ज्ञानेश्वरांची कुठलीही रचना, मग ती ज्ञानेश्वरी असो कि ओव्या असोत किंवा अमृतानुभव वा चांगदेवपासष्टी असो, सात्त्विक आनंददायी असते. तो आमोद वर्णावया शब्दही थिटे आणि आम्हीही थिटे. किंबहुना त्या आनंदा वर्णावया शब्दांची गरजच उरत नाही. सारे शब्दांच्या अतीत. केवळ अनुभवच. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर इंद्रियेही नेणती असा अनुभव.
हे शब्देवीन संवादिजे | इंद्रिय नेणता भोगिजे |
बोलाआधि झोंबिजे | प्रमेयासी ||
जैसे भ्रमर परागु नेती | परी कमळदळे नेणती |
तैसी परी आहे सेविती | ग्रंथी इये ||
या गीतेचे वर्णन करणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या त्यांच्या स्वतःच्याच प्रत्येक साहित्यकृतीला तितक्याच लागू होतात.
त्यांच्या साहित्याब्धीमध्ये डुंबताना आपल्या आचार-विचारांचीही उंची किंचित वाढल्याचा आभास होतो. कारण आपला क्षुद्रपणा आपल्या ध्यानी यायला लागतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा