पृष्ठे

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

अशाच एका अवघड वळणावर...

वर्ष २००८. नोव्हेंबर महिन्यातली एक थंड सकाळ. आठ-साडेआठचा सुमार. मी वारजे नाक्याच्या बस स्थानकावर बसची वाट पाहत उभा होतो. डेस्टीनेशन होतं कर्वे पुतळा. तिथे एका कंपनीत मला VLSI design engineer म्हणून जॉब मिळाला होता आणि आज दुसराच दिवस होता. पण मागच्या काही दिवसांच्या घडामोडी पाहता त्या फडतूस कंपनीत काम करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. म्हणजे अगदी एक क्षणही नाही आणि तो जॉब सोडायचाच विचार करत होतो मी. पण हा निर्णय घेणं फार अवघड जात होतं. कारण तो जॉब सोडल्यानंतर माझ्या हाती काहीच राहणार नव्हतं, मी बेकारांच्या गर्दीत सामील होणार होतो -किती दिवसांकरता ते माहिती नाही. याच जॉब साठी मी TCS च्या ऑफरवर पाणी सोडलं होतं. आणि आता हेही सोडणार म्हटल्यावर मला सगळे वेड्यातच काढणार अशी भीतीही होती. आई-अण्णा काय म्हणतील? मित्र काय म्हणतील? लोक काय म्हणतील? आणि मुख्य म्हणजे हा जॉब सोडून पुढे काय? विचारांचं वादळ माजलं होतं डोक्यात. या विचारांच्या दरम्यान किती बसेस निघून गेल्या कुणास ठाऊक? मग मला आई-अण्णांची खूप आठवण यायला लागली. सरळ जाऊन आईच्या मांडीवर डोकं ठेऊन मनसोक्त रडून घ्यावसं वाटायला लागलं. पण कधी कधी नियती आपल्याला आपल्या दुःखात डुंबायलाही पुरेसा वेळ देत नाही. सकाळचं ते कोवळं उन, तरुणाईनं गजबजलेला तो bus stop , ते पुणेरी वातावरण यांपैकी कोणतीच गोष्ट मनाला समाधान देऊ शकत नव्हती. मनात विचारच विचार अगदी उतू जात होते. मग मी घरी कॉल केला. सगळी परिस्थिती अण्णाजवळ वर्णन केली. आणि अहो आश्चर्यम! अण्णांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला हवा तो निर्णय घेण्याची परवानगी दिली. मला ही अपेक्षाच नव्हती. आता मला खूप बरं वाटलं.  आता आभाळ अगदी स्वच्छ होतं. ढग कुठल्या कुठे विरून गेले होते. सूर्य अगदी तेजाने तळपत होता. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे ही जाणीवच खूप महत्त्वाची असते. अवघड प्रसंगात नुसते सल्ले देणारे खूप असतात पण तेव्हा 'पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ' म्हणणारे हवे असतात, आपला निर्णय चूक कि बरोबर हे विश्लेषण करीत बसण्यापेक्षा आपल्या पाठीशी राहणारे हवे असतात. आणि ते जर आपले आई वडील असतील तर कसल्याही संकटाला अगदी निर्भयपणे तोंड देण्याचं सामर्थ्य अंगी येतं. 

जॉब सोडायचा निर्णय तर झाला होता. आता कंपनीत जायचं नव्हतं. मग जाणार कुठे? कसल्याच ध्येयाशिवाय मी बसमध्ये चढलो. कर्वे पुतळ्याजवळ उतरलो. कशासाठी? काही माहिती नाही. उतरून काय करावं, कुठे जावं काही काळात नव्हतं. इथेही नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ होती. सकाळची वेळ असल्याने ऑफिसला जाणारे लोक , शाळेत जाणारी मुले-मुली यांची धावपळ चाललेली. त्याच गर्दीत IT वालेही गळ्यात कंपनीचे पट्टे बांधून ऐटीत मिरवत होते. मी त्या गर्दीचा भाग होतोही आणि म्हटलं तर मुळीच नव्हतो.  आता माझ्याकडे वेळच वेळ होता. माझ्या सर्वच क्षणांवर फक्त आणि फक्त माझाच अधिकार होता. मी कर्वे पुतळ्यापासून दशभुजा गणपती मंदिराकडे निघालो. पायीच! ध्येयहीन, भरकटलेल्या नावेसारखा मी. जॉबलेस झाल्याचं दुःख होतं. पण आनंद याचा होता कि मी मला हवं ते केलं होतं. जीवन घेईल ते वळण नाकारून मला हवं त्या मार्गाने जाण्यासाठी मी बंड केलं होतं. रात्रीपासून असलेलं दडपण नाहीसं झालं होतं. 
सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. मी चालत होतो. डोक्यात विचारही चालत होते. भूतकाळातल्या बऱ्याच आठवणी अधून मधून तरळत होत्या. भविष्याची चिंता अधून मधून डोकावत होती. एकंदरीतच 'ये महफिल ये दुनिया मेरे काम कि नही ' अशी धारणा झाली होती. एखादा निर्णय घेतल्यानंतरही त्या निर्णयाच्या चूक-बरोबरपणाविषयीची शंका काही आपली पाठ सोडत नाही. तसंच माझं होत होतं. अधून मधून आपण हे चूक करतो आहोत असं वाटायचं. कारण मागेही काही चुकीचे निर्णय घेतले होते. हा निर्णय चुकणार तर नाही ना असं वाटत होतं. पण तो निर्णय अगदी योग्यच होता कारण मला आयुष्यात तडजोड मान्य नव्हती.  

विचारांच्या तंद्रीत चालत चालतच मी दशभुजा गणेश मंदिराजवळ केव्हा पोचलो याचा पायांना पत्ताही लागला नाही. मग मंदिरात गेलो. हात जोडून गणरायाला म्हणालो तू हे जे काही भोग दिलेस त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. आयुष्यात आता समोर फार बिकट काळ दिसत आहे. त्याला तोंड देण्यासाठी सामर्थ्य दे. तूच अशी बुद्धी दिलीस आता आयुष्याला भिडण्याची शक्तीही तूच दे. आणि मग ते मंदिरातलं प्रसन्न वातावरण, उदबत्त्यांचा मंद दरवळ, घंटांचा मधूनच उठणारा अनाहत नाद यांच्या "अमृततुल्य" संयोगाचा उपभोग घेत बराच वेळ मी तिथे बसून होतो.  किती वेळ   माहिती नाही...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा