चेन्नई (दि.३१ ऑक्टोबर २०१२; वेळ सायं ३:५०)
आम्ही आता आमच्या रूम मध्ये बसून 'नीलम'ची वाट पाहतोय....! नीलम म्हणजे इथे चेन्नईत येऊ घातलेलं चक्रीवादळ. त्याची लक्षणे कालपासूनच दिसू लागली आहेत. आज सकाळपासून जोराचे वारे वाहत आहेत. कॅम्पसमधली काही मी मी म्हणणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. कॅम्पस मधल्या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली आहे. झाडांच्या फांद्या, पाला-पाचोळा पडून रस्ते हिरवे झाले आहेत. आणि वरून पावसाची रिमझिम सुद्धा चालू आहे पण वाऱ्यामुळे छत्री बाळगायला स्कोप नाही आणि त्यामुळे बाहेर पडल्यास भिजणे अपरिहार्य. संध्याकाळी जेवायला बाहेर कसे पडावे याची चिंता आम्हांला लागली आहे. वाऱ्याचा वेग वरचेवर वाढतच आहे. नीलम संध्याकाळी पाचच्या सुमारास इथे येऊन धडकेल. पाहू तरी ताशी १०० किमी वेगाचे वारे कसे वाहतात ते. कॅम्पसबाहेर सुटी जाहीर झाली असली तरी आत मात्र कामकाज चालू आहे. आमचे आजचे तीनही क्लासेस सकाळी झाले. त्यामुळे आता आम्ही आमच्या रूमवर आहोत. दुपारच्या सेशनमधले क्लासेस त्यांच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होत आहेत. खाली होस्टेल ग्राउंडवर क्रिकेटचा डाव रंगात आलाय. बरीच मंडळी आमच्याप्रमाणेच आपापल्या रूम्स मध्ये दडून बसलेली आहेत. आणि आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार वायरलेस ग्रुपची काही अति हौशी मंडळी समुद्र किनारी फिरायला गेली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा