पृष्ठे

मंगळवार, २१ जुलै, २०१५

व्यक्तिवाद आणि राष्ट्रवाद

आपले विचार आपल्या अनुभवातूनच येतात तरीही त्यांना मूर्त होण्यासाठी काहीतरी निमित्त हवं असतं. जसं अग्नी प्रज्वलित होण्यासाठी एक ठिणगी हवी असते तसं. लोकमान्य चित्रपट पाहतोय आत्ता. लोकमान्यांचा काळच वेगळा होता का हो? लोक देशभक्तीने अगदी भारावून गेलेले होते. इतके की देशासाठी अगदी प्राणही ओवाळून टाकायला तयार होते. सगळे नसतीलही कदाचित, पण निदान असे लोक होते. आम्हीही इतिहास शिकताना अगदी देशभक्तीने भारावून गेलोल होतो. जो काही थोडासा इतिहास आमच्या अल्पमतीला समजला त्यावरून देशासाठी मरायची नाही पण निदान थोडासा स्वार्थ त्याग करायची आमची मानसिकता तयार झाली आहे. देशभक्ती आमच्या लेखी एक उदात्त भावना आहे. आम्हांला वाटत असे की सगळेच देशभक्तीला उदात्त समजत असतील. पण ते तसं नाही. विशेषतः सोशल मिडियाच्या कृपेने बऱ्याच जणांचे विचार कळले आणि काही जण तर देशभक्तीलासुद्धा जेव्हा संकुचित ठरवतात हे पाहून वाटतं की आपल्या स्वातंत्र्यासाठी अगदी प्राचीन काळापासून जे लढले आणि हुतात्मे झाले त्यांचं काय? ते संकुचित होते म्हणून बळी गेले? की वेडे होते म्हणून? विचार स्वातंत्र्य जरूर असावं त्यात दुमत नाहीच. आपण व्यक्तिवाद (individualism) आणि राष्ट्रवाद (nationalism किंवा patriotism) यांचा समतोल साधायला हवा. जसा राष्ट्रवादाचा अतिरेक होता कामा नये तसाच किंबहुना त्याहून जास्त म्हणजे व्यक्तिवादाचा अतिरेक होता कामा नये. व्यक्ती आणि राष्ट्र एकमेकांना पूरक असावीत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा