पृष्ठे

शनिवार, १३ मे, २०१७

नदीकिनारी

एक धीरगंभीर अशी सायंकाळ. दिवसभराच्या दगदगीनंतर जरा थकूनच नदीकिनारी एकांतात बसलेला मी... निःशब्दसा. शब्दांचं कसलंच अवडंबर नाही. समोर मावळतीला लागलेला लालसर सूर्य. त्याने निळसर आकाशात केलेली तांबूस पिवळसर रंगांची उधळण. सगळ्या चाराचाराला हळूच आपल्या कवेत घेत जाणारा काळोख. संथ वाहणारा वारा, अगदी मंद मंद आणि हलकासा. दूर मंदिरातून उमटणारा मंजुळ घंटानाद. कपाळी लावलेल्या चंदनाचा हलकेच दरवळणारा सुगंध. पाण्यात अधून मधून होणारी माशांची सळसळ. दूरवर टिमटिमणाऱ्या दिव्यांच्या रांगा. आकाशात हलकेच डोकावणारी चंद्रकोर. परतीच्या वाटेवर असलेले पाखरांचे थवे. वातावरणात जाणवणारा थोडासा उकाडा आणि थोडासा दमटपणा. त्या किनाऱ्यावर दिसणारी झाडाझुडुपांची हिरवट काळसर रांग. काय असेल त्यांच्या पलीकडे? तिकडून सगळं कसं  दिसत असेल? जीवन किती वेगळं आहे प्रत्येकासाठी! दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. आपल्याला जग जसं दिसतं तसं कदाचित ते इतरांना दिसतही नसेल. बाहेरचं जग म्हणजे तरी दुसरं काय आहे? आपल्या मानाचं प्रतिबिंबच, नाही का? सुख दुःखही शेवटी मनाचाच खेळ. मनासारखं झालं तर सुख नाही तर दुःख. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा