धा जमून गेलाय. कारण चित्रपट संपल्यावर काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. 

सर्वांचाच अभिनय अगदी अप्रतिम आहे. दिघ्याच्या रोलमध्ये अंकुश चौधरी अगदी परफेक्ट बसतो, स्वप्नीलने साकारलेला श्रेयस, शिरीन झालेली सई, उर्मिला कानेटकरने साकारलेली निरागस मिनू, जितू जोशीचा साई सगळे आपापल्या भूमिकांमध्ये योग्य वाटतात. 

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

तो जायचा दिवस...

घरी असलं कि दिवस इतके लवकर निघून जातात कि घरी राहिल्यासारखं वाटतच नाही. अचानक तो जायचा दिवस समोर येउन उभा राहतो. त्याच्या आदल्या दिवशी तर एकेक क्षण हातातून निसटत असल्यासारखं वाटतं, काय करू अन काय नको असं होतं. मी ते क्षण धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो पण ते शेवटी निसटून जातातच आणि मग उदास रात्र पसरते साऱ्या जगावर आणि माझ्या मनातही. आणि इच्छा नसतानाही सामानाची बांधाबांध करावी लागते कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं असतं. पुन्हा कमीत कमी सहा महिने तरी हे घरी राहण्याचं सुख मिळणार नसतं. झोपही काही केल्या डोळ्यात उतरायला तयार नसते. मग मी या दिवसांत काय काय केलं, कुणाकुणाला भेटलो, कुठेकुठे गेलो याचं पुनरावलोकन होतं. काही गोष्टी केल्याचं समाधान असतं तर काही राहून गेल्याची खंत. आणि मग या विचारांच्या तंद्रीत केव्हा तरी अलगद झोपेच्या स्वाधीन होतो…आणि सकाळ होते. मग मोठ्या मुश्किलीने उठावंच लागतं. आई साखरझोपेत असलेल्या बहिणाबाईला मी जाणार म्हणून उठवते. आपल्यामुळे एवढ्या सगळ्यांना झोपेतून उठावं लागतंय याचं वाईट वाटतं, पण पर्याय नसतो. आई तर पहाटेपासूनच  उठलेली असते. सगळी आवराआवर करून शेवटी देव्हाऱ्यातल्या देवाला, आई-अण्णाला नमस्कार करून स्वारी निघते रेल्वे स्टेशनकडे. इतक्या दिवसांत पहिल्यांदाच इतक्या सकाळी उठल्यामुळे परभणीचं सकाळचं दुर्मिळ रूप नजरेस पडतं आणि परभणी अशीही असते हे पाहून आनंद वाटतो. बाहेर थंडगार हवा सुटलेली असते, वसमत रोड अजून काहीसा पेंगतच असतो, वाहनांची गर्दी व्हायला अजून अवकाश असतो आणि  नाही म्हणायला जॉगिंगवाल्यांची वर्दळ असते, खानापूर फाट्याजवळच्या कृष्ण मंदिरातल्या कृष्णाला मी दुरूनच नमस्कार करतो, काळ्या कमानीला अन गुलमोहर हॉटेललासुद्धा अजून जाग आलेली नसते, त्यापुढे पेट्रोल पंप अन शिवाजी कॉलेजसमोरचे कॉम्प्लेक्स निपचित असतात आणि त्यासमोर अजून झोपेतच असलेलं गार्डन दिसतं, मग अजून पुढे शिवाजी पुतळा आणि बी. रघुनाथ सभागृह शांतपणे उभे असलेले दिसतात आणि रेल्वे स्टेशन आल्याची चाहूल लागते. हे सगळं मी डोळ्यांत साठवून ठेवत असतो आणि पुढच्या खेपेला रोज सकाळी लवकर उठून हे सगळं अनुभवायचा निश्चय करून टाकतो. 

असंच आयुष्याचंसुद्धा असावं. आयुष्याच्या संध्याकाळी किती विचार येत असतील मनात, नाही का? तिथे तर काहीच बरोबर येणार नसतं, आठवणीसुद्धा नाही आणि परत यायचीसुद्धा सोय नसते. ते जाणं कायमचंच असतं.  इतके दिवस ज्यांच्या सहवासात घालवले ती माणसे; जिथे राहिलो, जगलो ते घर, तो परिसर; हे जग; अगदी सगळंच काही सोडून जावं लागणं ही कल्पनाच किती भयंकर आहे. 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

भयंकर डिप्रेशन

आज आपल्याला भयंकर डिप्रेशन आलंय. त्यामुळे काहीतरी भारी असं आपल्या हातून लिहिलं जाण्याची लई दाट शक्यता आहे. त्यासाठी डोक्यातली झाडून सगळी अक्कल पणाला लावली आहे. पण अजून लई भारी असं काही उगवलं नाही. पण हे चांगलं आहे. जेवढं उशिरा उगवेल तेवढं ते भारी असेल असं आम्हांला वाटतंय. रूममधली ट्यूब वगैरे बंद करून अंधार केला आहे, एकदम जुनी जुनी मराठी गाणी मंद आवाजात लावली आहेत. म्हणजे एकूणच सुपीक वातावरण तैय्यार है. फक्त एखादी भन्नाट आयडिया उगवायला उशीर कि टिपलीच म्हणून समजा.