हा लांबच लांब डांबरी काळसर रस्ता, दूरपर्यंत कुठेच वळण नसलेला. सरळ त्या डोंगराच्या कुशीत शिरणारा. हा कोसळणारा पाऊस आणि त्यात चिंब भिजणारं शिवार. रस्त्यावर पाणी पडून त्यात पुसटसं हिरव्या पेन्सिलने रेखाटल्यासारखं दिसणारं झाडांचं प्रतिबिंब. रस्त्याच्या दुतर्फा झाडांवर आणि रानांमध्ये झालेली हिरव्या-पिवळ्या रंगाची उधळण. दूर डोंगरावर हळूच उतरत असलेले ढग आणि त्या ढगांत धुसर होत जाणारं डोंगरावरचं ते महादेवाचं देऊळ आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी निपचित पडलेला गाव. हे सगळं मी कित्येक वर्षे इथे कड्यावर उभा राहून पाहतोय. अगणित तपं उलटली मला इथे उभं राहून. तुम्हां माणसांच्या कित्येक पिढ्या माझ्या समोर जन्मल्या नि काळाच्या पडद्याआड गेल्या. माझ्या बरोबरीने, किंबहुना माझ्याही आधीपासून, तिथे उभे आहेत ते म्हणजे तो समोरचा निळसर डोंगर आणि त्यावरचं भगवी पताका पेलणारं ते देऊळ आणि त्या देवळातला तो देव. बाकी सगळे काळसर्पाने गिळून घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा