कोव्हीड-१९ च्या प्रसाराने सगळ्या जगाला स्तब्ध केले आहे. जीवित हानी तर झालीच पण भरून येण्यास कित्येक वर्षे लागतील असे आर्थिक नुकसानही झाले आहे आणि अजून होत आहे. पण यानिमित्ताने आपणाला कित्येक धडेही मिळाले ज्यांच्यावर आपल्या देशाची आणि इतरही देशांची पुढची वाटचाल अवलंबून असणार आहे. आपल्या प्रायॉरिटीज पुन्हा डिफाइन करण्याची वेळ आली आहे. उदाहरणार्थ, व्यक्तिस्वातंत्र्याचा बालेकिल्ला असलेल्या युरोपमध्ये आज व्यक्तिस्वातंत्र्य धाब्यावर बसवण्याची वेळ आलेली आहे आणि तिथे कलेक्टिव्ह वेल्फेअरला जास्त महत्त्वं प्राप्त झालेलं आपण पाहत आहोत. मुद्दा केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचाच आहे असं नाही किंवा व्यक्तिस्वातंत्र्य वाईट आहे असंही नाही तर मागची काही वर्षे विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जी मूल्ये, जी तत्त्वे कित्येक देशांनी आपापल्या समाजात रुजवली होती जी वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित झाली होती त्याचा पायाच मुळापासून हादरून गेला आहे. ग्लोबलायझेशन जितकं गोंडस आणि आकर्षक दिसतं तितकंच ते भयावहसुद्धा आहे याची जाणीव झाली आहे. कोणत्याही देशाने आरोग्य, संरक्षण, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान अशा बाबतीत स्वयंपूर्ण होणं किती आवश्यक आहे हेही अधोरेखित झालं आहे आणि होत आहे. एक माणूस म्हणूनच नव्हे तर एक समाज आणि एक देश म्हणून सवर्वांवरच आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा