आमच्यासारखे लोक लवकर उद्विग्न होतात, दुःखी होतात, खिन्न होतात, भावूक होतात, भारावून जातात आणि आनंदीही होतात. याचा अर्थ आम्हांला स्थितप्रज्ञता कळलेली नसते असं नव्हे. आम्ही केवळ मनात उठणाऱ्या तरंगांना प्रतिसाद देत असतो एवढाच काय तो फरक. कधी उदास वाटत असेल किंवा अत्यानंद वाटत असेल तर तो अख्खा दिवस आम्ही त्याच मूडमध्ये राहतो. व्यवहार आम्हांलाही तेवढाच कळतो जेवढा स्वतःला व्यवहारी म्हणून टेंभा मिरवणाऱ्यांना कळतो. फक्त भावनांच्या आवेगाला थोपवून धरणं आम्हांला जरा अवघड जातं आणि आमची तशी इच्छाही नसते. आम्ही त्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो आणि वाहत जातो. आणि तसं वाहताना कसलाच व्यवहारीपणा आम्हांला स्पर्श करत नाही. आम्ही अगदी तिथे असतो जिथे मन असतं. उगाच बुद्धीच्या मागे फरफटत जायला आम्हांला जमत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा