कधी कधी खूप कंटाळा येतो- जगण्याचा, अस्तित्वाचा. आपलं अस्तित्वच एक ओझं वाटायला लागतं. खूप थकल्यासारखं वाटतं. ही नसती उठाठेव कशासाठी चाललीय, इतकं अवघड आहे जगणं, मनासारखं कधीतरी जगता येईल कि नाही असं वाटतं. जगणं -अगदी साधी आणि सरळ गोष्ट. पण आपला हव्यास (ज्याला आपण महत्त्वाकांक्षा असं गोन्डस नाव देतो), आपले egos आपलं जगणं अगदी complex करून टाकतात. किंबहुना ते जगणं उरतच नाही, practical असण्याच्या नावाखाली ती तडजोड असते आनंदाशी, आनंदी असण्याशी आणि ती कशासाठी तर आनंदासाठीच. हे म्हणजे मृगजळासारखं आहे. आपण त्याच्या जवळ जाईपर्यंत ते अजूनच पुढे गेलेलं असतं. आणि ते मिळवण्यातच आनंद आहे असा आपला ग्रह आपण करून घेतलेला असतो. आणि मग काय त्याच्यामागे धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरा आनंद कशात आहे हे आपण विसरूनच जातो. मला आठवतं लहानपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद असायचा. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसा छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंदही कमी होत गेला आणि आनंदाची व्याख्याच आता बदललीय. असं करून आपण आपल्यालाच आनंदापासून दूर नेतोय हे कळत नाही असं नाही. पण आता आपला इगो आपल्याला परत जाऊ देत नाही. तू हे मिळवलंस आता तुला हे मिळवायचंय असं आपण स्वतःला बजावत असतो. मला एवढ्या पगाराचा, असल्या प्रोफाईलचा जॉब मिळवायचाय. "तुम्ही गरीब म्हणून जन्मलात यात तुमचा काही दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे" ही असते आपली ideology. पण "का, कशासाठी" असा साधा प्रश्नही आपण स्वतःला कधी विचारात नाही. मान्य आहे पैसा कमावलाच पाहिजे. ते आवश्यक पण आहे. पण कोणती किंमत देऊन? साध्य देऊन साधन घेतल्यासारख झालं हे , नाही का?
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
रविवार, २७ मे, २०१२
नसती उठाठेव
कधी कधी खूप कंटाळा येतो- जगण्याचा, अस्तित्वाचा. आपलं अस्तित्वच एक ओझं वाटायला लागतं. खूप थकल्यासारखं वाटतं. ही नसती उठाठेव कशासाठी चाललीय, इतकं अवघड आहे जगणं, मनासारखं कधीतरी जगता येईल कि नाही असं वाटतं. जगणं -अगदी साधी आणि सरळ गोष्ट. पण आपला हव्यास (ज्याला आपण महत्त्वाकांक्षा असं गोन्डस नाव देतो), आपले egos आपलं जगणं अगदी complex करून टाकतात. किंबहुना ते जगणं उरतच नाही, practical असण्याच्या नावाखाली ती तडजोड असते आनंदाशी, आनंदी असण्याशी आणि ती कशासाठी तर आनंदासाठीच. हे म्हणजे मृगजळासारखं आहे. आपण त्याच्या जवळ जाईपर्यंत ते अजूनच पुढे गेलेलं असतं. आणि ते मिळवण्यातच आनंद आहे असा आपला ग्रह आपण करून घेतलेला असतो. आणि मग काय त्याच्यामागे धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरा आनंद कशात आहे हे आपण विसरूनच जातो. मला आठवतं लहानपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद असायचा. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसा छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंदही कमी होत गेला आणि आनंदाची व्याख्याच आता बदललीय. असं करून आपण आपल्यालाच आनंदापासून दूर नेतोय हे कळत नाही असं नाही. पण आता आपला इगो आपल्याला परत जाऊ देत नाही. तू हे मिळवलंस आता तुला हे मिळवायचंय असं आपण स्वतःला बजावत असतो. मला एवढ्या पगाराचा, असल्या प्रोफाईलचा जॉब मिळवायचाय. "तुम्ही गरीब म्हणून जन्मलात यात तुमचा काही दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे" ही असते आपली ideology. पण "का, कशासाठी" असा साधा प्रश्नही आपण स्वतःला कधी विचारात नाही. मान्य आहे पैसा कमावलाच पाहिजे. ते आवश्यक पण आहे. पण कोणती किंमत देऊन? साध्य देऊन साधन घेतल्यासारख झालं हे , नाही का?
गुरुवार, ३ मे, २०१२
प्रतिभा.............
एक दिवस (कि रात्री) ती दिसली. माझ्याजवळ येऊन खूप सुंदर, मोहक, निरागस हसली. आणि अशी येऊन थेट माझ्या शेजारीच बसली. अगदी मला खेटून. मला म्हणाली "असा पहिल्यांदाच भेटल्यासारखा काय पाहतोस ? नेहमीच तर भेटतो आपण." कोण ही, कुठून आली आणि अशी काय बोलते? आणि पहिल्यांदाच तर भेटत होतो आम्ही बहुधा. की नाही? आता मात्र मला तिला पूर्वी कधीतरी भेटल्यासारख वाटतंय. की ती म्हणाली म्हणून मला तसं वाटतंय. पण मग आम्ही आधी भेटलो तर मला काही आठवत का नाही? ते जाऊदे. ती अप्रतिम सुंदर होती. माझी तांद्री भांगीत मला म्हणाली "चल आपण अस्तित्वाच्या पार त्या टोकाला जाऊ, देहभान विसरून. जीथं फक्त तूच असशील आणि सोबत मी. फक्त तुझीच. आणि मग आपण या भौतिक, व्यवहारी जगाचे सर्व नियम भिरकावून काही तरी नवीन असं निर्माण करूया." तिची असली काहीतरी बडबड चालू होती. मी आपला देहभान हरपून तिच्याकडे बघतच होतो. आता मात्र हे जरा जास्तच होत होतं. "मी स्वप्नात तर नाही ना?" माझ्या मनात मनात शंका आली. इतक्यात ती म्हणाली "काय फरक पडतो? स्वप्न आणि सत्य हि दोन्हीही सारखीच नाही का? स्वप्नात जे दिसतं ते तेवढ्या पुरतं सत्यच नसतं का? आणि जे जागेपणी अनुभावतोस ते तरी सत्य असतं कशावरून? तेही कधी ना कधी स्वप्नवतच होणार असतंच की. सत्य हे असं पाच ज्ञानेन्द्रीयांच्या अनुभूतींमध्ये नाही पकडता येत. ते कधीकधी त्याच्याही आवाक्या बाहेरचं असतं. आणि ते काळ आणि स्थळ सापेक्ष असतं." हे पचायला जरा जडच होतं. आणि मझं देहभान खरच हरपलं होतं.
मी: हे काय असलं अतार्किक बोलतेस? आणि मला सांग तू आहेस तरी कोण?
(हे नक्कीच स्वप्न असणार. त्याशिवाय एवढी सुंदर मुलगी मला स्वतःहून 'मी फक्त तुझीच' असं म्हणणारच नाही. )
ती: मी कोण ते तुला कळेलच वेळ आल्यावर. आणि आता तू मला सांग तर्क काय असतो? अनुभवांची गोळाबेरीजच ना. मग तर्क तरी अनुभवाच्या कुंपणाबाहेर कसा जाईल? हेच तर सांगायचंय मला तुला. तर्काच्या आणि मुळातच अनुभवाच्या बंधनाच्या बाहेर ये. मनाला मुक्त कर. त्याला मुक्तपणे संचार करू दे या अमर्याद विश्वाखिलात आणि त्याच्याही पलीकडे. हे जाणून घे कि तर्क, कारण, परिणाम वगैरेंच्याही पलीकडे आहे मन. त्याला या भौतिकाच्या बंधनात असा जखडू नकोस.
जशी ती दिसायला सुंदर होती तशी तिच्या बुद्धीची झेपही विलक्षण होती. पण मला काही काळात नव्हतं. बाकी काहीही असो मला ती आवडायला लागली होती हे मात्र नक्की. म्हणजे मी अगदी तिच्या प्रेमातच पडलो होतो म्हटलं तरी चालेल. Love at First Sight.
ती: कसला विचार चालू आहे महाशय? प्रेमात वगैरे पडलास कि काय माझ्या?
मी: (मनात) ही पक्की मनकवडी सुद्धा आहे तर. आता तर हिच्यासमोर विचार करायची पण चोरीच आहे. काय करवं?
ती: काहीही नको फक्त एकच कर. तुझा so called common sense आहे ना तो जरा बाजूला ठेव आणि त्या अमर्याद आकाशाच्याही पलीकडे जाऊन पहा हे सगळ जगच वाट पाहतंय तुझी. हे तारे-ग्रह, ही सजीव आणि निर्जीव सृष्टी, सगळ चाराचारच.
मी: ए बरं ते जाऊ दे तुझं नाव काय आहे?
ती: का? लग्न करणार माझ्याशी?
मी: हो करीन की. तुझी हरकत नसेल तर.
ती: माझ्या हरकतीचा प्रश्न येतोच कुठे. मी प्रतिभा. तुझीच. आणि हे लग्न वगैरे असल्या कुबड्यांची गरज नाही आपल्या सोबतीला. मी कायमचीच तुझी आहे. अगदी कल्पांतापर्यंत.
wow!!! हे मात्र अगदीच मस्त होतं. एकदम अनपेक्षित. एवढी सुंदर मुलगी. नावही किती सुंदर- 'प्रतिभा'. आणि मला म्हणते 'मी तुझीच'. आता मात्र मी बेशुद्ध पडायचा तेवढा बाकी होतो.
ती: एवढा हरखून जाऊ नकोस. खरच मी तुझी आहे.
मी: चल, काहीतरी सांगू नकोस. मग इतके दिवस आपण कसे नाही भेटलो? आणि तू कुठे होतीस? आणि आत्ताच का भेटतोय आपण?
ती: इतके दिवस तुला माझी आणि तुझी तरी ओळख कुठे होती? अजूनही ती झालीय कि नाही शंका आहे पण तू तुला आणि मला थोडसं का होईना ओळखायला लागला आहे असं म्हणता येईल. आणि इतक्या दिवसांचं काय घेऊन बसलास? तू आता कुठे आहेस हे तरी सांगू शकशील का?
आणि काय आश्चर्य..... मी कुठे होतो याचा काहीच थांग पत्ता लागत नव्हता. जागा कि झोपेत कि अजून कुठल्या दुसऱ्याच अवस्थेत? जिवंत कि मृत? काहीच काळात नव्हतं. आजूबाजूला नुसता अंधारच अंधार दाटलेला. मला दिसत होती ती तीच फक्त. प्रतिभा. स्वयंप्रकाशित अशी. सगळा प्रकाश तो तिच्याच पासून होता. त्यात मी कुठेच नव्हतो. मी फक्त ऐकत होतो, पाहत होतो आणि बोलत होतो किंवा कदाचित बोलतही नव्हतो कारण तिला बोलायची गरजच नव्हती. मी फक्त विचार करत होतो आणि ती जाणून घ्यायची. मला फक्त आपण आहोत एवढी जाणीवच तेवढी होती. बाकी शरीर कुठे होतं कोण जाणे? पण हृदयाची स्पंदनं आणि श्वासोच्छावास पण जाणवत होते. म्हणजे तिथे फक्त जाणणारा मी होतो पण जाणवणारा मी डोळ्यांना दिसतच नव्हतो. म्हणजे फसगत नेमकी कशाची होत होती डोळ्यांचीच कि सगळ्याच इंद्रियांची ते काही काळात नव्हतं.
तेव्हा मी जागृती, सुषुप्ती, निद्रा कि समाधी यापैकी कोणत्या अवस्थेत होतो हे मला अजून कळलेलं नाही. ती नेमकी कोण होती याचाही मी अजून विचार करतोय.......
शनिवार, ३१ मार्च, २०१२
क्षण
भविष्यात सगळं काही मस्त, आनंदी-आनंद वगैरे दडलेलं आहे आणि हा वर्तमान तेवढा खडतर असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि एकदा का हा काळ संपला कि मग आयुष्य कसं मजेत जगता येईल या भाबड्या आशेनं आपण हाती असलेला सोनेरी क्षण जगायचं सोडून धावत सुटतो . आणि जेव्हा आपण आपल्या इच्छित क्षणापर्यंत पोहोचतो तेव्हा लक्षात येत कि इथे तर काहीच वेगळं नाही सगळं काही तसंच आहे. उलट काही मोठे प्रश्नही आहेत स्वागत करायला. पण केव्हातरी आपल्या हाती असलेले क्षणही आता आपले राहिलेले नसतात. त्यांच्या आठवणी झालेल्या असतात किंवा त्याही नाही कारण ते आपण जागलेलोच नसतो. त्या क्षणांसोबातच कदाचित इतरही बरंच काही गमावलेलं असतं आपण पण याची जाणीव होण्याइतकीही उसंत घेत नाही आपण. आणि एवढं सगळं होऊनहि आपण परत धावतच राहतो हातचं सोडून पळत्यापाठी. आणि मग कुठल्यातरी क्षणी आपल्या लक्षात येत कि आता आपले इथले सगळेच क्षण संपलेत आणि जगायचं तर राहूनच गेलं. अशा वेळी धावायचं थांबवतो आपण कारण पुढे काहीच नसतं धावण्यासाठी. म्हणजे क्षण तर असतातच पण ते आपले नसतात. मग आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येत कि आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांसोबातच दूर कुठेतरी आपली जिवाभावाची माणसेही हरवली आहेत जी अशा सांजवेळी आपल्यासोबत असायला हवी होती. आणि जी आपल्यासोबत असतात ती त्यांच्या भविष्याचा वेध घेत धावत असतात, जसे आपण धावलो, जगायचं सोडून. पण हा साक्षात्कार व्हायला सगळे क्षण संपायलाच हवेत का? आयुष्यातल्या एक दोन प्रसंगातूनही असं होणार हे कळून येतंच की. तासाच प्रसंग (म्हणजे काही फार भयंकर वगैरे नाही , आपण ज्याला enlightening incidence वगैरे म्हणू तसा) काल घडला. आणि झोपताना विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की अरे आपलं हे नेहमी असंच होत आलंय. मग ठरवलं की हातात आलेला प्रत्येक क्षण जागायचा. आयुष्यात आलेली माणसं जपायची. म्हणजे शेवटी आपण आयुष्यातले बरेच क्षण जगलो असं समाधान तरी असेल. आणि हे असं फक्त त्या शेवटच्या क्षणी मिळणाऱ्या समाधानासाठीच करायचं असं नाही. एकदा का आपण प्रत्येक क्षण जगायला लागलो की मग आपण जिच्यासाठी म्हणून धावत होतो ती गोष्ट त्या प्रत्येक क्षणांमध्ये सापडते. आणि मग आपण आपला शेवटचा क्षणही जगतो. तोही अगदी मनसोक्त...........!
गुरुवार, २२ मार्च, २०१२
NP Complete
आपलं मन किती विचित्र असतं ना, लहान मुलासारखं. जे आपल्याजवळ नाही तेच नेमकं त्याला हवं असतं. म्हणजे त्याला सतत काहीतरी हवंच असतं. कधी गर्लफ्रेंड, कधी पैसा, कधी stability , तर कधी काही वेगळं. ही यादी कधीही न संपणारी आहे. पण कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपलं मन थकून जातं, खेळून दमलेल्या लहान मुलासारखं. मग अशा वेळी त्याला काहीही नको असतं. हवा असतो तो पाठीवरून फिरणारा मायेचा हात आणि थोडीशी विश्रांती, जेणेकरून ते पुन्हा धावायला सज्ज होईल. आणि अशा क्षणीच realise होतं कि हि सगळी धावपळ कशासाठी, नेमकं कशाच्या मागे जात आहोत आपण हेच आपल्याला माहिती नाही. मला जेव्हा मला आयुष्यात नेमकं काय हवंय असा प्रश्न पडतो तेव्हा माझ्याकडे एकच उत्तर असतं- समाधान. पण ते कसं मिळेल हेच माहिती नसतं. सगळ्यांचं असंच असतं बहुतेक. computer science च्या भाषेत असल्या प्रोब्लेम्सना NP complete प्रोब्लेम्स म्हणतात. आयुष्यात असे बरेच NP complete प्रॉब्लेम्स असतात. काळाच्या ओघात आपल्याला त्यांची उत्तरंही मिळत जातात. पण आयुष्यातले सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात. काही सोडून द्यायचे असतात. कारण आयुष्य म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरं देणं नव्हे तर कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते सोडून द्यायचे हे शिकणं होय.
गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२
शाळा माझीही
तिकडे महाराष्ट्रात 'शाळा' रिलीज झालाय. मला इकडे चेन्नईमध्ये तो कधी पाहायला भेटेल ते माहिती नाही. तसं मी शाळा हि कादंबरी वाचली आहे साधारणपाने दोन वर्षांपूर्वी. मस्त आहे खूप. आता नेटवर 'शाळा'चे reviews पाहून परत कादंबरीची आणि मग अर्थातच माझ्या शाळेची आठवण झाली. खरं तर हि कादंबरी वाचणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या शाळेची आठवण होतेच. आणि मग आपण आपल्या नववीच्या वर्गात जातो. मग आपल्याला परत भेटतात 'सुऱ्या', 'चित्र्या','फावड्या' वगैरे मित्र मंडळी. आणि हो त्या आपल्या वर्गात असणारी 'शिरोडकर'सुद्धा. त्यांची नवे हि काहीही असोत, हि मंडळी थोड्या फार फरकाने सर्वांच्याच आयुष्यात आलेली असतात. आणि आपलीहि गोष्ट थोड्या फार फरकाने 'जोश्या'सारखीच असते, नाही का?
शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११
सृजन
(सहजच सुचलं आणि लिहिलं.)
काही लोक मोठे असतात म्हणून लिहितात आणि काही लिहितात म्हणून मोठे असतात आणि बाकीचे माझ्यासारखे बरेचजण मोठे नसतात. पण म्हणून काही ते लिहित नाहीत असं नाही. (आणि ते सर्वच जण लिहितात असंही नाही.) अभिव्यक्त तर प्रत्येकाला व्हायचं असतं. आणि अभिव्यक्तीबरोबरच किंवा त्यापेक्षाही जास्त सृजनाचा आनंद लिखाणातून मिळतो म्हणून मी लिहितो. आणि लिहिणं हे प्रत्येक वेळी सृजनच असतं असंही नाही पण ते आनंददायी असतं यात दुमत नाही.
लेखक, कवी या लोकांबद्दल लहानपणापासूनच म्हणजे कळायला लागल्यापासून नितांत आदर वाटतो. हे लोक म्हणजे शून्यातून विश्व कसं करायचं हे बरोबर जाणतात.म्हणजे पहा सृजनाचा काय आनंद घेतात ना हि मंडळी. आणि हीच का आणखीही काही लोक आहेत म्हणजे चित्रकार, संगीतकार, गायक, वगैरे कलाकार मंडळी तेही सृजनच करत असतात. आणि माझ्या मते जगतात तर हेच लोक. आणि त्याखालोखाल काही प्रमाणात रसिक मंडळी. यात खूप जण आले. निर्मिती मग ती कसल्याही प्रकारची असो आनंददायी असते.
प्रतिभा नावाची एक गोष्ट प्रत्येक नवनिर्मिती मध्ये असते. लेखनाचा विचार केला तर प्रतिभा हा लेखाकांमाधला differentiating factor म्हणता येईल. आणि प्रतिभा हि निसर्गदत्तच असली पाहिजे. आपल्या प्रयत्नांनी फार फार तर लिखाण कौशल्य सुधारता येईल पण लिखाण प्रतिभाशाली होईलच असं नाही. ती दैवी देणगीच. म्हणूनच ज्ञानेश्वरांना १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिता येते आणि आमच्यासारख्यांना ती हाती घ्यायलाही वयाची २३ वर्षे जावी लागतात.
ज्ञानेश्वरीवरून लक्षात आलं- ज्ञानेश्वरी वाचनाचा आनंदच काही और आहे. गीतेवरच एवढं विश्वासार्ह भाष्य क्वचितच भारतीय साहित्यात आढळून येईल. तसं ते नाहीच येणार असं म्हटलं तरी चालेल. मी म्हणतो केवढी हि प्रतिभा आणि किती माह्त निर्मिती. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास किंवा थोडं मागे गेलं तर व्यास, वाल्मिकी, आणि वेदांचं सृजन करणारे असंख्य अज्ञात जण आणि जगातल्या कित्येक भाषांना आपल्या प्रतिभेच्या आविष्काराने समृद्ध करणारे असंख्य साहित्यिक यांना पाहून निसर्गच धन्य होत असेल कारण हि सर्व त्याचीच निर्मिती. देव आहे कि नाही याबद्दल कुणी काहीही म्हणो मी तर म्हणेन तो आहे. कारण चेतनच केवळ निर्मितीक्षम असतं. जड ते केवळ असतं पण त्याला आपल्या अस्तित्वाची देखील जाण नसते. मग निसर्गाची निर्मितीक्षमता ही कुठून आली? ती त्या चैतन्याचंच लक्षण आहे.
माझ्या लिखाणाला अनुभवाची चौकट अजून तरी पार करता आलेली नाही. तशी अपेक्षाही नाही कारण तेवढी योग्यातही अजून नाही. म्हणून माझं लिखाण हे क्वचितच सृजनशील आहे. त्यापेक्षा ती अनुभूतीची, भावनांची, विचारांची, मतांची अभिव्यक्ती आहे असं मी म्हणेन. शब्द माझे असं मीच काय कुणीच म्हणू शकत नाही. मी फक्त त्यांचा क्रम तेवढा ठरवणार. आणि हे तरी मी केलं असं कसं म्हणावं. कारण माझ्यासहित हे सर्वच त्या सृष्टीकर्त्याचीच तर निर्मिती आहे. आणि त्याच्याच चरणी अर्पण.
||श्रीकृष्णार्पणमस्तु ||
रविवार, १० एप्रिल, २०११
श्रीगणेशा
काहीतरी लिहावं असं बऱ्याच दिवसांपासून मनात आहे. तसा अनेक वेळा प्रयत्नही केलाय आणि कही वेळा तो यशस्वीही झालाय. तूर्त हे लेखन माझ्या पुरतंच मर्यादित आहे. म्हणजे त्याचा लेखक आणि वाचकही मीच आहे.
बऱ्याच वेळा असं होतं की वही आणि पेन घेउन लिहायला बसलं की ज्याबद्दल लिहावं असे अनेक विचार डोक्यात एकच गर्दी करतात आणि मग काय लिहावं तेच नेमकं कळत नाही. बरं एखादा विषय घेउन लिहावं तर क्रम कसा ठेवावा हा यक्षप्रश्न्न. म्हणून मग ठरवलंच की नियमित कही तरी लिहायचंच. आणि त्यासाठी ब्लॉगपेक्षा उत्तम पर्याय दुसरा काय असणार?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

