जसजशी रात्र चढत जाते डोक्यातले विचार कमी होत जातात आणि शेवटी कुठल्या तरी एका विचाराभोवती अस्तित्व फिरत राहतं. तो एकच एक विचार भारावून टाकतो. काहीतरी गवसल्याचा साक्षात्कार होतो. आयुष्याला दिशा मिळाल्याचा साक्षात्कार होतो. मग त्या विचाराने भारावून झोपेच्या स्वाधीन होतो. केव्हा झोप लागते कळतही नाही . स्वप्नांमध्ये त्या विचाराचा लवलेशही नसतो आणि सकाळ होईपर्यंत तर झोपेच्या तळी तो विचारच गाडला जातो. आणि मग सकाळी एवढंच आठवतं की एका विचाराने आपण रात्री भारावून गेलो होतो आणि प्रश्न पडतो की का? तो विचार इतका उदात्त होता की ती रात्र इतकी गहिरी होती? नेहमीप्रमाणे उत्तर मिळत नाहीच. आयुष्याला अशा विचारांतून कित्येक दिशा गवसल्या आहेत आणि कित्येक मार्ग सापडले आहेत. काही मार्ग क्रमिले आणि काही वळणे मागेच सोडावी लागली. सगळ्याच वाटा काही आपल्यासाठी नसतात. त्या फक्त तिथे असतात, कधीतरी एखादा पर्याय म्हणून. बाकी आपले राजमार्ग आपण ओळखायचे असतात. किंबहुना आपण ज्या मार्गावर चालतोय तोच आपला राजमार्ग म्हणायचा असतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा