'उद्या'च्या गर्भातून डोकावणाऱ्या आशेच्या सोनेरी किरणांच्या बळावर आपला 'आज' सुसह्य होत असतो. उद्याच्या उंबरठ्यावर गेल्यावरही तिथे अंधार पाहून थोडीशी निराशा होते. पण त्यालाही सोनेरी आशा उरी बाळगणारा 'उद्या' असतो. हे अविरत चालूच राहतं. कधीकधी तो सोनेरी क्षण हाती लागतोसुद्धा. पण ज्यासाठी हा आटापिटा केला होता त्याचं आयुष्य फक्त एका क्षणापुरतंच ही जाणीव मात्र उद्विग्न करते. मग त्या सोनेरी क्षणाचा आनंद अन विरह असा संमिश्र भावकल्लोळ. आणि तो किंवा तसा क्षण पुनः प्रकटावा यासाठी परत 'आज' 'उद्या'चा खेळ आणि मध्येच दही दिशांनी चालून येणारे काही काळेकुट्ट क्षण, त्या सोनेरी क्षणांपेक्षा कैक पटीने महाकाय. कधीकधी प्रश्न पडतो हेच का आयुष्य? त्या सुखाच्या, आनंदाच्या एका धाग्यासाठी दुःखाचे, विरहाचे,उद्वेगाचे शेकडो धागे गुंफून बनवलेलं जरतारी आयुष्याचं वस्त्र ल्यायचं? नियती देईल ते मुकाट पदरी पडून घेऊन आनंदी असल्याचं स्वतःलाच सांगायचं? का नाही बंड करायचं याविरुद्ध? आम्हांला सुखाचे शेकडो धागे असलेलं जीवनवस्त्र हवंय. किंमत बोला...!!!
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३
सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३
गर्दी
गर्दीचा मला भयंकर तिटकारा वाटतो. गर्दीत मिसळणारा प्रत्येकच जण आपला चेहरा, आपली ओळख, आपल्या भावना सर्व काही हरवून गर्दीत शिरतो आणि त्या यंत्रवत समूहाचा भाग होऊन जातो. भीतीचं एक वलय नेहमी आपल्या भोवती घेऊनच त्या गर्दीत वावरतो. गर्दीला दिशा नसते. भरकटलेल्या थव्यासारखी ती फक्त गतिमान असते. त्यातल्या प्रत्येक पाखराची दिशा वेगळी, दशा वेगळी ...प्रत्येक जण आपल्यापुरताच. माणुसकीचा ओलावा आटून गेलेला.
शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३
आपले पोलिस आणि सरकार यांना तहान लागल्याशिवाय विहीर खोदायची गरज वाटत नाही. जेव्हा कुठेतरी स्फोट होतो तेव्हाही हे एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याशिवाय दुसरं काहीही करत नाहीत. सरकार पोलिसांवर, पोलिस गुप्तचर यंत्रणेवर खापर फोडून जबाबदारी झटकू पाहतात. मग 'तपास चालू आहे', 'हे सहन केलं जाणार नाही', असल्या पोकळ गप्पा मारल्या जातात. त्यांच्यात काहीही तथ्य नसतं. इतके स्फोट झाले आजपर्यंत, तरीही यांचं दरवेळी बेसिकपासूनच सुरु होतं. आतापर्यंत एक predictive model नाही बनवता आलं यांना? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे शेंबड्या पोरालाही कळतं, मग का नाही पाकिस्तानचं नाक दाबत? या स्फोटाचा कट इस्लामाबादमध्ये शिजला हे उघड आहे. मग का पाकिस्तानशी असलेले संबंध नाही तोडत? पण नाही... इथे आपल्या मंत्रिमंडळात बरेच पाकधार्जिणे लोक बसलेत. आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही आणि हे पाकिस्तानातून कांदा आयात करतात आणि इथे आणून तो सडवतात.
इथे स्फोटात लोक जीवानिशी जातात पण यांना काय त्याचं? ए.सी.मध्ये बसलेल्या त्यांच्यापर्यंत स्फोटाची झळ आणि आवाज दोन्हीही कसं पोचणार? नुसता स्फोट झाल्या ठिकाणी दौरा केल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी वेळीच प्रतिबंधक उपाय करावे लागतात आणि हितसंबंधांच्याही पलीकडे जाऊन निर्णय घ्यावे लागतात. उगाच ए.सी.मध्ये खुर्चीवर बसून दहशतवादाला रंग देत बसलं कि आपल्या XXखाली बॉम्ब ठेवला तरी पत्ता लागत नाही आणि हे असले स्फोट होतात.
सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३
मानवाधिकाराचे मक्तेदार
पुन्हा एका फाशीच्या निमित्ताने मानवाधिकाराचा डंका वाजवणाऱ्यांना निमित्त मिळालंय. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने तर अफझल गुरूला दिलेली फाशी कशी चुकीची आणि अन्यायकारक आहे यावरून लेखांचा भडीमार केला आहे. मागे कासाबच्या फाशीच्या वेळीही काही मानवाधिकाराच्या मक्तेदारांना भरून आलं होतं. आणि आता अफझल गुरूसाठी ह्यांची एकच रडारड कि त्याला प्रतीवादाची पुरेशी संधी नाही देण्यात आली, त्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी वापरलेले पुरावे पुरेसे नव्हते, इत्यादी. यांच्या लेखी दहशतवादी तेवढेच मानव. त्यांच्यामुळे नाहक बळी गेलेल्यांच्या मानवाधिकाराचं काय? जेव्हा कसाबच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या शेकडो निरपराध्यांचे प्राण घेऊन जात होत्या तेव्हा त्यांचा काय दोष होता? त्यांच्यावरचे कुठले आरोप सिद्ध झाले होते? भारताच्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा तिथे ज्या सुरक्षारक्षक आणि जवान यांना हौतात्म्य आलं त्यांच्या जगण्याच्या मुलभुत अधिकाराचं काय? त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंग ओढवला त्याचं काय? जेव्हा इथे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात तेव्हा मानवाधिकाराच्या नवे ओरडणाऱ्या तथाकथित बुद्धीजीवींची दातखीळ बसते कि काय? काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मानवाधिकारांची चिंता करणाऱ्यांना भारतीय सेनादलातील जवानांचे बलिदान दिसत नाही का?
शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३
कुणी एक उठून दहशतवादाला भगवा रंग देतो आणि हिरव्याचा कैवारी असल्याचा
आव आणतो. कुणी दुसरा उठून आपल्या इतिहासात शिरतो आणि वाटेल तसा
गोंधळ घालतो. मग कुणी तिसरा उठून आमच्या श्रद्धा, आमची आराध्ये यांना
संकुचित ठरवू पाहतो. निकटच्याच काळात कदाचित या श्राद्धांनाही अंधश्रद्धा ठरवून
त्यांचंही निर्मुलन करण्याचा घाट एखाद्या तथाकथित 'पुरोगामी, उदारमतवादी,
धर्मनिरपेक्ष' व्यक्ती किंवा संघटनेने घातला तर नवल वाटायला नको. धर्मनिरपेक्षता
आणि धर्मविरोध यांच्यातला फरक न कळणारं किंवा तो कळूनही धर्माला
निवडणुकीतला एक्का बनवू इच्छिणारं नेतृत्व लाभल्यावर कसली अपेक्षा करणार?
बुधवार, ९ जानेवारी, २०१३
कोणतीही संस्कृती, धर्म, भाषा किंवा विचारसरणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जाते तेव्हा ती जशास तशी तिथल्या जनमानसात रुजावी हे शक्य नाही. तिच्यामध्ये त्या ठिकाणानुसार बदल होणारच किंबहुना झालेच पाहिजे. नाहीतर भारतातल्या कम्युनिस्ट पक्षासारखी गत होते. ते फक्त भारतात राहतात, भारतीयांसारखे दिसतात, भारतीय भाषा बोलतात म्हणून भारतीय अन्यथा ते चीन किंवा रशियाच्या डोक्याने विचार करणारेच आहेत. हे तत्त्व बऱ्याच गोष्टींना लागू होते. स्थलकालसापेक्षता नावाची एक गोष्ट असते हे काही महाभाग विसरतात. भारतात असलेल्या सगळ्याच धर्मांनासुद्धा स्थितीशीलता आलेली दिसते. प्राचीन भारताच्या वैभवाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण इथल्या तत्कालीन सर्वसमावेशक समाजव्यवस्थेला, राज्यव्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला विसरतो. आता आपले धर्म, समाज, राज्यव्यवस्था, प्रशासन सर्वांनाच एक प्रकारची मरगळ आली, त्यांमध्ये ताठरपणा आलाय हे दिसून येतं. मला वाटतं आपण नावाला स्वतंत्र आहोत बाकी आपल्या मनमनावर कसल्या ना कसल्या संकुचित विचारांचा, मतांचा प्रभाव आहेच. ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच नाही का?
बुधवार, २ जानेवारी, २०१३
एकाकी
कधी कधी अतिशय कठोर वाटणारं मन एखाद्या संध्याकाळी उगाच हळवं होऊन जातं...काहीही कारण नसताना. ते तसं बराच वेळ राहतं. काहीतरी चुकतंय असं उगाच मला सांगू पाहतं. त्याला केवळ शब्दच समजावू शकतात. मग मी त्याला वर्तमानापासून दूर शब्दांच्या, आठवांच्या दुनियेत घेऊन जातो, काही कविता ऐकवतो, जुन्या आठवणी स्मरतो. मग आम्ही तिकडे बराच वेळ रमून जातो. परतावंसंच वाटत नाही. पण कर्तव्य या गोंडस नावाच्या घाण्याला जुंपलो गेलोय, त्याचा दोर मला सप्तपाताळातूनही खेचून परत आणतो. इथून मनाची सुटका नाही. मनाला बंदिवासात टाकून पुन्हा रहाटगाड्याला बांधला जातो. त्या बंदिशाळेत मन बिचारं एकाकी, पोरकं...घुसमटत राहतं. कधी कधी ते बंडसुद्धा करू पाहतं पण ते बंड चिरडून टाकलं जातं...त्याचा नाईलाज होतो आणि माझासुद्धा.
सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
रोजच्यासारखीच तरीही एक नवी पहाट,
एक नवा दिवस, एक नवी सुरुवात,
नव्याची झळाळी लाभलेली जुनीच स्वप्नं,
जुन्या दुखण्याचं नव्यानं खूपणं,
ते सहण्यासाठी नव वर्षीचा नवा सूर्य,
नव्या क्षणांचं नवनिर्मित ऐश्वर्य.
सगळीकडेच नव्याचा दरवळ.
या नव्या नवलाईचे भोक्ते असलेल्या आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शनिवार, २९ डिसेंबर, २०१२
निर्जीव कोलाज
प्रत्येक राष्ट्राचा एक आत्मा असतो ज्याच्या बळावर ते राष्ट्र जिवंत असते. इस्राइल, अरेबिअन राष्ट्रे, युरोपिअन राष्ट्रे, चीन, जपान, अमेरिका, रशिया अशी किती तरी उदाहरणे देता येतील. या राष्ट्रांकडे बघितल्यावर एक लक्षात येतं कि काहीतरी गोष्ट त्यांच्यामध्ये आहे जी तिथल्या लोकांना एकजूट व्हायला भाग पाडते. ती गोष्ट इतिहास असेल, भाषा असेल, कायद्याचे भय असेल किंवा इतर काही असेल. राष्ट्रवाद हा तिथल्या लोकांच्या रक्तात भिनलाय असं म्हणता येईल. आणि आपल्याकडे तो फक्त पक्षाच्या किंवा संघटनांच्या नावापुरताच शिल्लक राहिलाय. आपल्या देशाकडे एक नजर टाकली तर दिसून येईल कि आपल्यालाही वैभवशाली इतिहास आणि संस्कृती लाभली आहे. पण तरीही आपल्या राष्ट्राचा आत्मा म्हणता येईल अशी कोणतीच गोष्ट दिसून येत नाही. लोकांना फक्त आणि फक्त आपला स्वार्थ साधण्याशिवाय काहीच सुचत आणि दिसत नाही. कायद्याचं भय फक्त सामान्य माणसालाच आहे. राजकीय नेत्यांना ना कसला कायदा ना कसली नीती. भारत म्हणजे केवळ इतिहास नव्हे, केवळ आपली संस्कृती नव्हे, केवळ आसेतुहिमाचल पसरलेली भूमी नव्हे. भारत म्हणजे भारतीय मन, भारतीय समाज. तो समाज कुठे आहे या गर्दीत? इथे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आहेत; ओ. बी. सी., एस.सी./एस.टी. आहेत; मराठी, गुजराती, तमिळ, तेलगु, बंगाली आहेत; उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आहेत. सगळे आपापलाच ढोल वाजवत आहेत. आणि या सर्वांहून वेगळे असे काही समूह आहेत उच्चभ्रू म्हणवणारे ज्यांना या सगळ्याशी काही घेणंदेणं नाही. आपण चुकून भारतात जन्माला आलो असं वाटणारा समूहसुद्धा इथे आहे. राजकीय नेते आहेत जे या सगळ्याचा फायदा कसा घेत येईल याशिवाय दुसरा विचार करूच शकत नाहीत. अजून किती ऱ्हास होणार आपला? व्हिजन २०२० वगैरे सगळ्या पोकळ गप्पा आहेत. जिथे सामान्य माणूस आपल्याच शहरात, गावात सुरक्षित नाही तिथे कसल्या विकसित राष्ट्र होण्याच्या गप्पा करता? इथे समाजात जरा काही खुट्ट झालं तरीही सत्ताधारी मंडळी आपापली आसनं सांभाळायला लागतात. विरोधकही काही धुतल्या तांदळाचे नाहीत. तेही त्याच पंक्तीतले आहेत.
आपण म्हणजे आसेतुहिमाचलावर कोणे एके काळी जिवंत असलेल्या भव्य राष्ट्राच्या कालेवारापासून तयार होऊ घातलेला एक निर्जीव कोलाज आहोत बाकी काही नाही. आपल्यातलं डोळे दिपून टाकणारं तेज केव्हाच अस्ताचलास गेलंय.
शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२
प्रश्न...
जन्माला येणं ते कशासाठी, काय म्हणून? ही शिक्षा कि वरदान? जगणं तेही कोण्या करणे ? केवळ मरण येत नाही म्हणून? अन हे अज्ञान तरी का म्हणून आणि जर उत्तरेच मिळणार नसतील तर हे डोक्यात येणारे प्रश्न तरी कशासाठी? देव कोण आहे आणि तो आमच्यापासून असा लपून-छपून का राहतो? आम्ही काय गुन्हा केलाय? मुळातच तो आहे कि नाही? आहे म्हणावं तर बुद्धी त्याच्या अस्तित्वावर हजारो प्रश्नांचं कुंपण चढवते आणि नाही म्हणावं तर मन हट्टाला पेटून त्याचं अस्तित्व मान्य करायला लावतं. सत्य मात्र मन आणि बुद्धीच्या वादात न पडता दूर कुठेतरी दृष्टीक्षेपाच्या पार पलीकडे उभं असतं. आधी अस्तित्वासाठी लढणं, मग ते टिकवण्यासाठी आणि एकदा का ते शाश्वत झालं कि मग समृद्धीसाठी धावणं हे असं अविरत चालू असतं.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)