मुलगा: तुमच्या या साठ-पासष्ट वर्षांच्या आयुष्यात तुम्हांला देव वगैरे नसतं हे अजून कसं रिअलाईझ नाही झालं?
वडील: देव नाही ही फार टोकाची आणि उतावीळ भूमिका झाली. पण ठीक आहे. ते तुझं सध्याचं मत आहे. मतं बदलू शकतात. असो... आणि देव नाही हे रिअलाईझ झालं म्हणण्यापेक्षा तसं वाटलं मला कैक वेळेस असं मी म्हणेल. पण आपल्या जाणिवांचा आवाका किती? आणि अजून म्हणजे असा विचार करणारी तुमचीच पिढी काही पहिली नाही. आम्हीसुद्धा जमेल तेवढा विद्रोह केलाय प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध, रूढी-परंपरांविरुद्ध. आपापल्या कुवतीनुसार सगळेच तसं करत असतात. एका पिढीच्या श्रद्धांचं आणि समजुतींचं ओझं पुढच्या पिढ्यांना नेहमीच होत असतं. पण आयुष्य हे असं बंडखोरी करून नाही चालत हे काही काळानंतर कळायला लागतं. आयुष्याचा गाडा चालण्यासाठी पाय कुठेतरी टेकावे लागतात. मनाला एक आधार लागतो. प्रत्येक जीवाला आणि विशेषतः माणसाला निसर्गतःच शाश्वताची ओढ असते आणि ती आपल्या श्रद्धांमध्ये रूपांतरित होत असते. देव आहे कि नाही यापेक्षा मला तो हवाय इतकंच मी जाणतो. आपल्या जाणीवे-नेणिवेच्याही पलीकडे एक शक्ती आहे हा विश्वास मला जगण्याचं बळ देतो. जीवन म्हणजे काही अराजक नाही किंबहुना ते नसावं असं मला वाटतं आणि त्यासाठी श्रद्धेचा आधार लागतो. जेव्हा अंगातलं त्राण कमी होत जातं तेव्हा ही श्रद्धाच आशेचा किरण असते. आता तू तरुण आहेस. आपल्यासमोर अफाट आयुष्य पडलंय असं तुला वाटत असेल. पण एकदा हि जीवनाची गाडी उताराला लागली की अस्तित्वाचं ते टोक दिसायला लागतं आणि ते फार दूर नाही हे लक्षात घे. ते एकदा नजरेच्या टप्प्यात आलं की सगळंच गौण ठरतं. फक्त उरते ती श्रद्धा. आंधळी असेल कदाचित पण म्हणून ती वाईट असं मुळीच नाही. कशावर विश्वास ठेवायचा कशावर नाही हे तुझं तू ठरव. पण जगण्याची उर्मी कमी होऊ नये एवढं पहा म्हणजे झालं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा