सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास मला जाग आली तेव्हा ट्राव्हाल्स बँगलोरपासून सुमारे सत्तर किलोमीटरच्या आसपास होती. हैदराबाद बँगलोर असा प्रवास पहिल्यांदाच करत होतो आणि तेही ट्राव्हाल्सने. शेजारच्या सीटवर कुणीच नव्हतं. म्हणून मस्त ऐसपैस मांडी घालून हवं त्या पोजमध्ये झोपलो. पण रात्रभर थंड वाऱ्याने झोप काही लागू दिली नाही आणि त्यात माझी विंडो सीट आणि खिडकी पूर्ण बंद होईल तर शपथ. कुठल्यातरी फटीतून गार हवा येत होती आणि ती कुठून येत होती हे मात्र उलगडत नव्हतं. पहाटे पहाटे जरा डोळा लागला होता. पण कुणा एका गाढवाने खिडकी उघडली आणि परत थंड वाऱ्याचा फटकारा. (ही असली गाढवं जगात भरपूर संख्येने आढळतात.) मग उठावं लागलं. असंही सकाळ झाली होती. उठल्यावर बाहेर पाहतोय तर आभाळ भरून आलेलं, रात्री चांगलाच शिडकावा झालेला दिसत होता. गाडी सुसाट वेगाने धावत होती आणि आता वाराही मस्त वाटत होता. बाहेर नुसते दगडच दगड दिसत होते. लाल माती आणि छोटे मोठे दगड. अधून मधून हे भले मोठे अजस्त्र दगडी डोंगर. एक गाव तर डोंगराच्या कुशीत वसलेला अन वर टेकडीवर भले मोठे दगड. एवढे कि त्यांच्यापैकी एक जरी दगड घरंगळत खाली आला म्हणजे गाव जमीनदोस्तच. अधून मधून पावसाच्या सरी यायच्या. डोंगरांना बिलगून असलेले ढग नजरेस पडायचे. डोंगरांची टोकं ढगांच्या आड गायब झालेली असायची. मग थोड्याच वेळात ट्राफिक वाढायला लागली. गाडी बँगलोरमध्ये आली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा