हे आज घडतंय कि पूर्वीही होतं माहिती नाही पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय ती अशी कि स्वतःला नास्तिक म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या जरा वाढतच आहे. अन देव मानणे, मंदिरात जाणे वगैरे मागासलेपणाचं लक्षण समजलं जातंय. म्हणजे सर्वांनी आस्तिक असावं असं मी म्हणत नाही पण आस्तिकता आणि नास्तिकता या दोन विचारधारा आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. खरं तर आपण कसे आहोत आपल्या श्रद्धा काय आहेत यापेक्षा परिस्थितीनुसार स्वतःला प्रेझेंट करणं चाललंय. केवळ नास्तिकताच पुरोगामीपणाची निदर्शक मानणाऱ्या समाजाकडे आपली वाटचाल होतेय. एक टोक आहे धर्मांध लोकांचे ज्यांना आपल्या धर्माशिवाय सगळेच निधर्मी दिसतात आणि दुसरे टोक आहे धर्म अफूची गोळी मानणाऱ्यांचे. यांना धर्म, देव नाव घेताच शिरशिरी येते. आणि यांच्यामध्ये काही जण आहेत जे 'आम्ही धर्मांध नाही' हे दाखवण्यासाठी स्वतःच्याच श्रद्धेला कडी लावतात किंवा चार-चौघात तसं दाखवतात आणि त्या दुसऱ्या टोकाकडे धावत सुटतात. आणि हे लोक स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवतात. विज्ञान काय आहे हे माहिती असो कि नसो. काही अंशी याचे श्रेय हे पश्चिमेचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या घाणेरड्या प्रवृत्तीला जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा