पृष्ठे

मंगळवार, ३ मार्च, २०१५

स्वयंभू



शब्दांच्याही पार पलीकडे एक जग असतं… अनुभूतीचं… निःशब्द… शांत… धीरगंभीर असं. विचारांचं वादळ जेव्हा मंदावत जातं तेव्हा मनाच्या तळ्यात एक निरव शांतता पसरत जाते… सगळं स्तब्ध होत जातं… स्वप्नं, आकांक्षा, कल्पना, इच्छा, हव्यास, सुख-दुःखं यांचा सगळा गाळ खोल तळाशी जाऊन बसतो आणि एव्हाना धूसर दिसणाऱ्या कित्येक गोष्टी स्पष्ट दिसू लागतात… खिडकीच्या काचा पुसल्यावर बाहेरचं जग दिसावं तेवढ्या आणि तशा. त्या तळ्याच्या काठावर आठवणींचा भला मोठा पिंपळवृक्ष उभा असतो. क्वचितच त्याचं एखादं पान पाण्यावर अगदी अलगद उतरतं. हळुवारपणे ते पाण्यावर तरंगायला लागतं आणि मग केव्हातरी तेही तळाशी जाऊन स्थिरावतं. सगळी इंद्रिये पार थकून तळ्याकाठी विसावा घेत असतात. कुणीच काही बोलत नाही. सगळे आपापलं अस्तित्व अनुभवत असतात. तशात एक सत्य प्रकर्षानं जाणवतं ते हे की आपण उगाच आपल्या अस्तित्वाचा डांगोरा पिटत असतो… अनुभूतीचा टेंभा मिरवत असतो… कल्पनांचे पिसारे फुलवत असतो… सुखाचं प्रदर्शन मांडत असतो… दुःखाचा ढोल वाजवत असतो… या सगळ्यांशिवाय आणि या सगळ्यांच्या पलीकडे अस्तित्व असतं आणि ते नितांत सुंदर असतं, हळुवार असतं, सुखद असतं, आनंदघन असतं आणि मुख्य म्हणजे स्वयंभू असतं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा