पृष्ठे

बुधवार, २ जानेवारी, २०१३

एकाकी

कधी कधी अतिशय कठोर वाटणारं मन एखाद्या संध्याकाळी उगाच हळवं होऊन जातं...काहीही कारण नसताना. ते तसं बराच वेळ राहतं. काहीतरी चुकतंय असं उगाच मला सांगू पाहतं. त्याला केवळ शब्दच समजावू शकतात. मग मी त्याला वर्तमानापासून दूर शब्दांच्या, आठवांच्या  दुनियेत घेऊन जातो, काही कविता ऐकवतो, जुन्या आठवणी स्मरतो. मग आम्ही तिकडे बराच वेळ रमून जातो. परतावंसंच वाटत नाही. पण कर्तव्य या गोंडस नावाच्या घाण्याला जुंपलो गेलोय, त्याचा दोर मला सप्तपाताळातूनही खेचून परत आणतो. इथून मनाची सुटका नाही. मनाला बंदिवासात टाकून पुन्हा रहाटगाड्याला बांधला जातो. त्या बंदिशाळेत मन बिचारं एकाकी, पोरकं...घुसमटत राहतं. कधी कधी ते बंडसुद्धा करू पाहतं पण ते बंड चिरडून टाकलं जातं...त्याचा नाईलाज होतो आणि माझासुद्धा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा