(डोक्यात जरा जास्तच थैमान चाललं होतं. म्हटलं चला शब्दांकित करू...)
संस्कार किंवा आपली जडणघडण हे एक प्रकारचं प्रोग्रामिंग असतं. लहानपणापासून आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे अनुभवतो ते सर्व आपल्या विचारांची, आपल्या मतांची दिशा ठरवीत असतात. पण केवळ बाहेरच्या गोष्टी किंवा आपल्या अवतीभवतीची परस्थिती आपल्या बुद्धीचा ताबा घेता कामा नये. जे काही म्हणून आपण ग्रहण करतो त्यावर चिंतन होणे, त्याची सत्य-असत्यात पडताळून पाहणे, ते कोणत्या काळी कोणत्या स्थळी लागू होतात हे पाहणे आवश्यक आहे. ते व्हायला हवे. नाहीतर ज्यांना आपण आपली मते म्हणतो ती आपली असत नाहीत. ती आपल्यावर पडलेले केवळ प्रतिबिंब असतात. ती मते किंवा विचार किंवा विचारप्रवाह आपणाला कुण्या एका परिस्थितीत पटलेली असतात आणि आपण केवळ त्या मतांचे वाहक असतो. आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा बरेच लोक घेतात. आपण पाहतो आपल्या अवतीभवती किती तरी विचारप्रवाहांचे समूह आढळून येतात. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक असे बरेच कंगोरे असलेले समूह. आणि आपल्या समाजात नेमकं हेच होतंय. या काही वर्षांत किंवा मागच्या दशकात होणाऱ्या घटनांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तर काय दिसून येतं? एक समाज म्हणून आपण कुठे जात आहोत? मला वाटतं एक समाज म्हणून आपलं अस्तित्वच नाही. रेल्वेस्टेशन वरच्या प्रवाशांसारखे आपण समाजात वावरत असतो. आपण आणि केवळ आपण एवढाच विचार आपल्या डोक्यात असतो. बाकीच्यांशी काही देणं-घेणं नाही. आपण राजकीय दृष्ट्या उदासीन आहोत, सामाजिक दृष्ट्या संवेदनहीन आहोत, सांस्कृतिक दृष्ट्या बाळबोध आहोत, धार्मिक दृष्ट्या असहिष्णू आहोत. आपल्या जे नेतृत्व लाभतं तेही आपल्याचमधून आणि तेही मग तसंच असतं - दिवाळखोर, भ्रष्ट, संवेदनहीन. जे राजकारणात आहेत त्यांना समाजाशी काही देणं नाही. ते आपल्याच पिशव्या भरण्यात मग्न आहेत. आणि बाकी बराच समाज ज्याचा राजकारणाशी तसा सरळ सरळ संबंध नाही तो राजकारण म्हटलं कि नाक मुरडतो.
आम्हांला एकदम क्रांती हवीय, बदल हवाय. पण तो घडवून आणायला आम्ही तयार नाही. तो दुसऱ्या कुणी तरी घडवून आणावा. उत्क्रांतीची वाट पाहत थांबायची आमची तयारी नाही. साधं वेबपेज लोड व्हायला वेळ लागत असेल तर उद्विग्न होणारी आमची पिढी. संयम कशाला म्हणतात हे आम्ही मुळी विसरूनच गेलोत. प्रत्येक गोष्ट घडायला वेळ लागतो हे मान्यच नाही आम्हांला. गर्दीचा फायदा घेऊन घोषणा देणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. स्वतःची मते नाहीत, विचार नाहीत, असले तरी ते डळमळीत, त्यांच्यावर ठाम राहता येत नाही, कुणी त्याविरुद्ध विचार ठामपणे सांगितले कि तेही आम्हांला पटतात आणि मग आपला काय चूक होतं हेही आम्हांला काळात नाही. कुणीही येऊन टिकली मारून जावं तसं कुणीही येतं आणि आमच्या डोक्याचा भुगा करून जातं. याचं कारण काय? मुळात आम्हांला लहानपणापासून विचार करायलाच शिकवलं नाही. जे आहे ते स्वीकारा. प्रश्न नको. आणि मग आपल्या कारकून बनवणाऱ्या कारखान्यांतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा कळायला लागतं कि आपण एक माणूस आहोत आणि माणूस म्हणून आपली जडण घडण झालीच नाही....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा