तुम्हांला वाटतं का की आपण आदर्शवादाच्या फारच आहारी गेलो आहोत? संस्कृती, परंपरा, धर्म वगैरेंच्या नावाखाली खोट्या समजुतींना घट्ट धरून बसलो आहोत? आम्हांला प्रत्येक पुरुष हा मर्यादापुरुषोत्तम राम आणि प्रत्येक स्त्री ही सीता असावी असं वाटतं. आम्हांला अगदी आदर्श नागरिक हवे असतात. लहानपणापासून प्रत्येकानेच कसं आदर्श असलं पाहिजे याचे पाठ पढवले जातात. घरी दारी शाळेत अगदी सगळीकडेच. कुणी एखादा चुकला कि राईचा पर्वत करून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण केला जातो. मग लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच या खोट्या आदर्शवादाच्या भोवऱ्यात सापडून वाहत जातात. ते कधी वर येतच नाहीत. हा आदर्शवाद पिढ्यानपिढ्या तसाच पुढे पसरत जातो. आम्ही आमच्या महापुरुषांमध्येही देवाचा अंश शोधत बसतो. त्यामुळे त्यांचं माणूस असणंच नाकारतो आणि मग त्यांच्या चुकाही साहजिकच नाकारतो. किंबहुना त्यांना चुका करण्याची मुभाच देत नाही. पण माणसाला देव करण्यापेक्षा त्याला माणूस म्हणून त्याच्या चुकांसाहित स्वीकारायला आपला समाज कधी शिकणार? 'आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही' असं सांगताना कित्येक आई वडिलांची छाती अभिमानाने फुलून येते पण त्या मुलाच्या इच्छेचं काय? त्याच्या स्वप्नांचं काय? इथे मतभेद असण्याची शक्यताच मुळी नाकारली जाते. अशा सतत आदर्शांच्या दडपणात जागणाऱ्या समाजात कोण कसं सुखी होणार?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा