पृष्ठे

रविवार, ६ जुलै, २०१४

भय इथले संपत नाही



मी अजून अर्धंच अंतर पार केलेलं होतं. तसा मला निघायला उशीरच झाला होता. आता दिवस मावळतीकडे चालला होता आणि मला अजून बरंच अंतर जायचं होतं. साधारण एक दीड तास तरी लागणार होता इथून गावात पोहचायला. आणि गावात जायला या वेळी काही वाहन भेटणार नाही याची कल्पना होती. पायी चालत जायचं असा निश्चय करूनच आलो होतो. निदान सायकल आणायला हवी होती असं आता वाटत होतं. जसा सूर्य क्षितिजाआड जायला लागला तशी हिरवी झाडं काळी व्हायला लागली. त्या झाडांच्या भल्या भयानक लांब सावल्या भयावह वाटायला लागल्या. रेल्वेपटरीच्या जवळच्या वळणावर आलो तेव्हा सगळीकडे अंधारलं होतं. त्या वळणावरची निलगिरीची झाडं भयंकर दिसत होती. पूर्ण रस्ताच सुनसान. माणसाचा दूरदूरपर्यंत कुठेच मागमूस नव्हता. दिवसा डोळ्यांना सुखावणारी दोन्ही बाजूंची हिरवी शेतं आता काळीकुट्ट दिसत होती. रातकिड्यांचा आवाज सतत background music सारखा चालू होता. एक मिनिटसुद्धा मोठा वाटत होता. पूर्वी कधीतरी ऐकलेल्या भूत प्रेताच्या गोष्टी मनात थैमान घालत होत्या. हृदयाचे ठोके भयंकर वाढले होते. आकाशात चंद्रकोरसुद्धा ढगांआड गेली असल्याने काळोख अजूनच गहिरा दिसत होता. माझी पंचेंद्रिये एकदम अलर्ट झाली होती. सतत कुणीतरी माझा पाठलाग करतंय असं अधून मधून वाटत होतं आणि अंगावर सर्रकन काटा येत होता. पण मी फक्त पुढे पाहून चालत होतो कारण मागे पहायची हिंमतच होत नव्हती. मागेच काय आजूबाजूलासुद्धा पहायची हिंमत होत नव्हती. मनात हनुमान चालीसा म्हणत होतो. तरीही भीती वाटत होती. भितीपुढे श्रद्धा कमकुवत पडते का ? की आपली श्राद्धाच मुळात कमकुवत असते? एखादं कुत्रं जरी जवळून गेलं तरी मला बरं वाटत होतं. या क्षणी चोर-दरोडेखोरांनी आडवलं असतं तरीही मला आनंदच झाला असता. आता फक्त आणि फक्त गाव जवळ करायचा होता. या मृत काळ्याकुट्ट शांततेपासून दूर जायचं होतं. मनातले विचार काही थांबायला तयार नव्हते. आजूबाजूची सळसळसुद्धा काळजाचं पाणी करून जात होती. किती अंतर पार केलं याचा काही हिशेब नव्हता. मग थोड्याच वेळात दूर अंतरावर लुकलुकते दिवे दिसले आणि गाव जवळ आल्याचं वाटून थोडं बरं वाटलं. मग गावाच्या शिवारात आल्यावर एखाद दुसरा माणूस भेटत होता. आता फार बरं वाटत होतं. काही वेळातच तो गडद अंधार आणि तो गडद प्रहर भेदून मी शेवटी गावात पोहचलो आणि एका भयंकर काळ्या प्रवासाचा अंत झाला. भीती आपल्या मनातच असते पण तरीही आपल्या मनाचा ताबा घेते. भीतीच्या पोटी तर्कबुद्धीला थाराच नसतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा