बऱ्याच दीडशहाण्यांनी अतिशय उतावीळपणे आपण किती पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी डॉ. मेधा खोले यांच्याबद्दल आपापली मते मांडली आहेत. खोले बाई कशा चुकल्या हे सिद्ध करायची चढाओढ सोशल मीडियावर चालू होती मागच्या काही दिवसांत. त्या चूक की बरोबर हे लिहिणं हा हेतूच नाही माझा. मला इथं एवढंच म्हणायचंय की एखाद्याचं वैयक्तिक आयुष्य असं चव्हाट्यावर आणणं हे अतिशय चुकीचं आहे. भारतात विविध पोलीस स्टेशन्समध्ये दररोज लाखो तक्रारी दाखल होत असतील. त्या कधी अशा चव्हाट्यावर येत नाहीत आणि येऊही नयेत. आज जे खोले बाईसोबत होतंय ते उद्या तुमच्या आमच्या सोबत होऊ शकतं. कारण काहीही असू शकतं. उद्या तुमचं नाव असं नको त्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चिलं जाऊ लागलं तर काय वाटेल तुम्हाला? कुणाकुणाला स्पष्टीकरण देत बसणार? आणि कोण ऐकणार तुमचं? इथे लोकांची मते आधीच तयार असतात. What about right to privacy ? हे अतिशय भयानक आहे. सोशल मीडियावर बहुतेक गिधाडं टपलेली असतात. तुमच्या प्राव्हसीचे लचके तोडायला. तुम्ही आम्हीसुद्धा बहुतेक वेळा जाणतेअजाणतेपणे त्या गिधाडांपैकी एक असतो. हे थांबायला हवं. समाज म्हणून आपल्यात प्रगल्भता कधी येणार?
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७
शुक्रवार, २१ जुलै, २०१७
अलबेल
तसं सगळं अलबेल आहे
म्हटलं तर सगळं सेटल आहेतरीही एक हुरहूर आहे
काही एक राहून गेल्याची
आणि जराशी खंतही आहे
क्षण काहीसे वाहून गेल्याची
बाकी सगळं अलबेल आहे
जवळपास सगळं सेटल आहे
रविवार, २ जुलै, २०१७
शनिवार, १ जुलै, २०१७
माणूस म्हटलं की चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही आलंच. गुणावगुण हे मानवी स्वभावाचे भागच असतात. पण जेव्हा एखाद्याच्या मनाचा ठाव घ्यावा तेव्हा कळतं की प्रत्येकच माणूस हा स्वतःमध्ये अनुभूतींचं, त्यातून येणाऱ्या जाणिवांचं आणि संवेदनांचं एक अफाट, अमर्याद विश्व असतो. शब्दांत बांधता येणारच नाहीत एवढे अनुभव, भावना, विचार, मते, कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात. अभिव्यक्तीचं भाग्य प्रत्येकाला लाभतंच असं नाही. बऱ्याचजणांसोबत त्यांचं ते समृद्ध विश्वही काळाच्या पडद्याआड जातं हे आपलं- मानवजातीचं- दुर्भाग्यच म्हणावं लागेल.
शुक्रवार, ३० जून, २०१७
बुधवार, २१ जून, २०१७
एखाद्या शापित संध्याकाळी सगळंच अर्थशून्य वाटायला लागतं. सगळ्या दिशा अंधारात बुडायला लागतात. सगळी क्षितिजे झाकोळून जातात. सगळं आकाश काळवंडून जातं. सूर्य कायमचा अस्तंगत होऊन जातो आणि पुढे पसरते ती पहाटेचा किनारा नसलेली भयाण काळरात्र. मानासहित सगळी गात्रे थकून जातात. कसलंच त्राण उरात नाही. सगळा विरोध मावळून जातो आणि आपल्या हाती उरतं ते फक्त भरकटलेल्या नावेगत वाहत जाणं काळाच्या प्रवाहाबरोबर. पण एवढ्या अंधारातही कुठूनतरी आशेची एक इवलीशी तिरीप डोकावत असते मनाच्या खोल गाभाऱ्यात. ती कायम तिथेच असते आणि ती अविरत देत असते आपल्याला संघर्ष करण्याचं सामर्थ्य आणि लढत राहण्याची उमेद.
गुरुवार, १८ मे, २०१७
कर्तृत्व
कर्तृत्वाशिवाय माणूस काहीच नाही. जगात दोनच प्रकारचे लोक असतात - एक म्हणजे कर्तृत्ववान आणि दुसरे म्हणजे कर्तृत्वशून्य. आयुष्याचं सार्थक करायचं की ते व्यर्थ घालवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. जेव्हा आपण सोपा मार्ग निवडतो तेव्हा आपण आयुष्य व्यर्थ घालवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतो. काहीच न करणं फार सोपं असतं, प्रवाहाबरोबर वाहत जाणं त्याहून सोपं असतं. त्यात कसलाच पुरुषार्थ नाही. काहीतरी करण्याची निदान इच्छा असणं ही अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची पहिली पायरी पण फक्त तेवढं पुरेसं नाही. त्या इच्छेला कर्तृत्वाची जोड मिळाली तरच तिला काही अर्थ येतो. नुसतं जागून आपण काय वेगळं करतो? जगतात तर सगळेच.
बुधवार, १७ मे, २०१७
काळ
मावळत्या सूर्याबरोबर विरघळून जातात निर्धारांचे पर्वत, मावळून जातात आशेचे दीप, वितळून जातात संकल्पांचे ढीग आणि गळून जाते जिद्दीचे अवसान. उद्याचा सूर्य अडकून पडतो संशयाच्या भोवऱ्यात आणि एकेक क्षण करतो एकेक युग वजा आयुष्यातून आणि शेवटी जाऊन पडतो भूतकाळाच्या काळकोठडीत कधीही पुन्हा परतून न येण्यासाठी. हवा असलेला सूर्य युगानुयुगे उगवत नाही आणि नको असलेला सूर्य मात्र अस्त पावत नाही. रात्रीचंही तेच. कित्येक युगांपासून आपण तिथेच आहोत आणि तसेच. बदलत जातो तो फक्त काळ.
शनिवार, १३ मे, २०१७
नदीकिनारी
एक धीरगंभीर अशी सायंकाळ. दिवसभराच्या दगदगीनंतर जरा थकूनच नदीकिनारी एकांतात बसलेला मी... निःशब्दसा. शब्दांचं कसलंच अवडंबर नाही. समोर मावळतीला लागलेला लालसर सूर्य. त्याने निळसर आकाशात केलेली तांबूस पिवळसर रंगांची उधळण. सगळ्या चाराचाराला हळूच आपल्या कवेत घेत जाणारा काळोख. संथ वाहणारा वारा, अगदी मंद मंद आणि हलकासा. दूर मंदिरातून उमटणारा मंजुळ घंटानाद. कपाळी लावलेल्या चंदनाचा हलकेच दरवळणारा सुगंध. पाण्यात अधून मधून होणारी माशांची सळसळ. दूरवर टिमटिमणाऱ्या दिव्यांच्या रांगा. आकाशात हलकेच डोकावणारी चंद्रकोर. परतीच्या वाटेवर असलेले पाखरांचे थवे. वातावरणात जाणवणारा थोडासा उकाडा आणि थोडासा दमटपणा. त्या किनाऱ्यावर दिसणारी झाडाझुडुपांची हिरवट काळसर रांग. काय असेल त्यांच्या पलीकडे? तिकडून सगळं कसं दिसत असेल? जीवन किती वेगळं आहे प्रत्येकासाठी! दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. आपल्याला जग जसं दिसतं तसं कदाचित ते इतरांना दिसतही नसेल. बाहेरचं जग म्हणजे तरी दुसरं काय आहे? आपल्या मानाचं प्रतिबिंबच, नाही का? सुख दुःखही शेवटी मनाचाच खेळ. मनासारखं झालं तर सुख नाही तर दुःख.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)