जीवनाचं सार्थक कशात आहे? जे हवं ते मिळवण्यात कि उच्च कोटीच्या वैराग्यात? कशाचीही अभिलाषा नसणं हे परमोच्च मानसिकतेचं लक्षण म्हणून गौरवायचं कि माणसाच्या आळशीपणाशी त्याचा संबंध जोडून मोकळं व्हायचं? जन्मलो तेव्हा राग, लोभ, मोह, अभिलाषा, ध्येयं, स्वप्नं, महत्त्वाकांक्षा असं काहीच चिकटलेलं नव्हतं. मन अगदी कोरं करकरीत होतं. अगदी निर्लेप. पण मग जसजसा जगाशी संपर्क आला तसतशी ही भुतं मानगुटीवर बसत गेली. या ओझ्यानंच कित्येक जण शून्यात परतते झाले. जे राहिले ते त्या ओझ्याखाली दबले जात आहेत. या सर्वांहून मुक्त असा अवधूत होणं कुणाला जमलंय का आणि जमेल का? कि सगळेच ओझीवाहू हमाल?
कुठून आलोय कुठे जातोय काही माहिती नाही. तरीही चालतच जातोय. कारण तेच एक करण्याची मुभा आहे. थांबणं ते आता शेवटीच एकदा. कधी राना-वनांतून, पानाफुलांतून, कधी डोंगर-दऱ्यांतून, कधी लांबच लांब पसरलेल्या वाळवंटातून. चालणं एकच आपल्या भाळी. चालत चालत होता होईल तेवढं जागून समृद्ध व्हायचं. का म्हणून विचारणार कुणाला? 'तो' आहे असं आम्ही मानतो पण तो कुठे आहे हे कोण सांगणार? आणि असा लपून-छापून का असतो तो? त्याचं नेमकं स्वरूप कसं हे आम्ही कसं जाणायचं ? असे आजवर अनुत्तरीत राहिलेले असंख्यच असंख्य प्रश्न कधी कधी उद्विग्न करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा