मुळात आशावादी असणं हा माणसाचा स्वभाव आहे. कितीही मोठं अपयश आलं तरीही शेवटी त्याला पुरून उरण्याची आशा आपल्या मनात कुठेतरी खोल रुजलेली असते. अपयशाने काही काळ आपण खचून जातो हे नक्की पण मग जेव्हा नॉर्मल होतो तेव्हा मनातल्या आशेला धुमारे फुटू लागतात आणि ते आपल्याला उठून उभं राहण्याची, लढण्याची, स्वप्नं बघण्याची नवी उमेद देतात. मी तर म्हणतो माणसानं नेहमी स्वप्नं पहावीत. मोठी मोठी. भलेही ती पूर्ण होवोत अगर न होवोत. त्या स्वप्नांच्या शोधात जगावं. यशापयशाची चिंता न करता मनमुरादपणे झोकून द्यावं स्वतःला. आयुष्याला आव्हान द्यावं. पण त्याचबरोबर जे समोर येईल त्याला तोंड देण्याची तयारीही असावी. शेवटी काय तर मनासारखं जगण्याचं समाधान हवं. कुणी काहीही म्हणो आपण केलं ना आपल्याला हवं ते, मग झालं. मग आपल्याला काय मिळालं, आपण काय गमावलं हे सगळं गौण. मुळात स्वप्नं पूर्ण करण्यापेक्षाही त्यांच्या पूर्ततेसाठी झगडणं हेच तर आयुष्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा